उत्तम आध्यात्मिक बैठक असल्याने काळ्या पाण्याची खडतर शिक्षा सावरकरांनी सहज भोगली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 11:34 IST2025-05-28T11:33:43+5:302025-05-28T11:34:38+5:30

आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती, त्यांची राष्ट्रवादी भूमिका आपण जाणतोच, पण अध्यात्माचे संस्कार त्यांच्यावर कधी आणि कसे झाले तेही जाणून घेऊ. 

Savarkar easily endured the harsh punishment of kala pani because of the good spiritual base! | उत्तम आध्यात्मिक बैठक असल्याने काळ्या पाण्याची खडतर शिक्षा सावरकरांनी सहज भोगली!

उत्तम आध्यात्मिक बैठक असल्याने काळ्या पाण्याची खडतर शिक्षा सावरकरांनी सहज भोगली!

ज्या कालखंडामध्ये भारतामधली बहुतांशी माणसं इंग्रजांसाठी चंदनासारखी झिजत होती, अशा वेळी हा भूलथापांनी फसवणारा इंग्रज आपला शत्रू आहे, हे वयाच्या चौदाव्या वर्षी एका तरुणाने अचूक ओळखले आणि आपण जो मार्ग अवलंबला, तो योग्यच होता ह्या मताशी वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत जे ठाम राहिले, ते होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर! आज त्यांची जयंती.

सुखवस्तू घरात जन्माला येऊन, उच्चशिक्षण घेऊन, कुटुंबकबिला सांभाळत आनंदात जीवन व्यतीत करायचे सोडून सावरकर कुटुंबीयांनी घरावर तुळशीपत्र ठेवले. त्यांची पुढची पिढी अर्थात विनायक सावरकरांचा सुपुत्र प्रभाकर अवघा सहा महिन्यांचा असताना आजारी पडून देवाघरी गेला, त्यावर शोक व्यक्त करण्याऐवजी सावरकर आपल्या वहिनीचे पत्राद्वारे सांत्वन करताना लिहितात, 

अनेक फुले फुलती। फुलोनिया सुकोनी जाती।
कोणी त्यांची महती गणती। ठेवली असे।।
परी जे गजेंद्रशुंडेने उपटीले। श्री हरीसाठी मेळे।।
कमल - फूल ते अमर ठेले । मोक्षदायी पावन।।
त्या पुण्यगजेंद्रासमयी । मुमुक्षु स्थिती भारतीची ।।
करुणारवे ती याची । इंदीवरशामा श्रीरामा।।

त्यानुसार सावरकर कुटुंब पुष्प देशकार्यात कामी आले आणि त्याचे निर्माल्य झाले असे समजू. 

अशा काव्यप्रतिभेतून कणखर सावरकरांची आध्यात्मिक बाजू आपल्या समोर येते. नव्हे, तर ती पदोपदी दिसते. सावरकरांवर बालपणापासूनच आध्यात्माचे संस्कार झाले होते. आईची छत्रछाया बालपणीच हरपली, परंतु वडील, वडीलबंधू आणि येसू वहिनी यांच्या सान्निध्यात सावरकरांचा आध्यात्मिक पिंड चांगलाच निपजला होता. अशातच त्यांनी बालवयात भगवद्गीता, रामायण, महाभारतापासून अनेक ग्रंथांचा, चरित्रांचा अभ्यास केला होता, त्यामुळे त्यांची वैचारिक बैठक पक्की झाली होती. 

सावरकरांच्या आध्यात्मिक शक्तीने त्यांना पदोपदी साथ दिली. काळ्या पाण्याची खडतर शिक्षा भोगण्याचे सामर्थ्य मिळाले. तिथल्या तुरुंगवासात त्यांनी केलेली काव्यरचना, पाठांतर, चिंतन, मनन या गोष्टींमुळे ते त्याही कठीण परिस्थितीत तग धरू शकले. 

मातृभूमीला आई मानून तिच्या स्वातंत्र्याचा त्यांनी ध्यास घेतला होता. परदेशात गेल्यावर आईशी झालेली ताटातूट त्यांना व्याकुळ करत असे. `ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' असे ते सागराला विनवित असत. 

प्रखर हिंदुत्व जाणणारे आणि मानणारे सावरकर अशी त्यांची ओळख असली, तरी हिंदूत्त्वामागील त्यांचा विचार व्यापक होता. त्यांना जातपातरहित हिंदुत्व अपेक्षित होते. रत्नागिरीच्या पतितपावन मंदिरात त्यांनी सर्व प्रकारच्या जातिबांधवांना प्रवेश मिळवून दिला, सहभोजन केले आणि माणसाने माणसांना माणुसकीने वागवले पाहिजे, ही शिकवण घालून दिली.

संपूर्ण आयुष्य मातृभूमीच्या कार्यार्थ वेचून झाल्यावर आपल्या आयुष्याची इतिश्री करताना प्रायोपवेशनाचा मार्ग त्यांनी अवलंबिला होता आणि आपलं उदात्त कार्य मागे ठेवून ते भारतमातेच्या कुशीत कायमचे विसावले. 

Web Title: Savarkar easily endured the harsh punishment of kala pani because of the good spiritual base!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.