स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 12:19 IST2025-05-04T12:19:45+5:302025-05-04T12:19:53+5:30

Shankar Maharaj Punyatithi Smaran Din May 2025: शंकर महाराज नेहमी भक्तांना सांगत की, माझे गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांना नित्य स्मरा ही माझी आज्ञा आहे.

shankar maharaj punyatithi smaran din may 2025 know about amazing relationship between guru the swami samarth maharaj and the disciple shankar maharaj | स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?

स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?

Shankar Maharaj Punyatithi Smaran Din May 2025: योगी पुरुष अशी ज्यांची ओळख ते शंकर म्हाराज त्यांच्या जिवंतपणीच अख्यायिका बनले होते. वैशाख शुक्ल अष्टमी तिथीला शंकर महाराजांनी देह ठेवला आणि ते अनंतात विलीन झाले. यंदा, ५ मे २०२५ रोजी वैशाख शुद्ध अष्टमी आहे.  शंकर महाराज अवतारी पुरुष होते. शंकर महाराजांची मंदिरे, मठ अनेक ठिकाणी आहेत. शंकर महाराज यांना मानणारा, त्यांची भक्ती करणारा वर्गही मोठा आहे. श्री सद्गुरू शंकर महाराज यांचे नामस्मरण, उपासना करणारे भाविक देश-विदेशात असल्याचे सांगितले जाते. कठीण काळात शंकर महाराज पाठीशी उभे राहिल्याचे अनुभव अनेक जण सांगतात. शंकर महाराजांचा आवडता नंबर होता १३. कारण विचारले असता ते म्हणत " सबकुछ तेरा, कुछ नाही मेरा" महाराज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावानी प्रसिद्ध आहेत. श्री शंकर महाराजांचा पारमार्थिक उपदेशही अगदी साधा असे. अनेकांना त्यांनी अनेक प्रकारे मार्गदर्शन केले. श्री शंकर महाराज म्हणजेच साक्षात दत्तगुरुंचा अवतार, अशीही प्रचलित लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.

योगीराज श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना समोर बसवून सद्गुरुचा महिमा सांगत असत. ते जेव्हा म्हणून अक्कलकोटला येत. तेव्हा आपल्या आईला मुलाने भेटावे अशा प्रेमाने साश्रुमनाने श्री स्वामींच्या समाधीचे दर्शन घेत. तासनतास वटवृक्षाच्या छायेत राहत. संपूर्ण रात्रभर जागरण करीत व रात्रौ गुरूशिष्यांच्या भेटी होत. श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचे एकमेव गुरू आहेत. त्यांच्या स्थानावर आम्ही येऊन सुखावतो. अक्कलकोटला जमलेल्या आपल्या भक्तांना शंकर महाराज सांगत माझे गुरू श्री स्वामी समर्थ यांना नित्य स्मरा ही माझी आज्ञा आहे.

शंकर महाराज हे स्वामींना ‘मालक’ असे संबोधत असत

प्रत्यक्ष शिवावतार सद्गुरु श्री शंकर महाराज हे फार विलक्षण अवलिया होते. साक्षात् राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे पूर्णकृपांकित व त्यांचे परमप्रिय शिष्योत्तम असणारे श्री शंकर महाराज त्यांच्यासारखेच अखंड अवधूती मौजेमध्ये राहात असत. त्यांच्या लोकविलक्षण लीला वाचताना आश्चर्यालाही चमत्कार वाटावा, अशी आपली परिस्थिती होऊन जाते. ते सद्गुरु श्रीस्वामींना 'आई' म्हणत असत.  शंकर महाराज हे श्री दत्तगुरुंचा तिसरा अवतार मानले गेलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांना गुरु मानत असत. स्वामी समर्थ आणि शंकर महाराज यांच्या भेट कशी झाली, याबाबत काही कथा सांगितल्या जातात. शंकर महाराज हे स्वामींना ‘मालक’ असे संबोधत असत, असेही सांगितले जाते. 

शंकर महाराज त्या स्पर्शाने अगदी भारावून गेले

लहानपणी शंकर महाराज फार खोडकर आणि खट्याळ होते. एक दिवस एका हरिणाच्या पिल्लाचा पाठलाग करत ते एका अरण्यात पोहोचले. त्या घोर अरण्यात त्यांना एक शंकराचे जीर्ण देऊळ दिसले. ते हरणाचे पिल्लू त्या देवळात आश्रयाला लपले. त्या पिल्लाला बाण मारणार एवढ्यात शंकर महाराजांसमोर एक दिगंबर साधू आले. त्याने त्या हरणाच्या पिल्लाला उचलून आपल्या कुशीत घेतले आणि महाराजांना म्हणाले की, कशाला मारतोस रे याला, काय बिघडवले याने तुझे. काही वेळाने त्या दिगंबर साधूने महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. ही त्यांची प्रथम स्पर्शशिक्षा. शंकर महाराज त्या स्पर्शाने अगदी भारावून गेले. तो दिगंबर साधू म्हणजे अक्कलकोट स्वामी महाराज, असे म्हणतात. 

आपला वारसा लाडक्या शिष्याकडे देऊन स्वामी निजानंदी निमग्न झाले

उठल्यापासून शंकर महाराजांना उदासीन वाटत होते. साधनेत मन लागेना. ज्ञानेश्वरी वाचायला घेतली पण अर्थ लागत नव्हता. स्वामींची सारखी आठवण यायला लागली. अनामिक हुरहूर लागायला लागली. असे का होत आहे ते काळात नव्हते, स्वामींच्या भेटीसाठी जीव कासावीस होत होता. शेवटी स्वामींनाच आवाहन करून विचारले की, स्वामी आज काय होत आहे. मला कळत नाही, माझे काही चुकले का? नाही बेटा. हे शब्द कानावर ऐकायला आल्यवरती शंकर महाराजांनी पाहिले की, एका वटवृक्षाखाली स्वामी पद्मासनात बसले होते. मुखावर कोटी सूर्याचे तेज होते. नजर नेहेमीसारखी करडी नव्हती. त्यात आईचे प्रेम झिरपत होते. शंकर महाराज आनंदाने पुढे गेला आणि स्वामींना नमस्कार करू लागले. स्वामींनी शंकर महाराजांकडे पाहिले आणि एक लखलखणारी ज्योत स्वामींच्या डोळ्यातून बाहेर आली आणि शंकर महाराजांच्या हृदयात स्थिर झाली. शंकर महाराजांना समजले की, देहाचे सगुण सरले, देहाचे अनुबंधन तुटले. शंकर महाराज कळवळून ओरडले की, स्वामी मला पोरके करून असे कसे जाऊ शकता? शंकर महाराजांनी डोळे पुसले. आणि हळूहळू स्वतःला सावरले. आपला वारसा लाडक्या शिष्याकडे देऊन स्वामी निजानंदी निमग्न झाले, अशी एक कथा सांगितली जाते.

 

Web Title: shankar maharaj punyatithi smaran din may 2025 know about amazing relationship between guru the swami samarth maharaj and the disciple shankar maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.