श्रावणी शनिवार: नृसिंह पूजन कसे करावे? नृसिंहावतार महत्त्व, पूजाविधी अन् मान्यता जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 02:07 PM2023-08-18T14:07:02+5:302023-08-18T14:07:19+5:30

Shravan Shanivar 2023: जिवतीच्या कागदावर असलेल्या नृसिंहाचे श्रावणी शनिवारी पूजन केले जाते. पाहा, महत्त्व आणि मान्यता...

shravan 2023 know about significance of narasimha vrat puja vidhi and shravani shaniwar importance in marathi | श्रावणी शनिवार: नृसिंह पूजन कसे करावे? नृसिंहावतार महत्त्व, पूजाविधी अन् मान्यता जाणून घ्या

श्रावणी शनिवार: नृसिंह पूजन कसे करावे? नृसिंहावतार महत्त्व, पूजाविधी अन् मान्यता जाणून घ्या

googlenewsNext

Shravan Shanivar 2023: चातुर्मासातील व्रत-वैकल्ये आणि सण-उत्सवांची रेलचेल असलेला महिना म्हणजे श्रावण. श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिना शिवपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. यंदाच्या वर्षी श्रावण महिना अधिक होता. त्यामुळे आता निज श्रावण मासात सर्व व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जात आहेत. श्रावणारंभ झाला की, जिवतीचा कागद घरोघरी लावला जातो. त्यावर नृसिंहाचे चित्र असते. श्रावणातील अन्य दिवसांसह शनिवारी अश्वत्थ मारुतीसह नृसिंह पूजनाची पंरपरा आपल्याकडे प्राचीन काळापासून सुरू आहे. जाणून घेऊया...

प्रल्हादासाठी विष्णूंनी नृसिंह अवतार घेतला. त्यावेळी तो खांबातून प्रगटला. त्याचे प्रतीक म्हणून खांब अथवा भिंतीवर चित्र रेखाटून ही पूजा केली जाते. आजच्या घराच्या जागेच्या अडचणींमुळे एखाद्या खांबावर अथवा भिंतीवर असे चित्र रेखाटून वा चित्र लावून पूजा करणे शक्य नाही. दुष्टांच्या संहारासाठी देवाने घेतलेला हा आणखी एक अवतार! प्रल्हादाच्या जीवनाशी निगडित ‘होळी’ जशी सामूहिक पद्धतीने साजरी केली जाते, तशीच ही पूजादेखील कोणत्याही एका शनिवारी सामुदायिक पद्धतीने करावी, असे सांगितले गेले आहे.

​नृसिंह पूजन

श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी एका खांबावर अथवा भिंतीवर नृसिंहाचे चित्र काढावे. त्या चित्रावर तिळाच्या तेलाचे किंवा गाईच्या तुपाचे थेंब शिंपडून प्रोक्षण करावे. त्यानंतर साधी हळद, आंबेहळद, चंदन, लाल आणि निळी किंवा पिवळी फुले वाहून त्या चित्रातील नृसिंहाची पूजा करावी. कुंजरा नावाची पालेभाजी आणि तांदळाची खिचडी, असा नैवेद्य दाखवावा. सुखसंपत्ती आणि संततीसाठी नव्हे, पण प्रल्हादासाठी घेतलेल्या एका अवताराची आठवण म्हणून या व्रताकडे बघितले जावे, असे सांगितले जाते.

अश्वत्थ मारुती पूजनाची प्रथा

श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे, असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुतीरायाला तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो, असा समज आहे. वेदकाळापूर्वीच्या सिंधुसंस्कृतीत अश्वत्थ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते. तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला. पुढे ऋग्वेदकाळातही यज्ञकर्मात अग्निमंथनासाठी लागणारी उत्तरारणी अश्वत्थापासून बनविली जाई. उपनिषद काळात अश्वत्थ हे देवस्थान मानले गेले.
 

Web Title: shravan 2023 know about significance of narasimha vrat puja vidhi and shravani shaniwar importance in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.