प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 09:49 IST2025-10-29T09:44:56+5:302025-10-29T09:49:31+5:30
Shankar Maharaj Prakat Din 2025: स्वामी समर्थ महाराजांचे दैवी शिष्य असलेल्या शंकर महाराजांचा गुरुवारी प्रकट दिन आहे. शंकर महाराजांच्या अनेक लीला आजही स्तिमित करतात.

प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
Shankar Maharaj Prakat Din 2025: गुरुवार, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी धनकवडीचा अवलिया योगी शंकर महाराज यांचा प्रकट दिन आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमप्रिय शिषोत्तम असलेल्या शंकर महाराजांचा गुरुवारी प्रकट दिन येणे हाही एक विलक्षण योग मानली जात आहे. योगी पुरुष अशी ज्यांची ओळख ते शंकर म्हाराज त्यांच्या जिवंतपणीच अख्यायिका बनले होते. कार्तिक शुद्ध अष्टमी, गोपाष्टमी या तिथीला शंकर महाराज नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंतापूर या ग्रामी, पहाटेच्या वेळेस प्रकट झाले.
मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर। दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर॥ यहां दुनिया में कई रंग है। यह रंग निराला है। पाया न भेद किसने, यह गहरा ही गहरा है॥ हे शब्द आहेत शंकर महाराज यांचे. प्रत्यक्ष शिवावतार सद्गुरु श्री शंकर महाराज हे फार विलक्षण अवलिया होते. साक्षात् राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूर्णकृपांकित व त्यांचे परमप्रिय शिष्योत्तम असणारे श्री शंकर महाराज यांच्यासारखेच अखंड अवधूती मौजेमध्ये राहात असत. शंकर महाराजांच्या लोकविलक्षण लीला वाचताना आश्चर्यालाही चमत्कार वाटावा, अशी आपली परिस्थिती होऊन जाते.
शंकर महाराजांचा मोठा अनुयायी वर्ग, आजही विचारांचे पालन
महाराज अजानूबाहू होते. भगवान शंकराप्रमाणेच ते वैरागी होते. शंकर महाराजांच्या पश्चात आज त्यांचा मोठा अनुयायी वर्ग आहे आणि त्यांच्या विचारांचे पालन करत अध्यात्माची वाट चालत आहे. मोठा भक्त संप्रदाय असणाऱ्या शंकर महाराजांबाबत अनेक अख्यायिका प्रचलित आहेत. शंभर वर्षांहूनही अधिक काळ आपल्या सहवासाचा लाभ भक्तगणांना देणारे शंकर महाराज हे इतर महाराजांसारखे नव्हते. त्यांच्या जन्मापासूनच अख्यायिका सुरू होतात.
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
शंकर महाराज नेमके किती वर्ष जगले?
शंकर महाराजांचे वय काय? हा एक असाच अनिश्चित, अनुत्तरीत प्रश्न. महाराजांच्या भक्तांपैकी एकजण होते पुण्याचे डॉक्टर धनेश्वर. त्यांनी महाराजांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या असता त्यांचे वय १५२ वर्षं असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आणि ते थक्क झाले. काही जण म्हणतात की, शंकर महाराज शंभर वर्षं जगले तर काही म्हणतात त्यांनी शंभरावर पन्नास पार केलेली होती. शंकर महाराजांचे वय मात्र त्यांच्या शरीरावर, चेहर्यावर कधीच दिसले नाही.
अद्भूत विलक्षण लीला अन् अचाट सामर्थ्य
सद्गुरु श्री शंकर महाराज अक्षरश: काहीही लीला करू शकत असत. त्यांचे अचाट सामर्थ्य पाहून आपण स्तिमितच होऊन जातो. महाराजांच्या अनेक भक्तांची जन्म आणि मृत्यूची तारीख १३ आहे. महाराजांना १३ हा अंक विशेष प्रिय आहे. याचा अर्थ सांगताना महाराज सांगत असत; "सब कुछ तेरा, कुछ नही मेरा" हे जीवन व तुझे सारे ऋणानुबंध तुझेच आहेत. तू तुझ्या मागील जन्माचा कर्मभोग घेऊन आला आहेस. तो तुला भोगलाच पाहिजे. कर्मभोगातून मोकळा झाल्याशिवाय तुला ईश्वर प्राप्ती होणार नाही. पुण्यातील स्वारगेटकडून कात्रजकडे जाताना रस्त्यावर, स्वारगेट पासून दोन अडीच किलोमीटर वर डाव्या हाताला एक मठ लागतो. हाच सदगुरू श्री शंकर महाराजांचा मठ! वैशाख शुद्ध अष्टमी - दुर्गाष्टमी. सूर्योदयाबरोबर महाराजांनी आपल्या अवतारकार्याची सांगता केली.
श्री स्वामी समर्थांचे परमप्रिय शिषोत्तम शंकर महाराज
प्रत्यक्ष शिवावतार सद्गुरु श्री शंकर महाराज हे फार विलक्षण अवलिया होते. ते सद्गुरु श्री स्वामींना 'आई' म्हणत असत. योगीराज श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना समोर बसवून सद्गुरुचा महिमा सांगत असत. ते जेव्हा म्हणून अक्कलकोटला येत. तेव्हा आपल्या आईला मुलाने भेटावे अशा प्रेमाने साश्रुमनाने श्री स्वामींच्या समाधीचे दर्शन घेत. तासनतास वटवृक्षाच्या छायेत राहत. संपूर्ण रात्रभर जागरण करीत व रात्रौ गुरूशिष्यांच्या भेटी होत. श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचे एकमेव गुरू आहेत. त्यांच्या स्थानावर आम्ही येऊन सुखावतो. अक्कलकोटला जमलेल्या आपल्या भक्तांना शंकर महाराज सांगत माझे गुरू श्री स्वामी समर्थ यांना नित्य स्मरा ही माझी आज्ञा आहे.
।। श्री स्वामी समर्थ ।।
।। जय शंकर ।।