samarth ramdas swami says that this is the right way to demand god | देवाकडे नेमके कसे मागणे मागावे? समर्थ रामदास स्वामींनी सांगितली योग्य पद्धत; वाचा...

देवाकडे नेमके कसे मागणे मागावे? समर्थ रामदास स्वामींनी सांगितली योग्य पद्धत; वाचा...

रामाला व हनुमंताला उपास्य मानून परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम याची शिकवण अधिकार वाणीने देणारे संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी. माघ कृष्ण नवमीला 'दासनवमी' असे म्हणतात. या दिवशी समर्थ रामदास स्वामी समाधीस्त झाले. सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य या दोन्हींचे महत्त्व पटवून देणारे समर्थ रामदास महाराष्ट्रातील एकमेव संत होते, असे सांगितले जाते. रामदास स्वामींनी भक्तीसोबत शक्तीची उपासना करणारे शिष्य घडवले. एका प्रसंगात समर्थ रामदास स्वामी यांनी देवाकडे मागणे मागायची योग्य पद्धत कोणती याविषयी शिष्यांना मार्गदर्शन केले. समर्थ रामदास स्वामींनी त्या काळात केलेले मार्गदर्शन आताच्या घडीलाही समाजासाठी बोधप्रद ठरणारे आहे. जाणून घेऊया...

पहाटेच्या समयी चिंतनाला बसून देवाचे नामस्मरण करण्याचा रामदास स्वामींचा नित्यक्रम. नामस्मरणाला बसले की, स्वामींची मुद्रा ही अगदी स्थितप्रज्ञासारखी असे. एके दिवशी न राहून एका शिष्याने समर्थांना विचारेल की, आपण देवाचे नामस्मरण करताना आपल्या चेहऱ्यावर अतिशय शांततेचा भाव कसा येतो? आपण जरादेखील विचलित होत नाहीत? मनात आपण नेमका काय विचार करीत असता? मनातील विचारांचा लवलेशही चेहऱ्यावर येत नाही, हे कसे शक्य होते? असे काही प्रश्न एकामागून एक शिष्याने विचारले. 

कधी आहे महाशिवरात्री? पाहा, मुहूर्त, महत्त्व आणि मान्यता

यावर समर्थ रामदास स्वामी शिष्याला म्हणाले की, एकदा एका राजाच्या राजमहालाबाहेर एका भिक्षुकाला उभे असलेले पाहिले. भिक्षुकाच्या अंगावर संपूर्ण अंग झाकू शकेल, इतकेही वस्त्र नव्हते. तसेच त्या वस्त्राला अनेक ठिकाणी चिंध्या जोडलेल्या होत्या. अनेक दिवसांपासून भिक्षुक जेवलेला नसेल, हे स्पष्टपणे दिसत होते. मात्र, भिक्षुकाच्या डोळ्यात तेज होते. शारीरिक कष्ट सोसलेला तो भिक्षुक किमान उभा तरी कसा काय राहू शकत होता, याचे आश्चर्य पाहणाऱ्यांना वाटत होते. तो भिक्षुक केव्हाही खाली कोसळेल, अशा स्थितीत ताटकळत उभा असताना तेवढ्यात राजा बाहेर आले आणि भिक्षुकाला विचारले की, सांग, तुला काय हवे आहे?

राजाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भिक्षुक म्हणाला की, आपल्या द्वारावर माझ्या ताटकळत उभे राहण्याचा अर्थ आपल्याला समजत नसेल, तर यावर मला काहीही बोलायचे नाही. मी आपल्यासमोर आहे. माझी मागणी काय असू शकेल, याचा आपणच अंदाज बांधलेला बरा. माझी उपस्थिती हीच माझी प्रार्थना आहे, असे भिक्षुकाने सांगितले. 

समोर घडलेला तो प्रसंग पाहून, देवाकडे काहीतरी मागायचे सोडून दिले, असे समर्थ रामदास स्वामी म्हणाले. मी परमेश्वराच्या द्वारावर उभा आहे. परमेश्वराचे लक्ष माझ्याकडे जाईल. याउपर मी ईश्वराला अधिक काय सांगायचे? माझी परिस्थिती सर्व काही कथन करू शकत नसेल. तर माझे शब्द ती सांगायला कसे पूरे पडू शकतील? माझी परिस्थिती समजून घेऊ शकले नाहीत, तर माझे शब्दही त्यांना कसे उमगतील? म्हणूनच भावपूर्ण विश्वासातून परमात्म्याचे केलेले नामस्मरण महत्त्वाचे ठरते. यानंतर काहीच मागणे शिल्लक राहत नाही. आपण करत असलेली प्रार्थना, मनापासून केलेले नामस्मरण पूरेसे असते, असे समर्थ रामदास स्वामी शिष्याला म्हणाले.

Web Title: samarth ramdas swami says that this is the right way to demand god

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.