Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:32 IST2025-07-17T13:30:54+5:302025-07-17T13:32:54+5:30
Shri Hit Premanand Govind Sharan Ji Maharaj: अनेक महिलांच्या मनात असलेली ही शंका, त्यावर प्रेमानंद महाराजांनी दिलेलं उत्तर तुमच्याही शंकेचं समाधान करू शकेल!

Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
Period During Pilgrimage: पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. नव्हे तर ती निसर्गाने स्त्रियांना दिलेले वरदान आहे असे प्रेमानंद महाराज म्हणतात. याबाबत विशेषण देताना त्यांनी सांगितले, 'मासिक धर्म निंदनीय नाही तर वंदनीय आहे!' स्त्रियांना येणारा मासिक धर्म केवळ त्यांच्या आरोग्यासाठी लाभदायी नसून प्रकृती निर्मितीसुद्धा त्या करू शकतात. त्यामुळे मासिक धर्म हा पवित्रच मानला पाहिजे. मात्र, तीर्थक्षेत्री गेल्यावर पाळी आली तर? एका महिला भाविकेने विचारलेल्या प्रश्नावर प्रेमानंद महाराजांनी अतिशय संयमित उत्तर दिले.
भारतात राहणाऱ्या अनेक स्त्रियांच्या मनात घोळणारा हा प्रश्न आहे. कारण कुठेही सहलीचे बेत आखताना स्त्रियांना मासिक पाळीची तारीख लक्षात घ्यावी लागते. सर्वांचेच मासिक चक्र सुरळीत असते असे नाही, तर अनेक महिलांना एक दोन महिने पाळीच येत नाही. त्यामुळे त्यांना तारखेचे गणित बसवता येत नाही. अशा वेळी तीर्थक्षेत्री जाताना त्यांना विचार करावा लागतो. काही जणी तर धार्मिक स्थळी गेल्यावर पाळी येऊ नये म्हणून पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यासुद्धा घेतात. तसे करणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असते. मात्र देवाचा कोप होईल या भीतीने त्या ही कृती करतात. वास्तविक पाहता यावर उत्तर आहे कामाख्या देवी, जिथे देवी सतीच्या योनीची पूजा केली जाते. एवढेच नाही तर वर्षभरात तिथे देवीचा मासिक धर्म म्हणून चार दिवस मंदिर बंदही ठेवले जाते. अपवित्र म्हणून नाही तर देवीला विश्रांती म्हणून! तर मग अपवित्र होण्याचा प्रश्न कुठून आला? तरीदेखील पापभिरू स्वभावामुळे अनेक जणी या गोंधळात अडकतात आणि देवाच्या पायथ्यापाशी जाऊन परत येतात.
यावर प्रेमानंद माहाराजांनी दिलेले उत्तर निश्चितच चिंतन करण्यास प्रवृत्त करणारे ठरेल. ते म्हणाले, '' एखाद्या तिर्थीक्षेत्री गेल्यावर मासिक पाळी आली तर देवदर्शन घ्यावे की नाही हा संभ्रम मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. तीर्थक्षेत्री जाण्याचे योग वारंवार येत नाहीत. मोठ्या परिश्रमाने शारीरिक, मानसिक, आर्थिक गणित बसवून आपण तिथे पोहोचतो. मात्र तिथे गेल्यावर असा प्रश्न उपस्थित झाला तर अशा वेळी दर्शन टाळणे म्हणजे तोंडाशी आलेला घास दूर करण्यासारखे आहे. ज्याच्या दर्शनासाठी आलो आहे, त्याचे दुरून दर्शन घ्यावे. गर्भगृहात जाऊ नये. सभागृहातून दर्शन घ्यावे आणि बाहेर यावे. आपली अवस्था देवाला सांगावी, भक्तिभावाने नमस्कार करावा. असे करणे चुकीचे नाही. कारण तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आयुष्यात पुन्हा कधी येईल हे माहीत नसते. अशा वेळी स्वतःशी आणि परमात्म्याशी प्रामाणिक राहणे कधीही चांगले!
पहा प्रेमानंद महाराजांचा व्हिडीओ -