रथसप्तमी २०२५: कसे करावे व्रतपूजन? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 12:03 IST2025-02-02T12:03:33+5:302025-02-02T12:03:44+5:30

Ratha Saptami 2025 Date Time And Vrat In Marathi: सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. रथसप्तमीचे महत्त्व आणि महात्म्य तसेच सोप्या पद्धतीने करायचा व्रतपूजा विधी जाणून घ्या...

ratha saptami 2025 know about date time shubh muhurat vrat puja vidhi and significance in marathi | रथसप्तमी २०२५: कसे करावे व्रतपूजन? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता

रथसप्तमी २०२५: कसे करावे व्रतपूजन? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता

Ratha Saptami 2025 Date Time And Vrat In Marathi: मराठी महिन्यांमध्ये माघ महिन्याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या महिन्यात अनेक व्रत-वैकल्ये, सण-उत्सव येतात. भारतीय संस्कृतीतील व्रते, परंपरा यांचे केवळ अध्यात्मिक किंवा सांस्कृतिक एवढे मर्यादित महत्त्व नसून, ते आरोग्यदायी आणि विविध प्रकारच्या समृद्धीचे कारकही आहेत. वैज्ञानिकदृष्ट्याही सण-उत्सव, व्रत-वैकल्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. भारतीय संस्कृती निसर्गपूजक असल्याचे सांगितले जाते. निसर्गाने दिलेल्या गोष्टींची आपण विविध प्रकारे कृतज्ञता व्यक्त करतो. पैकी सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी. माघ महिन्यातील शुद्ध सप्तमीला सूर्य पूजन करण्याची प्रथा आहे. ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी रथसप्तमी आहे.

सर्वांत तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान, बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे. सृष्टीचा जगत्चालक असून, तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे. सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे, असा संदर्भ रथसप्तमीला आहे. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे. सूर्य स्वयंप्रकाशी आहे. अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात. सूर्य ग्रहांचा राजा असून, त्याचे स्थान नवग्रहांमध्ये वरचे आहे. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेले आहे. मकर संक्रांतीनिमित्त सुरू होणारे हळदी-कुंकू समारंभ रथसप्तमीदिनी समाप्त होतात. रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे सांगितली जातात. रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते.

रथसप्तमी: मंगळवार, ०४ फेब्रुवारी २०२५

माघ शुद्ध सप्तमी प्रारंभ: मंगळवार, ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ०४ वाजून ३७ मिनिटे.

माघ शुद्ध सप्तमी समाप्ती: मंगळवार, ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी मध्यरात्रौ ०२ वाजून ३० मिनिटे. 

भारतीय पंचांग पद्धतीत सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे रथसप्तमीचे व्रत, पूजा विधी ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी करावा, असे सांगितले जाते. रथसप्तीचे व्रत हे एक सौर व्रत आहे.  ही सप्तमी चौदा मन्वंतरांपैकी एका मन्वंतराची प्रारंभतिथी म्हणून महत्त्वाची मानण्यात आली आहे. भारतात सर्वत्र या व्रतानिमित्त सूर्योपासना केली जाते परंतु वेगवेगळ्या प्रांतांत व्रताचे नाव व व्रताचरणाचा तपशील या बाबतींत फरक पडतो. 

रथसप्तमी व्रत कसे करावे?

रथसप्तमी हा अदिती आणि कश्यप यांचा पुत्र 'सूर्य' याचा हा जन्मदिवस आहे, असे मानले जाते. या दिवशी सूर्य पूजन केले जाते. सूर्य पूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य दिले द्यावे. रथसप्तमीदिनी तुळशीपुढे सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढून महिला त्याचे पूजन करतात. अंगणात दीप प्रज्वलन करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखविला जातो. सूर्यरथाला असणारे सप्त अश्‍व आठवड्यातील सात वार दर्शवतात. रथाची बारा चाके बारा राशींचे प्रतिक आहे, असे मानले जाते.

रथसप्तमी व्रताचे फळ काय सांगितले जाते?

महाराष्ट्रात प्रामुख्याने हे व्रत करतात. षष्ठीला एकभुक्त्त राहून व्रताचा संकल्प करणे, सप्तमीला अरुणोदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्यप्रतिमेची पूजा करणे, अंगणातच शिजविलेल्या दुधाच्या खिरीचा सूर्याला नैवेद्य दाखविणे आणि अंगणातच सूर्यासाठी दूध ऊतू जाऊ देणे हे व्रताचे स्थूल स्वरूप असते. हळदीकुंकू व वायने वाटणे असा कार्यक्रमही असतो. दक्षिणेत त्या दिवशी अनध्याय असतो आणि रात्री गायन, वादन, दीपोत्सव इ. कार्यक्रम असतात. वर्षभर सूर्योपासनेचे व्रत करून अखेरीस रथाचे दान केले असता महासप्तमी, मस्तकावर बोरीची व रुईची प्रत्येकी सात पाने धारण करून उपासना केली असता माघ सप्तमी, मस्तकावर दीप धारण करून उपासना केली असता अचला सप्तमी इत्यादींप्रकारे व्रतभेद सांगितला जातो. या दिवशीचे स्नान हेच विख्यात माघस्नान, असे काहींचे मत आहे. सर्व रोगांतून व पापांतून मुक्त्तता आणि सौभाग्य, पुत्र, धन इत्यादींची प्राप्ती हे या व्रताचे फळ सांगितले जाते.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

Web Title: ratha saptami 2025 know about date time shubh muhurat vrat puja vidhi and significance in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.