Shree Nrusimha Saraswati Maharaj Jayanti 2025:दत्तगुरुंचे द्वितीय अवतार तसेच श्रीपाद श्रीवल्लभ यांचा उत्तरावतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती महाराज. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या लाखो लीलांपैकी काही अद्भुत लीला श्रीगुरुचरित्रात वर्णन केलेल्या असून, श्रीदत्तसंप्रदायात या ग्रंथराजाला वेदतुल्य मानून याची उपासना केली जाते. महाराजांचा जन्मकाळ दुपारी १२ वाजता, जन्म स्थान: कारंजा, कारंजा येथील नृसिंह स्वामींचे जन्मस्थान, "काळे वाडा". पौष शुक्लपक्ष द्वितीयाला श्री जगद्गुरू अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री श्रीगुरू नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांचा जन्म करंज नगरीत झाला. सन २०२५ च्या पहिल्याच दिवशी म्हणजेच ०१ जानेवारी २०२५ रोजी नृसिंह जयंती साजरी होत आहे.
वर्षाची सुरुवात दत्तगुरुंच्या शुभाशिर्वादाने व्हावी आणि वर्षभर दत्तगुरुंची कृपा लाभावी, अशी नववर्षाची सुरुवात होणे, यासारखे दुसरे भाग्य नाही, असे सांगितले जाते. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वयाची पहिली ८-१० वर्षे कारंज्याला राहिले. तेथे त्यांनी अलौकिक बाललीला केल्या. मौंजीबंधन होईपर्यंत ते फक्त ॐ एवढाच उच्चार करीत असत. त्यांच्या आई-वडिलांना वाटले की, बालक मुके आहे की काय? पण त्यांनी मुंजीच्या भिक्षावळीत चारही वेदांचे पठण करून मौन सोडले. नंतर काशी येथे जाऊन त्यांनी श्रीमत् कृष्ण सरस्वती स्वामी यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली. पुढील तीस वर्षे उत्तरेत व उर्वरित भारतात जगदोद्धारार्थ भ्रमण करून पुन्हा कारंज्याला आले. मग गोदावरीच्या तीराने भ्रमण करीत करीत ते वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले. कृष्णामाईच्या तीराने भ्रमण करीत औदुंबर क्षेत्री आले. तेथे एक चातुर्मास्य राहिले. तेथे 'विमल पादुका' स्थापन करण्यात आल्या आहेत. औदुंबरहून पुढे ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे आले. तेथे त्यांचे बारा वर्षे वास्तव्य झाले. तेथे श्रींनी आपल्या 'मनोहर पादुका' व अन्नपूर्णामातेची स्थापन केली. मग ते गाणगापूर क्षेत्री आले. तेथे त्यांचे चोवीस वर्षे वास्तव्य झाले. त्यानंतर अंदाजे वयाच्या ऐंशीव्या वर्षी, गाणगापुरात 'निर्गुण पादुका' स्थापून ते श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे जाऊन योगमार्गाने मल्लिकार्जुनाच्या लिंगात अदृश्य झाले. त्यांनी लौकिक अर्थाने देहत्याग केलेला नाही.
श्री क्षेत्र नृसिहवाडी येथे साजरा होणारा जन्मोत्सव
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता ‘श्री नृसिंहसरस्वती स्वामी’ महाराजांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतो . सात दिवस चालू असलेल्या या जन्मोत्सव सोहळ्यात येथील दत्त देव संस्थानचे वतीने अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. येथील कृष्णा-पंचगंगा नदीच्या संगमावर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी बारा वर्षे तपश्चर्या करून ‘मनोहर पादुकांची’ स्थापना केलेने त्यांच्या या तपसाधनेनेच या गावाला नृसिंहवाडी हे नाव मिळाले असलेने सदर जन्मोत्सवास येथे अनन्य साधारण महत्व आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री नृसिंह सरस्वती प्रार्थना अवश्य म्हणावी, असे म्हटले जाते. यामुळे पुण्यलाभ प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते.
श्री नृसिंह सरस्वती प्रार्थना
अनसूयात्मज हे जगपालका । तुजविणा कुणि ना जगि बालका । तरि कथी स्मरूं मी कवणाप्रति । शरण मी नरसिंहसरस्वती ।। १ ।। मग मला गमला पथ हा बरा । तव पदींच असो नित्य आसरा । पुरती हेतू कधीं मम हे कथीं । करि दया नरासिंहसरस्वती ।। २ ।। मज कडोनिच घेऊनी चाकरी । मगहि देशिल योग्य न ते जरी । शिशुस मोबदला कुणि मागती । कथि बरे नरसिंहसरस्वती ।। ३ ।।नति तुझ्या पदीं अर्पिति किंकर । अभय दे शिरि ठेवि गुरो कर ।स्थिरमती रमती नित्य प्रार्थिती । करि दया नरसिंहसरस्वती ।। ४ ।। मदीय लोचन सार्थक जाहले । सगुण सद्गुरू सद्रुप पाहिले । बघ मना रूप मंगल हे किती । करि दया नरसिंहसरस्वती ।। ५ ।।तव कृपेविण जीवचि घाबरे । अभय दे श्िरि ठेवचि हस्त रे । तव पथा गुरू वासचि पाहती । करि दया नरसिंहसरस्वती ।। ६ ।। बहुत भोगियल्या गुरू आपदा । चुकवि दावि अता तुझिया पदा ।द्रुतगती अजि धावचि संकटी । करि दया नरसिंहसरस्वती ।। ७ ।।कितीतरी अळवू तुज श्रीगुरू । बहुत ही श्रमलें भवि लेकरूं ।कशि दया तुजला लव ये न गा । अनसूयात्मज भो मज पाव गा ।। ९ ।। तुज समक्ष अरी मज गांजिती । लवभरी तुजला कशी ना क्षिती । उगिच कां त्रिशुला धरिलें अगा । अनसूयात्मज भो मज पाव गा ।। ९ ।।मदीय प्राण हरीलाचि काळ तो । मग तुझा उपयोगचि काय तो । म्हणुनि मी पुसतो कधिं येशि गा । अनसूयात्मज भो मज पाव गा ।। १० ।।सदयता हृदयीं लव तूं धरी । भजनि मंडळी हे गुरू उध्दरी । स्वकिय आप्त रिपू आणि निंदका । अनसूयात्मज भो मज पाव गा ।। ११ ।। अदयता धरिली अशि कां बरे । भवपुरी बुडतो जिव घाबरे । पुरवि हेतु न मी गुरू दास गा । अनसूयात्मज भो मज पाव गा ।। १२ ।।
।। दत्त दिंगबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा... नृसिंह सरस्वती दिगंबरा ।।
।। अवधूतचिंतन श्रीगुरूदेव दत्त ।।