RItuals: पौष मास सुरु आहे म्हणून सगळीच शुभ कार्य पुढे ढकलायची गरज नाही; जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:52 IST2025-01-06T12:52:00+5:302025-01-06T12:52:27+5:30

Rituals: पौष मासाला भाकड मास असेही म्हणतात, या महिन्यात शुभ कार्य टाळली जातात, पण कोणती टाळावी आणि कोणती पाळावी ते जाणून घेऊ. 

RItuals: There is no need to postpone all auspicious activities just because the month of Paush is beginning; know the reason! | RItuals: पौष मास सुरु आहे म्हणून सगळीच शुभ कार्य पुढे ढकलायची गरज नाही; जाणून घ्या कारण!

RItuals: पौष मास सुरु आहे म्हणून सगळीच शुभ कार्य पुढे ढकलायची गरज नाही; जाणून घ्या कारण!

>> विनायक जोशी, दापोली 

वर्षातील बारा महिन्यांपैकी एक असलेला पौष महिना, पण त्याविषयी अनेक समज-गैरसमज आहेत, इतके की पौष सुरु झाला म्हणून अनेक शुभकार्ये पुढे ढकलली जातात तर महत्वाची बोलणी टाळली जातात. नवीन व्यवहार होत नाहीत इतका महिना वाईट असल्याची समजूत असल्याने याची भयंकर भीती जनसामान्यांमध्ये आहे. तर धर्मशास्त्रानुसार हा महिना खरच इतका वाईट आहे का ? याचा घेतलेला हा धांडोळा...

चैत्र माह वर्षारंभातील दहावा महिना तर हेमंत ऋतूतील दुसरा मास म्हणजे पौष महिना. त्याला तैष आणि सहस्य अशी अन्य दोन नावंही आहेत. अधिक मासाला जसं मलमास किंवा धोंडा मास म्हणतात तसं याला भाकडमास म्हटलं जाऊ लागलं. कारण मकर संक्रातीशिवाय या महिन्यात अन्य सण नाहीत, असा सार्वत्रिक समज. मात्र निर्णयसिंधु, धर्मसिंधु या ग्रंथात या महिन्यात करण्याची काही कृत्यं सांगितली आहेत ती अशी -

१) पौष पौर्णिमेपासून पौर्णिमान्त माघ सुरू होतो म्हणून या दिवसापासून माघस्नानाला प्रारंभ करावा.
२) पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा हा शाकंभरी देवीचा महोत्सव (शाकंभरी नवरात्र) शारदीय नवरात्रौत्सवासारखा असतो.
३) पौष शुद्ध अष्टमीला जर बुधवार असेल तर शिवप्रित्यर्थ स्नान, जप, होम तर्पण व ब्राह्मणभोजन करावं.
४) पौष अमावास्येला अधोंदय पर्व आलं असता स्नानदानादी धर्मकृत्यं करावीत.
५) शिवलिंगावर महिनाभर तुपाचा अभिषेक करावा. या शिवापुढे दीपाराधना करावी.
६) पौषाच्या दोन्ही पक्षांतील नवमीला उपवास करून दुर्गेची त्रिकाळ पूजा करावी. दुर्गेची मूर्ती पीठाची करावी व्रतानिमित्त आठ कुमारिकांना भोजन घालावं.
७) महिनाभर एकवेळ उपवास करून जे शक्य असेल ते दान करावं.
८) रवि धनु राशीत प्रवास करून मकर राशीपर्यंत प्रवेश करेपर्यंतच्या कालखंडाला धनुर्मास म्हणतात. धनुर्मास श्रवणासारखाच पवित्र मानला जातो या धनुर्मासाचे काही दिवस पौषात येतात. संपूर्ण धनुर्मासात सूर्योदयापूर्वी देवपूजा व अन्हिकं उरकून देवास महानैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. महानैवेद्यास मुगाच्या डाळीची खिचडी, गुळाची पोळी, बाजरीची भाकरी, वांग्याचे व तिळाचे पदार्थ केले जातात.

वरील विवेचनावरून धार्मिक कार्यासाठी हा महिना निषिद्ध नाही, हे स्पष्ट होतं. राहिला प्रश्न विवाह आणि वास्तुविषयक कार्याचा. पौष महिन्यात रवि धनुत असतात विवाहाचे मुहूर्त घेऊ नयेत असे शास्त्र सांगते, मात्र उर्वरित महिना विवाहासाठी वर्ज्य नाही.पौष महिना शुभकार्यासाठी वर्ज्य आहे ही निव्वळ खुळचट कल्पना असून तिला कसलाही शास्त्राधार नाही. धर्मशास्त्र अभ्यासकांच्या मते पितृपंधरवडाही सर्वच शुभकार्यासाठी वर्ज्यनसतो.पौष महिन्याचा बागुलबुवा करू नये. 

सोप्या आणि सहज भाषेत सांगायचे तर श्रीखंडोबा आणि श्रीम्हाळसादेवी यांचा विवाह पौष महिन्यामध्ये शुक्ल त्रयोदशीला मृग नक्षत्र असताना गोरज मुहूर्तावर पाली येथे होत असतो. त्यामुळे जनसामान्यांना या महिन्यामध्ये विवाह करण्यास हरकत नसावी. गृहप्रवेश आणि वास्तुशांतीसाठी हा महिना अजिबात वर्ज्य नाही. मुख्य घराचं बांधकाम या महिन्यात सुरू करू नये, पण अगोदर सुरू असलेलं बांधकाम थांबवू नये. घराऐवजी कुंपण किंवा अन्य कामे करायला हरकत नाही. घराची दुरुस्ती, रंगरंगोटी, फर्निचर वगैरे करायला हरकत नाही. संपूर्ण महिनाभर घरखरेदी, दागिने खरेदी, प्रवास वा अन्य नैमित्तिक कामं निर्धास्तपणे करावीत.  

काहींच्या मते पौष हे नाव पुष्य नक्षत्रावरून मिळाले असल्याने नक्षत्र स्वामी शनीचा प्रभाव या महिन्यावर असतो आणि शनिग्रह वैवाहिक सौख्यासाठी मारक असल्याने या महिन्यामध्ये विवाह करू नयेत. परंतु प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जे चंद्र नक्षत्र असते त्यावरून त्या महिन्याला नाव मिळाले आहे जसे चित्रा वरून चैत्र, विशाखा वरून वैशाख इत्यादी आणि पौर्णिमेच्या त्या चंद्र नक्षत्राचा त्या महिन्यावर प्रभाव असतो असे ज्योतिष शास्त्राच्या आधारावर सांगतात त्यापैकी पौष पौर्णिमेला पुनर्वसु नक्षत्र असते त्यामुळे हा युक्तिवाद तकलादू आणि न पटण्याजोगा वाटतो. 

पौष महिन्यात शुभकार्य करत नाहीत ही रुढी बनली आहे म्हणून ती पाळावी. कारण शास्त्रात रुढी बलियेसी, असं वचन आहे, असा युक्तिवाद काहीजण करतात. मात्र वरील वचनात हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय असून पेक्षा आणि पासून अशा दोन्ही अर्थानं तो वापरला जातो. म्हणून वरील वचनाचा अर्थ शास्त्रापेक्षा रुढी बलवान असा नसून शास्त्रापासून उत्पन्नच झालेली रुढी बलवान असा काढता येईल. अर्थात जी रुढी शास्त्रापासून उत्पन्नच झाली नाही ती न पाळणंच योग्य. दुसरा वेडय़ांच्या बाजाराला चाललाय म्हणून आपणही निघावं, हे काही खरं नाही.

Web Title: RItuals: There is no need to postpone all auspicious activities just because the month of Paush is beginning; know the reason!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.