स्वच्छतेकडून समृद्धीकडे! गाडगे बाबांनी हातात झाडू घेऊन समाजमनाला शिकवण कशी दिली? वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 07:10 IST2026-02-23T07:07:01+5:302026-02-23T07:10:02+5:30

आज संत गाडगे महाराजांची जयंती, त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यातून केलेल्या लोकशिक्षणाचा आढावा आणि जाणून घेऊ त्यांची दशसूत्री!

Sant Gadge Maharaj Jayanti: Legend of Hygiene & Social Reform | स्वच्छतेकडून समृद्धीकडे! गाडगे बाबांनी हातात झाडू घेऊन समाजमनाला शिकवण कशी दिली? वाचा 

स्वच्छतेकडून समृद्धीकडे! गाडगे बाबांनी हातात झाडू घेऊन समाजमनाला शिकवण कशी दिली? वाचा 

सोमवार २३ फेब्रुवारी, समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेवर आपल्या कीर्तनातून आसूड ओढणाऱ्या संत गाडगे महाराज यांची जयंती. महाराष्ट्राच्या मातीतील हे एक असे संत होते, ज्यांनी पंढरीच्या विठ्ठलाला माणसांत शोधलं आणि मूर्तीपूजेपेक्षा 'माणुसकीची सेवा' श्रेष्ठ मानली.

संत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गौरवशाली कार्याचा हा आढावा:

१. 'हातात झाडू आणि खांद्यावर गाडगं' : एक अनोखी क्रांती

गाडगे महाराजांची शिकवण ही केवळ शब्दांत नव्हती, तर ती कृतीत होती. ते ज्या गावात जात, तिथे आधी हातात झाडू घेऊन रस्ते आणि नाल्या स्वतः साफ करत. "गाव स्वच्छ झालं की मन स्वच्छ होतं," असं ते म्हणत. त्यांच्या या कृतीने गावकऱ्यांना स्वच्छतेचं महत्त्व आपोआप पटायचं.

२. शिक्षणाचे महत्त्व: "भाकरी अर्धी खा, पण मुलांना शाळेत पाठवा"

गाडगे महाराज हे शिक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांनी दीन-दलितांच्या आणि बहुजन समाजाच्या मुलांसाठी अनेक शाळा आणि वसतिगृहे बांधली. त्यांनी सांगितलं की, जोपर्यंत समाज सुशिक्षित होत नाही, तोपर्यंत दारिद्र्य आणि अंधश्रद्धा नष्ट होणार नाही.

३. अंधश्रद्धेवर प्रहार: "देव दगडात नाही, तर भुकेल्या माणसात आहे"

त्यांच्या कीर्तनाची पद्धत अत्यंत साधी पण प्रभावी होती. ते लोकांना विचारत, "दगडाला नैवेद्य दाखवता, तो दगड जेवतो का? मग त्याऐवजी एखाद्या भुकेल्या माणसाला का भरवत नाही?" त्यांनी कर्मकांडापेक्षा गोरगरिबांच्या सेवेला 'खरा धर्म' मानलं.

४. जनसेवेसाठी आयुष्य अर्पण

गाडगे महाराजांनी आयुष्यभर स्वतःसाठी घर बांधलं नाही, पण समाजासाठी धर्मशाळा, दवाखाने आणि अनाथालये उभी केली. त्यांनी दिलेली 'दशसूत्री' आजही मानवासाठी मार्गदर्शक आहे:

भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्यांना वस्त्र, गरिबांना शिक्षण, आजारी लोकांना औषधोपचार... हीच खरी ईश्वरसेवा!

संत गाडगे महाराजांची १० सूत्रे (दशसूत्री):

१. भुकेल्यांना अन्न द्या.
२. तहानलेल्यांना पाणी द्या.
३. उघड्या नागड्यांना वस्त्र द्या.
४. गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत करा.
५. बेघरांना ओवारा (आश्रय) द्या.
६. अंध, पंगूंना मदत करा.
७. बेकारांना काम द्या.
८. मुक्या प्राण्यांना अभय द्या.
९. गरीब मुलामुलींचे लग्न लावून द्या.
१०. दुःखी आणि नैराश्येतील लोकांना हिंमत द्या.

Web Title: Sant Gadge Maharaj Jayanti: Legend of Hygiene & Social Reform