Sankashti Chaturthi 2023: सोमवारी संकष्टी; वाचा चंद्रोदयाची वेळ आणि चंद्रदर्शन घेऊन उपास सोडण्याचे महत्त्व!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 15:29 IST2023-05-06T15:29:23+5:302023-05-06T15:29:56+5:30
Sankashti Chaturthi 2023: अनेक भाविक संकष्टीचा उपास करतात, मात्र हा उपास चंद्र दर्शन घेऊनच सोडायचा असतो; पण असे का? ते जाणून घ्या!

Sankashti Chaturthi 2023: सोमवारी संकष्टी; वाचा चंद्रोदयाची वेळ आणि चंद्रदर्शन घेऊन उपास सोडण्याचे महत्त्व!
८ मे २०२३ संकष्ट चतुर्थी आहे. रात्री ०९. ५३ मिनिटांनी चंद्रोदय आहे. सगळे भाविक चंद्र दर्शन घेऊन मगच संकष्टीचा उपास सोडतात. पण या प्रथेचे आपण पालन का करतो आणि चंद्रोदय झाल्यावरच उपास का सोडतो, ते जाणून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
अलीकडे संकष्ट चतुर्थी करणारे बरेच लोक आहेत. कलियुगामध्ये गणपतीची व देवीची उपासना वाढेव व ती फलद्रुप होईल. `कलौ चंडी विनायकौ' असे समर्थांनी म्हटले आहे, तसे दृश्य आता दिसू लागले आहे. समर्थांचे ते वचन खोटे ठरणारे नाही. लोकांची श्रद्धा उत्तरोत्तर वाढत आहे.
दुसरे म्हणजे या मनस्वी धकाधकीच्या जीवनात लोकांना मन:शांतीसाठी दुसरी जागा व मार्ग नाही. मन:शांती मिळवण्यासाठी मंदिरात गेले पाहिजे, काही उपासना केली पाहिजे, हे लोकांना आता पटत आहे.
चतुर्थी कशी असावी? अनेकांना प्रश्न पडतो, की संध्याकाळपर्यंतच काय सूर्यास्तानंतरही काही वेळ तृतीया असते. तर या दिवशी संकष्टी का? उपाषण तर तृतीयेमध्ये होते. तरीही संकष्टी त्याच दिवशी करायची असते. हे व्रत चतुर्थी प्रधान आहे. याबाबत पुराणात एक कथा आहे.
गणेशाचे जे स्वरूप आहे ते चंद्राला नीट कळले नाही. चंद्राने गणेशाची टवाळी केली. त्यावर गणपतीने त्याला शाप दिला. तुझे तोंड कोणी पाहणार नाही. हा शाप देण्यामागचे कारण एवढेच होते, की कोणीही कोणाच्या व्यंगावर हसू नये आणि कोणाला कमी लेखू नये. चंद्राला त्याच्या चुकीची जाणीव झाली. गणपतीने त्याला क्षमा करत उ:शाप दिला, की गणेश चतुर्थीला तुझे दर्शन कोणी घेणार नाही पण संकष्टीला तुझे दर्शन घेतल्याखेरीज कोणी उपास सोडणार नाही.
गणेशाने दिलेल्या शब्दाचे पालन सर्व भक्त करतात. चतुर्थीला चंद्र दर्शन घेऊन उपास सोडतात. काही जण एकादशीप्रमाणे दोन्ही वेळ उपास करतात. परंतु संकष्टीच्या व्रतात दोन्ही वेळचा उपास अपेक्षित नाही. म्हणून चंद्रदर्शन झाल्यावर काहीच नाही, तर निदान भात खाऊन उपास सोडावा.
उपास सोडण्यापूर्वी चंद्रोदयाची वेळ पाहून चंद्र दर्शन घ्यावे. गणेशाचे दर्शन घ्यावे. त्याला दुर्वा व फुले वाहावीत. आरती म्हणावी. मोदकांचा आणि जेवणाच्या ताटाचा नैवेद्य दाखवावा. संकष्ट चतुर्थीचे दिवसभराचे व्रत पूर्ण करून सहभोजनाचा आनंद घ्यावा. त्यामुळे तुम्हीदेखील संकष्टीचा उपास सोडण्याआधी चंद्रदर्शन घ्यायला विसरू नका.