शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 09:15 IST2025-09-21T09:15:01+5:302025-09-21T09:15:38+5:30

नवरात्र कुळाचाराप्रमाणे करण्याची परंपरा आहे. घरात पवित्र जागी मंडप उभारून तिथे एक वेदी तयार करतात

Sharadiya Navratri is the festival of creativity; Why is the worship only for nine days? Know the importance | शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या

शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या

दा. कृ. सोमण | पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक

सोमवार, २२ सप्टेंबरपासून ते बुधवार १ ॲाक्टोबरपर्यंत शारदीय नवरात्र साजरे होत आहे. यावर्षी तृतीया तिथीची वृद्धी म्हणजे ही तिथी दोन दिवस सूर्योदयाला असल्याने नवरात्राेत्सव दहा दिवसांचा झाला आहे. आश्विन महिना हा शरद ऋतूमध्ये येतो. या दिवसात शेतात तयार झालेले धान्य घरात येण्यास सुरुवात होते. या महिन्याच्या प्रारंभी पृथ्वीच्या ‘निर्मितीशक्ती’ला वंदन व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘शारदीय नवरात्र उत्सव’ साजरा केला जातो.

निर्मितीशक्तीची पूजा नऊ दिवसच का?
नऊ या ब्रह्मसंख्येचे आणि निर्मितीशक्तीचे अतूट नाते आहे. अंकांमध्ये ९ हा सर्वात मोठा अंक आहे. बी जमिनीत गेल्यावर नऊ दिवसांनी अंकुरते. गर्भधारणेपासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्मते. म्हणूनच ही आदिशक्तीची-निर्मितीशक्तीची पूजा नऊ दिवस केली जाते.

स्थापना आणि पूजा
नवरात्र कुळाचाराप्रमाणे करण्याची परंपरा आहे. घरात पवित्र जागी मंडप उभारून तिथे एक वेदी तयार करतात. नंतर स्वस्तिवाचनपूर्वक त्या वेदीवर सिंहारूढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात. मूर्ती नसल्यास नवार्ण यंत्राची स्थापना करतात. यंत्राशेजारी एक घट स्थापन करून त्याची व देवीची यथाविधी पूजा करतात. व्रतधारी व्यक्तीने नऊ दिवस उपवास करायचा असतो. सप्तशतीचा पाठ करतात. 

महत्त्वाचे दिवस
शुक्रवार, २६ सप्टेंबर (ललिता पंचमी). या दिवशी ललिता देवीची पूजा होते. पूजेमध्ये गंधाक्षत युक्त ४८ दूर्वा देवीला अर्पण कराव्या. 
सोमवार, २९ सप्टेंबर (श्रीमहालक्ष्मी पूजन). रात्री घागरी फुंकून जागरण करण्याची प्रथा आहे. सरस्वती आवाहन करावे. 
मंगळवार, ३० सप्टेंबर (दुर्गाष्टमी, महाअष्टमी उपवास, श्रीसरस्वती पूजन). काही उपासक सायं. ५.४१ ते ६.२९ या संधीकाली पूजनही करतात. 
बुधवार, १ ॲाक्टोबर (महानवमी, उपवास, नवरात्रोत्थापन) 
गुरुवार, २ ॲाक्टोबर (विजयादशमी). याच दिवशी स. ९.१२ नंतर सरस्वती विसर्जन. 
आजी, आई, पत्नी, बहीण, सून, कन्या, नात या रूपात घरात देवी वावरत असतात. त्यांच्याकडेही नीट लक्ष द्यावयास हवे. 

नवदुर्गेची रूपे
१. शैलपुत्री २. ब्रह्मचारिणी ३. चंद्रघंटा ४. कुष्मांडा ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री 
(श्रीमहालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्रीमहाकाली यांचीही उपासना करतात.)

पुढील १० वर्षांतील घटस्थापना
१. रविवार ११ ऑक्टोबर २०२६ 
२. गुरुवार ३० सप्टेंबर २०२७
३. मंगळवार १९ सप्टेंबर २०२८
४. सोमवार ८ ऑक्टोबर २०२९
५. शनिवार २८ सप्टेंबर २०३०
६. शुक्रवार १७ ऑक्टोबर २०३१
७. मंगळवार ५ ऑक्टोबर २०३२
८. शनिवार २४ सप्टेंबर २०३३
९. शनिवार १३ ऑक्टोबर २०३४
१०. मंगळवार २ ॲाक्टोबर २०३५

Web Title: Sharadiya Navratri is the festival of creativity; Why is the worship only for nine days? Know the importance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.