Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 08:52 IST2025-10-28T08:50:52+5:302025-10-28T08:52:38+5:30

Shani Gochar 2025: शनीची साडेसाती या विचारानेच आपण घाबरतो, पण प्रत्येकाला फळ सारखेच मिळते का? या कठीण काळात काय उपासना करावी ते पाहू. 

Shani Gochar 2025: Is Saturn's transit always hot for your zodiac sign? Let's see the results according to your zodiac sign. | Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ

Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

प्रत्येक ग्रह आपापल्या गतीने बारा राशीतून भ्रमण करत असतो. या भ्रमण काळात ग्रह मार्गी, वक्री आणि स्तंभी अशा वेगवेगळ्या अवस्थांतून जाताना दिसतात. सूर्याच्या ठराविक अंशांच्या जवळ गेल्यास ग्रह अस्तंगत होतो. आज आपण शनि महाराजांचे प्रत्येक भावातून होणारे भ्रमण काय फळ देईल, याचा विचार करूया.

आपल्या प्रत्येकाचे मीन, वृषभ, सिंह असे कोणतेही लग्न (Ascendant) असेल, त्याप्रमाणे शनीचे गोचर भ्रमण पाहावे. थोडक्यात सांगायचे झाल्यास, सध्या शनि मीन राशीत आहे; याचा अर्थ मीन लग्नाच्या लोकांसाठी शनि त्यांच्या प्रथम भावातून भ्रमण करत आहे. किंवा, जर वृषभ लग्न घेतले, तर शनि त्यांच्या लाभ भावातून (Eleventh House) भ्रमण करत आहे. या पद्धतीने प्रत्येक लग्नाचे गोचर पाहावे.

शनीचे गोचर भ्रमण पाहताना, जन्मपत्रिकेतील मूळ शनि कोणत्या भावात आणि नक्षत्रात आहे, तो त्या लग्नासाठी इष्ट आहे की अनिष्ट, हे सर्व पाहावे. यामुळे गोचर कसे फळेल, याचा अभ्यास सोपा होईल. मूळ पत्रिकेतील शनीवरून गोचर शनीचे भ्रमण होत असेल किंवा मूळ पत्रिकेतील शनीकडे गोचर शनि दृष्टी टाकत असेल, तर हे भ्रमण अनेकदा मोठी आव्हाने देणारे ठरते.

शनि: एक जीवनदृष्टी देणारी पाठशाला :

शनि ही एक पाठशाला (School of Life) आहे. एखादे संकट तुम्हाला काहीतरी शिकवत असते, असा दृष्टिकोन ठेवला, तर खऱ्या अर्थाने आपण शनि-राहू या ग्रहांचा सत्कार केला पाहिजे. साडेसातीत तर शनि माणसाच्या मानसिक अवस्थेची उत्तम जडणघडण करत असतो. तो माणसाला कणखर बनवतो, आव्हाने पेलायला शिकवतो आणि आरामात बसलेल्यांना उठवून कामाला लावतो. शनि आपल्या आयुष्याला व विचारांना केवळ योग्य वळण लावत नाही, तर आपला एखाद्या व्यक्तीकडे किंवा घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो. अनन्य भावाने सद्गुरू आणि शनि महाराजांना शरण गेल्याशिवाय आयुष्याच्या कर्ज (ऋण) आणि धनात्मक (अधिक) बाजू उकलणार नाहीत, हे नक्की. 'मी तुझ्यासोबत आहे,' असे सांगणारे संकटसमयी खरोखरच आपल्यासोबत असतात का, याचे स्वच्छ आणि खरे चित्र फक्त शनिच प्रतिबिंबित करू शकतो.

शनि हा एक आयुष्यभराचा अभ्यास आहे. एवढे सर्व सोपे असते, तर अजून काय हवे होते! पण, एखाद्या गोष्टीचा धसका घ्यावा इतका काही तो वाईट नाही. छडी मारणारे मास्तर आपल्याला आवडत नाहीत, पण त्यामागे असलेला त्यांचा आपल्याला घडवण्याचा उदात्त हेतू आपल्या कधीच लक्षात येत नाही, हीच खरी शोकांतिका आहे.

'आपण एकटे आलो आहोत आणि एकटेच जाणार आहोत' हा विचार म्हणजे शनि आहे. वयाच्या ५०-५२ नंतरचा वानप्रस्थाश्रम (निवृत्तीनंतरचा काळ) असतो, जिथे सर्व प्रपंचातून जीव काढून घेऊन सद्गुरूंचे चरण दिसावेत, हेच शनि-गुरू शिकवतात. म्हणूनच, आयुष्याच्या संध्याकाळी शनि-गुरू पत्रिकेत भाग्य भावाकडून येतात.

शनीच्या गोचर भ्रमणाचे प्रत्येक भावानुसार फळ (सादरीकरण):

शनीचे प्रथम भावातील (लग्न) भ्रमण हे तुमच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू करते, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक कुरबुरी वाढतात. द्वितीय भावातून शनि गेला तर तो कुटुंब आणि धन भावात समस्या निर्माण करतो, ज्यामुळे कौटुंबिक हेवेदावे वाढतात आणि आर्थिक डोलारा डगमगतो—म्हणून मोठे आर्थिक निर्णय टाळावेत. तृतीय भाव हा पराक्रमाचा उपचय भाव असल्याने इथले शनीचे भ्रमण विशेष वाईट जात नाही, पण तृतीयेश बिघडला असल्यास भावंडांमध्ये मतभेद होतात.

चतुर्थ भावातून शनि भ्रमण करताना तो तुमच्या सुख-शांतीवर घाला घालतो, ज्यामुळे मनःस्वास्थ्य बिघडते, कौटुंबिक कलह होतो आणि आईच्या आरोग्याची चिंता वाढते. पंचम भावात मुलांच्या चिंता निर्माण होतात. षष्ठ भावात शनि आजारपण देईल, पण आर्थिक गोष्टींसाठी वाईट नाही. सप्तम भावात वैवाहिक जीवनात वादळे निर्माण होतात, पण मूळ पत्रिकेत शनि सप्तमात असल्यास त्रास कमी होतो. अष्टम भावातून शनीचे भ्रमण म्हणजे चिंता, शारीरिक पीडा, सतत कुरबुरी आणि मानहानी घेऊन येते.

नवम भावातील (भाग्य) शनि अनेकदा पित्यासंबंधी चिंता देतो. दशमातील शनि नोकरी-व्यवसायात संकटे, अचानक बदल आणि अधिक कष्ट देईल. लाभातून (एकादश भाव) जाताना मित्रांकडून त्रास, फसवणूक आणि जवळच्या लोकांशी संबंधांमध्ये वितुष्ट निर्माण होईल. व्यय भाव (द्वादश) हा खर्च वाढवणारा असतो, मग तो मानसिक, आर्थिक असो वा शारीरिक. या काळात अनाठायी खर्च वाढू शकतो किंवा दवाखाना मागे लागतो.

कर्मशुद्धी हाच उपाय : 

आपला कर्म भाव हा शनीकडे आहे. त्यामुळे मूळतः आपल्या पत्रिकेत शनि कुठे आहे, साडेसाती आहे का किंवा अजून काही, याचा विचार न करता आयुष्यभर सत्कर्म करत राहणे हेच उचित आहे आणि ते आपल्या नक्कीच हातात आहे. समोरचा काय करतो यावर आपले नियंत्रण नसले तरी मी माझी कर्मे शुद्ध ठेवणार, हे तर आपल्याच हाती आहे ना?

उगीच कुणाची निंदा-नालस्ती, खोटेपणा, राजकारण, घरातील वयस्कर मंडळींना त्रास देणे, कुणाची बदनामी करणे, गैरमार्गाने मिळवलेला पैसा किंवा व्यसने हे सर्व आपल्याच नाशाला कारणीभूत ठरणार. त्यामुळे आयुष्यभर अखेरच्या श्वासापर्यंत शनि महाराजांची सेवा आणि त्यांना अभिप्रेत असलेले उत्तम कर्म करत राहिलो, तर साडेसाती ही शुभ फलदायी होईल, ह्यात दुमत नसावे.

शनीचे खरे स्वरूप: विलंब नव्हे, तर योग्य वेळ :

साडेसाती किंवा अन्य शनीचे भ्रमण हे आपल्या कर्मांचाच हिशोब ठेवत असते. जसे कर्म, तसे फळ, हा साधा सोपा नियम आहे. आपण सगळ्यांना फसवू शकतो, पण स्वतःच्या मनाला आणि ज्याने जन्माला घातले आहे त्या परमेश्वराला नाही फसवू शकत.

ज्या भावात शनि असतो, तिथून शनि ३, ७, १० या दृष्टीने ज्या-ज्या भावांकडे पाहतो, तिथे प्रश्न निर्माण होतात. 'शनि विलंब करतो' हा त्यावर ठेवलेला ठपका चुकीचा आहे. तो विलंब आपल्याला वाटतो, कारण आपल्याकडे जराही संयम नाही. पण, शनि ज्या गोष्टी आणि घटना घडवतो, तीच वेळ आपल्यासाठी योग्य असते. हे आपल्याला कधीच कळत नाही आणि आपण समजून सुद्धा घेत नाही, हे आपले दुर्दैव आहे. शनि आपले भलेच करत असतो. लवकर एखादी घटना घडवून, ती पुढे जाऊन बिघडणारी किंवा त्रासदायक ठरणारी असेल, म्हणून ती योग्य वेळ फक्त शनि महाराजांनाच माहित असते.

कर्म उत्तम करत राहणे महत्त्वाचे आहे, कारण त्याचा हिशोब होतोच. आणि तो जेव्हा होतो, तेव्हा त्यातून ब्रम्हदेवसुद्धा आपल्याला वाचवू शकत नाहीत. भल्या-भल्यांना जागेवर बसवणारा शनि, आपल्या चुकीच्या कर्मांची शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही, मग तो कोणीही असो. तिथे दुजाभाव नसतो.

शनीची साडेसाती किंवा महादशा हे आयुष्यातील खडे बोल (कठीण सत्य) आणि उत्तम धडे शिकवणारा काळ आहे. त्यातून तावून-सुलाखून जो निघतो, तो अखेर शनि महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो.

संपर्क : 8104639230

Web Title : शनि गोचर 2025: क्या शनि का गोचर हमेशा बुरा होता है? जानें प्रभाव

Web Summary : शनि का गोचर प्रत्येक राशि को अलग तरह से प्रभावित करता है, हमेशा नकारात्मक नहीं। यह एक जीवन का सबक है, जो दृष्टिकोण को आकार देता है और सच्चाई को उजागर करता है। अच्छे कर्म महत्वपूर्ण हैं; शनि शुद्ध कर्मों वालों को पुरस्कृत करता है और दुष्कर्मों को दंडित करता है, जो अमूल्य जीवन सबक प्रदान करता है।

Web Title : Shani Gochar 2025: Is Saturn's transit always bad? Effects explained.

Web Summary : Saturn's transit impacts each zodiac sign differently, not always negatively. It's a life lesson, shaping perspectives and revealing truths. Good deeds are crucial; Saturn rewards those with pure actions and punishes misdeeds, offering invaluable life lessons.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.