रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 11:25 IST2025-08-04T11:20:11+5:302025-08-04T11:25:19+5:30
Raksha Bandhan 2025: रक्षाबंधन म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक असल्याचे मानले जाते.

रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
Raksha Bandhan 2025:चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिना सुरू झाला की, रक्षाबंधन सणाची लगबग सुरू होते. बाजारात रंगीबेरंगी रक्षासूत्र येण्यास सुरुवात होते. रक्षाबंधन कधी आहे, त्या दिवशी काय काय करायचे, यंदा कुणाच्या घरी एकत्र जमायचे, याचे आराखडे तयार व्हायला सुरुवात होते. तारखा, ठिकाणे निश्चित केली जातात. यंदा राखी पौर्णिमा कधी आहे? कोणत्या मुहूर्तावर राखी बांधणे शुभ ठरू शकेल? जाणून घ्या...
बहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत, याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन आहे. या दिवशी नारळी पौर्णिमाही असते. बहिणीच्या रक्षणाच्या जबाबदारी भान कायम राहावे, यासाठी राखी बांधली जाते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. भारतीय संस्कृतीत पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा वर्णन केला आहे. बहीण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही, तर सर्व महिलांच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते. तसेच बाह्य शत्रू आणि अंतर्विकारांवर आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहो, ही भावनाही त्यात असते. भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवतो.
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता?
यंदा, शनिवार, ०९ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधन आहे. श्रावण पौर्णिमा शुक्रवार, ०८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०२ वाजून १२ मिनिटांनी सुरू होत असून, शनिवार, ०९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०१ वाजून २४ मिनिटांपर्यंत समाप्त होत आहे. ०९ ऑगस्ट २०२५ रोजी उत्तररात्रौ ०२ वाजून ११ मिनिटांनी पंचक सुरू होत आहे. त्यामुळे पौर्णिमा कालावधीत किंवा पंचक सुरू व्हायच्या आधी रक्षाबंधन करावे, असे सांगितले जात आहे.
रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते
रक्षाबंधनासाठी जो शुभ कालावधी सांगण्यात आला आहे, त्या दिवशी भावाला राखी बांधणे शुभ मानले जाते. विधिवत, शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते. रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते, अशी मान्यता आहे.