श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 16:40 IST2025-08-20T16:36:59+5:302025-08-20T16:40:43+5:30

Shravan Masik Shivratri Vrat 2025: श्रावणातील शेवटच्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आणि शिवरात्रि व्रताचा शुभ संयोग जुळून आला असून, या दिवशी शिव पूजनासह लक्ष्मी देवीची पूजा करणे पुण्य फलदायी मानले गेले आहे.

shravan masik shivratri vrat 2025 do shiva pujan and laxmi puja on gurupushyamrut yoga you will attain glory wealth and prosperity | श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!

श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!

Shravan Masik Shivratri Vrat 2025: अवघ्या काही दिवसांनी श्रावण महिन्याची सांगत होत आहे. श्रावण शुक्रवारी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी श्रावण अमावास्येचा प्रारंभ होत असून, शनिवारी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांपर्यंत अमावास्या असणार आहे. त्यानंतर भाद्रपद महिना सुरू होईल. तत्पूर्वी, श्रावण गुरुवारी अनेक अद्भूत दुर्मिळ आणि शुभ पुण्य फलदायी योग जुळून आले आहेत. वारंवार न येणारा आणि अत्यंत शुभ मानला गेलेला गुरुपुष्यामृत योग श्रावण गुरुवारी दिवसभर असणार आहे. तर, याच दिवशी मासिक शिवरात्रि आहे. गुरुवारी आवर्जून दत्तगुरू, सद्गुरू आणि स्वामींची सेवा केली जाते. तसेच गुरुपुष्यामृत योगावर लक्ष्मी देवीचे पूजन करणे शुभ मानले गेले आहे. श्रावण शिवरात्रिला आलेल्या गुरुपुष्यामृत योगावर शिव पूजन आणि लक्ष्मी पूजन कसे करावे? जाणून घेऊया...

गुरुपुष्यामृत योग वारंवार जुळून येत नाही. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. गुरुवार, २१ ऑगस्ट २०२५ रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. गुरुपुष्यामृतयोग सकाळी ०६ वाजून २३ मिनिटांपासून ते उत्तररात्रौ १२ वाजून ०८ मिनिटांपर्यंत असणार आहे. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे, असे मानले जाते. गुरुवारी धार्मिक कार्ये करणे उत्तम मानले गेले आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. जाणकारांच्या मते, पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा, असेही म्हणतात. श्रावणातील शेवटच्या गुरुवारी मासिक शिवरात्रीचे व्रत आहे.

मासिक शिवरात्रिला करावयाचे शिव पूजन

गुरुवार, २१ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण मासिक शिवरात्रि व्रत आहे. प्रत्येक महिन्यात शिवरात्रीचे व्रत असते. शिवरात्रीला महादेव शिवशंकराचे विशेष पूजन केले जाते. शिवरात्रि ही महादेवांना समर्पित असलेले व्रत आहे. अनेकांचे आराध्य असलेल्या महादेवांचे भारतात मोठ्या प्रमाणात पूजन, उपासना केली जाते. शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत.  रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष अशी फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. या दिवशी मनोभावे शिवपूजन करावे. पंचोपचाराने महादेवांचे पूजन झाल्यानंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. त्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते. या दिवशी रुद्राभिषेक, जलाभिषेक, दुग्धाभिषेक करणे पुण्य फलदायी मानले गेले आहे. शिवरात्रिच्या दिवशी सकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. शक्य असल्यास १०८ बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत.

शिव मंत्रांचा यथाशक्ती अवश्य जप करावा 

प्रदोष व्रत काळात महादेव शिवशंकरांच्या प्रभावी मंत्रांचे जप करणे लाभदायक तसेच पुण्यफलदायी ठरू शकते, असे म्हटले जाते. 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. 

गुरुपुष्यामृत योगावर करा लक्ष्मी पूजन

गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ फलदायक असते, असे सांगितले जाते. नेहमीप्रमाणे सकाळी नित्यकर्म आटोपल्यावर लक्ष्मी देवीची षोडषोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी. लक्ष्मी देवीला आवडणारी फुले अर्पण करावीत. लक्ष्मी देवीच्या आवडत्या गोष्टी अर्पण करावा. आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा. श्रीसुक्त आवर्जून म्हणावे किंवा ऐकावे. तसेच लक्ष्मी देवीशी संबंधित स्तोत्रे म्हणावीत. मंत्रांचे जप करावेत, असे सांगितले जाते. तसेच सायंकाळी तिन्हीसांजेला लक्ष्मी देवीसमोर दिवा लावावा. तुळशीपाशी दिवा लावावा. शक्य असेल तर लक्ष्मी देवीची आरती करावी. आरती करणे शक्य नसेल, तर लक्ष्मी देवीसमोर दिवा लावताना नामस्मरण करावे, असे म्हटले जाते.

 

Web Title: shravan masik shivratri vrat 2025 do shiva pujan and laxmi puja on gurupushyamrut yoga you will attain glory wealth and prosperity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.