Ramayana: सीतेला सोन्याच्या हरणाची भुरळ पडली नसती, तर रावण सीतेचे अपहरण करू शकला नसता; पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 17:15 IST2023-03-13T17:15:13+5:302023-03-13T17:15:51+5:30
Ramayana: क्षणिक सुख, मोह, मनुष्याच्या अधःपतनाला कारणीतभूत कसे ठरते, हे शिकवणारा रामायणातला हा प्रसंग आणि त्यामागील रहस्य वाचा.

Ramayana: सीतेला सोन्याच्या हरणाची भुरळ पडली नसती, तर रावण सीतेचे अपहरण करू शकला नसता; पण...
त्राटिकेचा मुलगा मारीच आणि लंकेचा राजा रावण यांनी रामचंद्र पंचवटीत राहत असताना सीतेला पळवून नेण्याकरीता एक युक्ती योजली. मारीचाने सोनेरी हरणाचे रूप घेतले. ते पाहून सीतेला त्याचा मोह झाला. राम तिचा हट्ट पूर्ण करण्याकरीता कांचनमृगाची शिकार करायला निघाले. लक्ष्मणाने खूप सांगितले, पण त्याचे न ऐकता राम सीतेचा हट्ट पुरवण्यासाठी सुवर्णमृगापाठोपाठ गेले.
लक्ष्मणााला पंचवटीतील गुहेत सीतेचे रक्षण करायची त्यांनी आज्ञा केली होती. मारीचने रामाला फार दूर नेले. अखेर रामाचा बाण लागला आणि त्याने आपले मूळ रूप घेतले. मरता मरता, रामाच्या आवाजात तो ओरडला, `सीते, लक्ष्मणाऽऽ धावा!' तेव्हा रामाला त्याचे कपट उमजले. पण आता त्याचा उपयोग नव्हता.
सीतेला वाटले, राम खरोखरच संकटात आहेत. लक्ष्मणाला राक्षसांची माया माहित होती. म्हणून तो काहीच बोलला नाही. पण सीता व्यावूâळ झाली. तिने लक्ष्मणाला रामाच्या मदतीसाठी जायला सांगितले. लक्ष्मणाने सीतेला सांगितले, `राम स्वत:च्या रक्षणासाठी समर्थ आहेत. त्यांना माझ्या मदतीची गरज नाही.'
सीता व्याकूळ झाली होती. पतीच्या आवाजाने, त्याच्या आक्रोशाने अस्वस्थ झाली होती. रागाच्या भरात ती लक्ष्मणाला अध्वातद्वा बोलली. तेव्हा नाईलाजाने लक्ष्मणाला रामाच्या शोधार्थ निघावे लागले. सीता पर्णकुटीत एकटीच होती. तिच्या संरक्षणाचा उपाय म्हणून लक्ष्मणाने पर्णकुटीच्या दारात मंत्रावलेली एक रेषा काढली आणि सीतेने या रेषेबाहेर जाऊ नये, अशी विनंती केली.
लक्ष्मण गेल्यावर रावण गोसाव्याचे सोंग घेऊन भिक्षा मागायला आला. सीता त्याला झोपडीच्या दाराआडूनच भिक्षा देऊ लागली. लक्ष्मणाने रेषेबाहेर जाऊ नको, ही सूचना तिच्या लक्षात होती. रेषा झोपडीच्या उंबरठ्याजवळ होती. रावण ती रेषा पार करू शकत नव्हता. त्याने सीतेला, `माई, बाहेर येऊन भिक्षा दे, देव तुझे भले करो.' असे म्हटले.
सीतेला वाटले, हा खरोखरच कोणी भिक्षूक आहे. तिने लक्ष्मणाच्या वचनाविरुद्ध रेषा ओलांडली, तेव्हा रावणाने लगेच तिला पकडले, खांद्यावर बसवले आणि आकाशमार्गे लंकेला नेले. सीतेने खूप आक्रोश केला. परंतु, तो रामापर्यंत पोहोचू शकला नाही. सीतेला क्षणिक मोहाचा, रामाकडे केलेल्या हट्टाचा आणि लक्ष्मणाला बोललेल्या अपशब्दाचा पश्चात्ताप झाला.
रामायणातील या घटनेची आठवण आचारविचारांची लक्ष्मणरेषा ओलांडून नव्या फॅशन आणि विषयोपभोगाच्या कांचमृगापाठी धावताना आपण सदैव ठेवली पाहिजे. पैसे दुप्पट करून देणाऱ्या योजना, दुपारच्या वेळी दारावर येऊन दागिने चमकवून देणारे, भविष्य सांगणारे, छोट्या खरेदीवर मोठ्या वस्तूंचे प्रलोभन देणारे लबाड लोक रावणासारखे टपून बसलेले असतात. अशा वेळी आपण आपली लक्ष्मणरेषा न ओलांडता, कांचनमृगामागे न धावता, या फसव्या जगाकडे डोळसपणे पाहिले पाहिजे.