प्रकट दिन २०२६: ‘ही’ १ स्वामी सेवा करा; १ पैशाचा खर्च नाही, कुठे जायची गरज नाही, पुण्य-लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 11:37 IST2026-03-19T11:37:28+5:302026-03-19T11:37:40+5:30
Shree Swami Samarth Prakat Din 2026: श्री स्वामी समर्थ प्रकट दिनी इच्छा असूनही मनाप्रमाणे स्वामी सेवा करता येणे शक्य होत नाही. अशा वेळी एक छोटी सेवा पुण्य फल लाभ देऊ शकते, असे म्हटले जाते.

प्रकट दिन २०२६: ‘ही’ १ स्वामी सेवा करा; १ पैशाचा खर्च नाही, कुठे जायची गरज नाही, पुण्य-लाभ!
Shree Swami Samarth Prakat Din 2026: श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य, नियमित, दररोज सेवा करणारे कोट्यवधी भाविक आहेत. स्वामींच्या मठात, अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. जो तो आपापल्यापरिने स्वामींची सेवा करत असतो. स्वामींचे पूजन, नामस्मरण, मंत्रांचे जप करत असतो. श्री स्वामी समर्थ या नावाचा केवळ उच्चार केला, तरी मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. सकारात्मकता मिळते. वेगळीच ऊर्जा संचारते. प्रेरणा मिळते. शुक्रवार, २० मार्च २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनी इच्छा असूनही मनाप्रमाणे स्वामी सेवा करता येणे शक्य होत नाही. अशा वेळी एक छोटी सेवा पुण्य फल लाभ देऊ शकते, असे म्हटले जाते.
श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यास कोणत्याही भाषेतील शब्द थिटे पडतात. प्रत्यक्ष परब्रह्माला शब्दात कसे पकडणार? श्री स्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त, जिज्ञासूंचे आश्रयस्थान आहे. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. श्री स्वामी समर्थांचे माहात्म्य आणि त्यांचे चरित्र अनेकांनी अनेक प्रकारे रंगविले असले तरी त्याचा जो अधिक विचार करावा, तो त्याचे अनंत नवे पैलू आपल्या लक्षात येतात. खरोखरच अद्भूताचा अनुभव येतो. सूर्य किरण जसे मोजता येत नाही, सागराच्या लाटांची मोजदाद करता येत नाही, त्याचप्रमाणे स्वामींच्या चरित्राचा थांगच लागत नाही, असे अनेक जण सांगतात.
स्वामींचा तारक मंत्र अगदी रामबाण उपाय ठरतो
श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र अतिशय प्रभावी मानला जातो. समस्या, अडचणी, संकटे, चणचण, भय अशा अनेक गोष्टींवर स्वामींचा तारक मंत्र अगदी रामबाण उपाय ठरतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. ‘तारक मंत्र’ या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो त्रासलेला आहे, जो ग्रासलेला आहे, त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काही तरी उपाय करताच. तारक मंत्र स्वरुपात स्वामींनी ही अनमोल भेट दिली आहे.
मनापासून सेवा करावी, पुण्यच लाभेल
तारक मंत्रामध्ये ताकद आहे. ११ वेळा तारक मंत्र म्हणायचा. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही. शेवटही ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती. हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर एक मानसिक बळ येते. जर हा मंत्र तुम्ही हळूहळू, संथ लयीत म्हटला तर खूपच बळ देतो, अंगात शक्ती संचारते, असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे. प्रचंड ताकद असलेल्या प्रभावी तारक मंत्रामुळे वेगळीच सकारात्मकता, प्रेरणा मनात निर्माण होते. यासाठी कोणताही नवा पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही. मनापासून सेवा करावी. आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात. या उपायाने वर्षभर पुण्य तर मिळेलच, शिवाय घरातील नकारात्मकताही दूर होऊ शकेल. स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवावी.
स्वामींचा अत्यंत प्रभावी तारक
निःशंक हो, निर्भय हो, मना रे
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी
अशक्यही शक्य करतील स्वामी ॥१॥
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविणा काळ ना नेई त्याला
परलोकही ना भीती तयाला ॥२॥
उगाची भीतोसी भय पळू दे
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ॥३॥
खरा होई जागा तू श्रद्धेसहित
कसा होशी त्यावीण तू स्वामीभक्त
कितीदा दिला बोल त्यांनीच हात
नको डगमगू स्वामी देतील साथ ॥४॥
विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वमीच या पंचप्राणामृतात
हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती
न सोडेल स्वामी ज्या घेई हाती ॥५॥
॥ श्री स्वामी समर्थ ॥
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥