प्रकट दिन: शेगावीचा राणा, ब्रह्मज्ञानी, भक्तवत्सल गजानन महाराज; म्हणा, गण गण गणात बोते!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 02:21 PM2024-03-02T14:21:00+5:302024-03-02T14:22:13+5:30

Gajanan Maharaj Prakat Din 2024: गजानन महाराज प्रकट दिन देश-विदेशात मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो.

sant gajanan maharaj prakat din 2024 know about incarnation work of gajanan maharaj | प्रकट दिन: शेगावीचा राणा, ब्रह्मज्ञानी, भक्तवत्सल गजानन महाराज; म्हणा, गण गण गणात बोते!

प्रकट दिन: शेगावीचा राणा, ब्रह्मज्ञानी, भक्तवत्सल गजानन महाराज; म्हणा, गण गण गणात बोते!

Gajanan Maharaj Prakat Din 2024: विदर्भाची पंढरी आणि शेगावीचा राणा, शेगावीचे संत म्हणून ज्यांची ओळख आहे, असे गजानन महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रविवार, ०३ मार्च २०२४ रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे. गजानन महाराज प्रकट दिन केवळ महाराष्ट्रात नाही, तर देश-विदेशातील भाविकांकडून साजरा केला जातो. यानिमित्त शेगाव येथे शेकडो दिंड्यांचे आगमन होते. टाळ मृदुंगाच्या गजराने विदर्भ पंढरी शेगाव नगरी दुमदुमन जाते. यानिमित्त गजानन महाराजांच्या चरित्राचा घेतलेला अगदी थोडक्यात आढावा...

माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे.  श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण होते, अशी दंतकथा आहे. बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने 'आंध्रा योगुलु' नावाच्या पुस्तकात गजानन महाराज तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे, असे सांगितले जाते. गजानन महाराज अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले ब्रह्मवेत्ते महान संत होते. त्यांचे जीवन मोठे गूढच होते. विदेही स्थितित वावरणारे गजानन महाराज परमहंस संन्यासी, जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत. भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करत, असा सर्व भक्तांचा अनुभव होता. 'गण गण गणात बोते', हा त्यांचा आवडता मंत्र. ते याचा अखंड जप करत असत. या कारणानेच त्यांना 'गिणगिणेबुवा', 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वर्‍हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात.

अद्वैत सिद्धांतवादी महाराज

महाराज हे अद्वैतसिध्दांतवादी होते. त्यांनी कोणालाही कधीच मंत्रदीक्षा दिली नाही. महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे सांगितले. आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ गजानन महाराजांनी शेगांवमध्ये व्यतीत केला. तरीही आवश्यकतेप्रमाणे ते अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या लहानमोठ्या गावातही जात. उन्हापावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरश: धावावे लागे. महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात. 

दांभिकतेचा तिरस्कार करणारे ब्रह्मज्ञानी, भक्तवत्सल गजानन महाराज 

गजानन महाराज ब्रह्मज्ञानी, महान योगी, भक्तवत्सल होते. मात्र, दांभिकतेची त्यांना चीड येत असे. विठोबा घाटोळ नावाच्या सेवेकऱ्याने महाराजांच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना घुमारे घालणे, अंगात आल्याचे नाटक करून फसविण्याचे प्रकार सुरू केले, तेव्हा महाराजांनी त्याला काठीने चांगलेच बदडून काढले. गजानन महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या , पिठीसाखर अतिशय आवडत असे. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने ते सेवन करीत. ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले, असे पदार्थ महाराज आवडीने खात असत.

लोकमान्य टिळक-गजानन महाराज भेट

लोकमान्य टिळक यांनी गजानन महाराजांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवजयंतीनिमित्त झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य टिळकांना कैद झाली, त्यावेळी महाराजांनी त्यांच्याकरिता भाकरीचा प्रसाद पाठविला आणि भविष्य वर्तवले की, टिळकांना शिक्षा अटळ आहे. महाराजांच्या भविष्यवाणीनुसार, ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी 'गीतारहस्य' ही भगवदगीतेवर टीका लिहिली. गजानन महाराज  कोणत्याही घटनेविषयी सांगताना अचूकपणे ओव्या व ऋचा सांगून त्यांचे स्पष्टीकरण करीत असत. महाराज अंतर्ज्ञानी होते. त्यांनी कोणत्याही भक्ताशी थेटपणे फारसा संवाद साधला नाही. त्यांचे बोलणे भरभर, परंतु त्रोटक असे. बोलत असताना समोरील व्यक्तीकडे न पाहता भिंतीकडे पाहत किंवा स्वत:मध्ये मग्न राहून ते बोलत असत. अनेक लोकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. 

अवतार समाप्ती

गजानन महाराजांना पंढरीलाच समाधी घेण्याचा मानस होता. मात्र, विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले. ०८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीला सूर्याची पहिली किरणे जमिनीवर पोहोचली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. विठ्ठलाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते. देहू ,आळंदीनंतर याच पालखीला सर्वाधिक महत्त्व आहे. गजानन महाराजांचे समाधीस्थान असलेले शेगाव संस्थान जगाच्या नकाशावर दिमाखात उभे आहे. सर्व मंदिर व्यवस्थापनांना शिस्त, स्वच्छता आणि उत्तम व्यवस्थापन यासाठी शेगाव संस्थानाने एक आदर्शच घालून दिला आहे.

श्री गजानन, जय गजानन।।

गण गण गणात बोते ।।
 

Web Title: sant gajanan maharaj prakat din 2024 know about incarnation work of gajanan maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.