Shravan vrat 2021 : सुखी वैवाहिक जीवनासाठी मंगळागौरीच्या आरतीतून देवीला घातलेली प्रेमळ साद...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 18:16 IST2021-08-09T18:15:55+5:302021-08-09T18:16:17+5:30
Shravant vrat 2021 : आपल्याकडे सुबत्ता असेल तर देवाची पूजा अर्चा करताना आपणही आपले वैभव देवाच्या पायाशी ठेवू शकू, असा स्वार्थ आणि परमार्थ भाव आरतीतून व्यक्त होतो.

Shravan vrat 2021 : सुखी वैवाहिक जीवनासाठी मंगळागौरीच्या आरतीतून देवीला घातलेली प्रेमळ साद...!
मंगळागगौरीची पूजा म्हणजे उमामहेश्वराची पूजा. पती-पत्नी दोघांतील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दांपत्याकडे पाहिले जाते आणि त्यांची कृपा संपादन करण्यासाठीच ही पूजा केली जाते. श्रावण मासात दर मंगळवारी हे व्रत केले जाते.
मंगळागौरीच्या व्रतात शिव व गणपती यांच्यासह गौरीची पूजा करतात. पूजेसाठी चौरंग मांडतात. त्याला केळीचे खुंट बांधून मखर तयार करतात. ते फुलांनी सजवतात. त्या भोवती रांगोळी काढतात. या पूजेत १६ संख्येचे विशेष महत्त्व आहे. सोळा प्रकारची पत्री, सोळा प्रकारची फुले आणि पुरणाचे सोळा दिवे यांसह षोडशोपचारे गौरीची पूजा केली जाते. तसेच गौरीसाठी पुरणाचे अलंकार केले जातात. त्यात दागिने, हार, गजरा, भातुकली, फणी असे प्रकार पुरणापासून बनवले जातात व पूजा करतेवेळी गौरीला अर्पण केले जातात. पूजा झाली की मंगळागौरी व्रताची कथा वाचली जाते व त्यानंतर पुढील आरती मनोभावे म्हटली जाते.
Shravan 2021 : नवीन लग्न झालेल्या मुली मंगळागौरीचे व्रत का करतात, त्यामागील पौराणिक कथा!
जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।।
रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।।
मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।।
तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया। ।१।।
पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा।।
सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे।।
पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली।।२।।
साळीचे तांदुळ मुगाची डाळ। आळणीं खिचडी रांधिती नारी।।
आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।।३।।
डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती। कळावी कांगणें गौरीला शोभती।।
शोभली बाजुबंद। कानीं कापांचे गवे। ल्यायिली अंबा शोभे।।४।।
न्हाउनी माखुनी मौनी बैसली। पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली।।
स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।।५।।
सोनिया ताटीं घातिल्या पंचारती। मध्यें उजळती कापुराच्या वाती।।
करा धूप दीप। आतां नैवेद्य षड्रस पक्वानें । तटीं भरा बोनें ।।६।।
लवलाहें तिघें काशीसी निघाली। माउली मंगळागौर भिजवूं विसरली।।
मागुती परतुनीयां आली। अंबा स्वयंभू देखिली।।देउळ सोनियाचे ।
खांब हिरेयांचे। कळस वरती मोतियांचा ।।७।।
या आरतीने पूजा संपन्न होते. रात्री खेळ, गप्पा, गाणी करत जागरण केले जाते आणि पुन्हा एकदा ही आरती म्हणून दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा झाली की पूजेची सांगता केली जाते.