Sankashti Chaturthi 2025: यंदा संकष्टीला म्हणा 'ही' आगळी वेगळी तरी सुरेल गणेश आरती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 07:00 IST2025-04-15T07:00:00+5:302025-04-15T07:00:00+5:30

Sankashti Chaturthi 2025: १६ एप्रिल रोजी संकष्टी आहे. त्यानिमित्त कोकणपट्ट्यात म्हटली जाणारी गणेश आरती जाणून घेऊ.

Sankashti Chaturthi 2025: Celebrate Sankashti this year with this different yet melodious Ganesh Aarti! | Sankashti Chaturthi 2025: यंदा संकष्टीला म्हणा 'ही' आगळी वेगळी तरी सुरेल गणेश आरती!

Sankashti Chaturthi 2025: यंदा संकष्टीला म्हणा 'ही' आगळी वेगळी तरी सुरेल गणेश आरती!

एखादे रणवाद्य वाजवावे आणि उत्साहाचा संचार व्हावा, तसे काहीसे घुमट आरती ऐकल्यावर होते. वीरश्री संचारते. नेहमीची 'सुखकर्ता दुखहर्ता' ही आरती गौरव गीत भासू लागते. एवढी ताकद आहे 'घुमट' नावाच्या वाद्यात आणि त्याच्या तालावर बांधलेल्या चालीत! त्या लयीत आणखीही आरती गायल्या जातात. कोकणवासियांसाठी भजन, कीर्तन, आरती हा जिव्हाळ्याचा विषय असल्यायन ते साग्रसंगीत सादरीकरण करतात. घुमट आरती म्हणतानाही घुमट, टाळ, पखवाज आणि पायपेटीचा भरणा यामुळे आरती रंगत जाते. ते ऐकताना तल्लीनता जाणवते. ही आरती कधी प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला तर तो दवडू नका, तोवर युट्युबवर आरतीचे अनेक व्हिडीओ ऐकता येतील. तत्पूर्वी घुमट या वाड्याबद्दल अधिक जाणून घेऊ. 

लेखक पांडुरंग फळदेसाई मराठी विश्वकोश या संकेतस्थळावर माहिती देतात, घुमट हे गोवा आणि कोकणातील एक पुरातन स्वरूपाचे अवनध्द वर्गवारीतील लोकवाद्य. याचा आकार मडकीसारखा असतो; परंतु या मातीच्या मडकीची दोन्ही तोंडे उघडी असतात. एका तोंडाचा व्यास १५ ते २० सें. मी. तर लहान तोंडाचा व्यास १० ते १२ सें. मी. असतो. मोठया तोंडावर घोरपडीचे कातडे वनस्पतीच्या चिकाच्या सहाय्याने ताणून बसवितात. तो ताण कायम राहाण्यासाठी तोंडाच्या काठावर दोरीचा वापर केला जातो. नंतर कातडे सुकेपर्यंत ते सावलीत ठेवून देण्यात येते. घुमटाच्या दोन्ही तोंडांवर दोरी ओवून ती वादकाच्या खांद्यावर अडकविली जाते. कातडे मढविलेल्या तोंडावर थाप मारून व बोटे आपटून घुमट वाजवितात. त्यावेळी छोटया तोंडावर दुसरा हात ठेवून घुमटातील हवेचा दाब नियंत्रित केला जातो. त्यामुळे वाद्यापासून निर्माण होणाऱ्या आवाजात वैविध्य येते.

घुमट हे तालवाद्य म्हणून वापरतात. गोव्यातील बहुतेक सर्व लोकोत्सव आणि मंदिरातील उत्सवांमधून हे वाद्य प्रामुख्याने वाजविण्यात येते. शिगमो, गणेशचतुर्थी, मांडो-धुलपद, विवाहप्रसंगीचे नृत्यसोहळे, मंदिरातील आरत्या अशाप्रसंगी घुमटवादन केले जाते. घुमट हे वाद्य स्वतंत्रपणे वाजविले जात नाही. घुमटाच्या साथीला शामेळ अथवा समेळ, कांसाळे आणि सोबत लोकगीतांचे गायनही केले जाते. शिगमोसारख्या उत्सवाच्या वेळी सनई आणि सूर्त किंवा सूर या वाद्यांचीही साथसंगत पुरविली जाते. घुमटाच्या विशिष्टवादन प्रकाराला सुंवारी म्हणतात. घुमणारा घट किंवा घुमणारा माठ अशी घुमट या शब्दाची उत्पत्ती सांगितली जाते. घुमट वाजविणारे कलाकार गोव्याच्या प्रत्येक गावात आहेत. किंबहुना युवावर्गातील घुमटवादकांची शेकडो पथके गोव्याच्या गावागावातून विखुरलेली दिसतात. घुमटवादन आणि घुमटावरील आरती-गायनाच्या अनेक स्पर्धा व उपक्रम गोव्यात संपूर्ण वर्षभर अधूनमधून चालू असतात. घुमट हे आदिम परंपरेतील लोकवाद्य असल्याने ते गोमंतकीय अस्मितेचे एक प्रतीक मानण्यात येते.

Web Title: Sankashti Chaturthi 2025: Celebrate Sankashti this year with this different yet melodious Ganesh Aarti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.