Shani Jayanti 2025: शनि व मारुती कृपाशिर्वादासाठी कोणती उपासना फलदायी ठरेल? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 12:37 IST2025-05-24T12:36:42+5:302025-05-24T12:37:03+5:30
Shani Jayanti 2025: आज शनी प्रदोष आहे आणि मंगळवारी २७ मे रोजी शनी जयंती, त्यानिमित्त शनी-मारुती उपासना कशी करावी ते जाणून घ्या!

Shani Jayanti 2025: शनि व मारुती कृपाशिर्वादासाठी कोणती उपासना फलदायी ठरेल? वाचा!
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
लहान असताना आपण एक खेळ खेळत असू आठवतंय? डोंगराला आग लागली पळा पळा पळा.... त्या शनी देवांची अशीच अवस्था करून ठेवली आहे ह्या पृथ्वीवर . शनीची इतकी बदनामी करून ठेवली आहे, की साडेसाती, पनवती, दशा, आली की नुसती पळापळ! दिसेल त्या मारुतीच्या मंदिरात जाऊन त्याच्या डोक्यावर तेल घालायचे, ह्या ज्योतिष कडून त्या ज्योतिषाकडे धाव घ्यायची, नवस बोलायचे, काय चाललाय काय हे? शनी काय खाणार आहे की काय आपल्याला?
शनी साडेसाती, पनवती आली, की मारुतीला प्रदक्षिणा घालायच्या ऐवजी लोक ज्योतिषाच्या घराच्या पायऱ्या झिजवतात. नुसती पळापळ चालली असते. कारण आपण केलेल्या सर्व चुकांची छबी आपल्याच चेहऱ्यावर उमटते. मन भयभीत होते आणि आपलेच मन आपल्याला खाते. आपण गेल्या ३० वर्षात काय दुष्कर्म केले ते सगळे आठवते आणि मग उडते ती घाबरगुंडी आणि रात्रीची झोप. आता आपली खैर नाही, हे बरोबर त्यांना माहित असते. त्यांनी गेल्या ३० वर्षात अगणित चुका केलेल्या आहेत. चुकीची कर्म केलेली आहेत, त्यांनाच ही भीती वाटते. जे सरळमार्गी उपासना करणारे आणि कुणालाही न फसवता अहंकार विरहित जीवन जगणारे असतात, ते न घाबरता शनीला शरण जातात, त्यांना शनी देव का त्रास देतील? उलट त्यांना ते बक्षीसच देतील नाही का?
मारुती काय आणि शनी काय आपल्याला कुणीही नीट समजलेच नाहीत, किंबहुना त्यांना आपण समजून घेण्याचा कधीही प्रयत्न केलाच नाही. असाल तिथे नाम घेणे हीच साधना आहे, खरं सांगा, करतो का आपण ती ? जरा वेळ मिळाला की मोबाईल हातात आणि मग insta , फेसबुक सगळे दिमतीला हजर. उपासक जन्माला यावे लागतात असे म्हटले जाते. देवासाठी वेळ नाही आपल्याला. देवाशी व्यवहार करणारे साधक त्याला कसे आवडतील? मुलाचे लग्न व्हावे म्हणून हनुमान चालीसा, कुलदेवीची ओटी ..पुढे काय ? लग्न झाले हुश्श, सुटलो एकदाचे, आता कसला मारुती नि कसली देवी? ऐकवायला वाचायला आवडणार नाही पण हे कटू सत्य आहे.
आपण केलेली उपासना नामस्मरण जे काही करू ते कधीही वाया जात नाही .आपली आधीची काही चुकीची कर्मे असतील तर ती धुण्यासाठी उपयोगी पडते . उपासनेचे मर्मच मुळी संयम आहे. शनीच्या कृपेला मी पात्र कसा ठरेन असे विचार आपल्याला उपासनेची महाद्वारे उघडून देतील. मुळात जे काही करू ते मनापासून.
देवता आपण केलेली उपासना, मन नाही बघत तर आपला हेतू पाहते . हेतू स्वच्छ आणि स्पष्ट असेल तर ती फलित होणारच. चांगल्या हेतूने मागितलेल्या कुठल्याही गोष्टीच्या पूर्ततेसाठी परमेश्वर अनंत हाताने मागे उभा राहतोच राहतो.
अखंड विश्वात एका धुळीच्या कणाचेएवढे आपले अस्तित्त्व, तरी गमजा किती! मोठमोठ्या वल्गना , मी असा मी तसा . सतत मनात द्वेष , मत्सर, निर्भत्सना, राग, दुसऱ्याचे वाईट करण्याची वृत्ती. पण हे सर्व परतून आपल्याच कडे परत येणार आणि म्हणूनच मग घर अशांत कारण मनात अशांतता . सतत दुसऱ्यावर जळण्याची , कुणाचेही चांगले न बघण्याची वृत्ती मग आपले तरी कसे चांगले होणार?
शनी आपल्या आत आहे . शनी आणि गुरूच्या राशी बघा, आयुष्याच्या संध्याकाळी भेटतात आपल्याला , कारण वयाच्या पन्नाशी नंतर मनाने, वृत्तीने जरा परिपक्व व्हा हेच त्यांना सुचवायचे असते. पण आपण बालीशच राहणार . आपल्याला ह्या अध्यात्माची खोली कधी ना उमजणार ना कधी ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार म्हणूनच म्हंटले आहे ना मनुष्य जन्म मिळणे कठीण आणि तो सार्थकी लागणे त्याहून कठीण. सारखे त्या शनीवर आग पाखडून कसे चालेल ? एकदा का साडेसाती संपली की शनी ला विसरून पुन्हा आपण वाटेल तसे वागायला मोकळे, असेच चित्र आणि व्यवहार असतो आपला.
कलियुगात देवाचे अस्तित्व जाणवण्यासाठी मनापासून प्रयत्नशील राहणे, सतत नाम घेणे हा एकच पर्याय आहे आणि तो सहज सोपा आहे. पुन्हा करोना किंवा त्याचा भाऊ आला तर काय करणार आपण? सतत भीतीच्या छायेत वावरणार का आपण? सततचे दडपण आपले शरीर पोखरून अनेक रोगांना आश्रय देतंय, हे लक्षात येतंय का आपल्याला? नामाने विचारांची शुद्धता होईल, भीती दडपण , पडणारी वेडी वाकडी स्वप्ने बंद होतील . कुणाच्या अश्रुना कारणीभूत ठरू नका, कुणाची निंदा नालस्ती , अत्यंत खालच्या दर्ज्याचे राजकारण नको , सुडाची बुद्धी नको , कुणाला हसू नका चेष्टा नको , पुढील वळणावर आपल्याही आयुष्यात काय घडणार माहित नाही आपल्याला.
हनुमान चालीसा २१ दिवस रोज २१ वेळा म्हणा आणि अनुभव घ्या. कुठलाही आजार असो त्याचे मुळासकट उच्चाटन होईल., आत्मविश्वास द्विगुणीत होईल. प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि जगण्यास बळ मिळेल. श्रीरामाचा जप करा त्याना आणि मारुती रायाला समोर बसवा आणि मनापासून शरणागती पत्करून हनुमान चालीसा आनंदाने म्हणा . जीवन बदलून जाईल, ह्यात शंका नाही.
शनीच्या एका कृपादृष्टीसाठी आयुष्य त्याच्या चरणावर समर्पित करा ... ओम शं शनैश्चराय नमः
संपर्क : 8104639230