Shravan vrat 2021 : आधुनिक शेतीच्या युगातही 'पोळा' साजरा करण्यामागे आहे 'हे' कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 12:34 PM2021-09-03T12:34:42+5:302021-09-03T12:35:25+5:30

Shravan Vrat 2021 : आपल्यावर उपकार करणाऱ्या, आपल्यासाठी झिजणाऱ्या  मुक्या प्राण्यांविषयी कृतज्ञता बाळगणे, त्यांच्याविषयी आदरभाव ठेवणे ही आपल्या संस्कृतीची परंपरा आहे.

Shravan vrat 2021: Even in the age of modern agriculture, the reason behind the celebration of 'Pola' is 'this' ... | Shravan vrat 2021 : आधुनिक शेतीच्या युगातही 'पोळा' साजरा करण्यामागे आहे 'हे' कारण...

Shravan vrat 2021 : आधुनिक शेतीच्या युगातही 'पोळा' साजरा करण्यामागे आहे 'हे' कारण...

googlenewsNext

दरवर्षीप्रमाणे गावातच नाही तर शहरातही पोळा हा सण श्रद्धेने साजरा केला जातो. गावाकडे खऱ्या खुऱ्या बैलांची पूजा करतात, तर शहरात बैलांच्या जोडीची मूर्ती आणून पूजा करतात, एढाच काय तो फरक. यंदा ६ सप्टेंबर रोजी सोमवारी 'पोळा' आहे. आजच्या आधुनिक शेतीच्या काळातही या सणाला पूर्वीइतकेच महत्त्व का आहे ते जाणून घेऊया. 

श्रावण वद्य अमावस्येला पोळा साजरा करतात. हा बैलांचा सण आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकरी वर्ग हा प्रामुख्याने बैलांच्या मदतीनेच सर्व कृषिकर्मे करीत असल्यामुळे त्यांच्यामध्ये या सणाचे महत्त्व आणि माहात्म्य अधिक आहे. यंत्रयुग आले तरी बैलांच्या परिश्रमांना पर्याय नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण ट्रॅक्टरसारखी महागडी यंत्रसामुग्री केवळ सधन शेतकरीच येऊ शकतो. शेतकरी आपल्या बैलांना किती कष्ट पडतात हे जाणून असतो म्हणून त्यांच्याविषयी वाटणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण मोठ्या अपूर्वाईने साजरा करतो. 

पेरण्या झाल्यानंतर शेतीच्या कामातून बैल रिकामे झालेले असतात. म्हणून शेतकरी मंडळी पोळ्याच्या आधी आपल्या बैलांना थोडी विश्रांती देतात. त्यांना चांगला खुराक घालून पुष्ट करतात. पोळ्याच्या दिवशी बैलांना स्वच्छ धुवून त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगांना बेगड लावतात. त्यांच्या पाठीवर रंगीबेरंगी झुली घालतात. पायात घुंगरू बांधतात, गळ्यात विविधरंगी माळा घालतात. अशा प्रकारे त्यांना उत्तमप्रकारे शृंगारून त्यांची वाजतगाजत मोठ्या थाटात शोभायात्रा काढतात. या मिरवणुकीचा वेगळाच थाटमाट असतो. बैलांना मारुतीच्या देवळापाशी नेऊन आणि त्याला उजवी प्रदक्षिणा घालून ही मिरवणूक आल्या मार्गाने गावात परतते. या दिवशी बैलांना पंचारतीने ओवाळतात. पुरणपोळी खाऊ घालतात. थोपटतात, प्रेमाने वागवतात.

Shravan Vrat 2021 : संततीविषयक दोष निवारणारे 'पिठोरी अमावस्येचे' प्रभावी व्रत थोडक्यात समजून घेऊ!

हा सण विशेषत: देशावर साजरा केला जातो. कोकणात तो साजरा करण्याचा प्रघात नाही. तेथे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस मात्र बैलांकडून कोणतेही कष्टाचे काम करून घेत नाहीत. पोळा साजरा केल्याने धनधान्याची आणि गोधनाची वृद्धी होते अशी श्रद्धा आहे. आपल्यावर उपकार करणाऱ्या, आपल्यासाठी झिजणाऱ्या  मुक्या प्राण्यांविषयी कृतज्ञता बाळगणे, त्यांच्याविषयी आदरभाव ठेवणे ही आपल्या संस्कृतीची परंपरा आहे. ते सेवानिवृत्त झाले, तरी मातापित्यांप्रमाणे त्यांचा सांभाळ करणे, हा आपल्या पूर्वजांचा संस्कार आहे. त्याला अनुसरून आजही पोळा हा सण दिमाखात साजरा केला जातो. 

Web Title: Shravan vrat 2021: Even in the age of modern agriculture, the reason behind the celebration of 'Pola' is 'this' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.