Raksha Bandhan 2025: राखी बांधताना तीन गाठी मारायला विसरू नका; जाणून घ्या कारण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 17:53 IST2025-08-05T17:51:01+5:302025-08-05T17:53:02+5:30
Raksha Bandhan 2025: प्रत्येक छोट्या मोठ्या रूढी-परंपरांच्या मागे दडला आहे गूढ अर्थ, तो जाणून घेत सण साजरा केला तर आनंद द्विगुणित होईल हे नक्की!

Raksha Bandhan 2025: राखी बांधताना तीन गाठी मारायला विसरू नका; जाणून घ्या कारण!
रक्षाबंधन (Raksha Bandhan 2025) हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. पण राखी बांधताना राखीच्या दोऱ्याला तीन गाठी बांधाव्यात असे म्हणतात, त्यामागे काय तर्क आहे तो जाणून घेऊ.
राखी बांधताना बहिणी आपल्या भावासाठी सर्वप्रथम पाट मांडतात. पाटाखाली व पाटासभोवती रांगोळी काढतात. पाटावर आसन घालून त्यावर भाऊरायाला बसवतात. त्याला गंध, अक्षता लावतात आणि सोन्याच्या अंगठीने किंवा दोन सुपाऱ्यांनी औक्षण करतात. त्यानंतर राखी बांधून भावाकडून रक्षणाचं वचन घेतात.
राखीला तीन गाठी :
राखी सुटू नये म्हणून बहिणी राखीच्या धाग्याला दोन गाठी बांधतात. पण काही जण त्याजागी तीन गाठी बांधतात. या तीन गाठींचा संबंध त्रिदेवांशी लावला जातो. या तीन गाठी ब्रह्मा, विष्णू, महेशाला स्मरून बांधल्या जातात. या जगाचा सांभाळ हे त्रिदेव करतात, त्यांनी आपल्या भावाचेही रक्षण करावे, त्याच्यावर कृपादृष्टी ठेवावी म्हणून त्यांचे स्मरण करून तीन गाठी बांधाव्यात असे सांगितले जाते.
हे ही वाचा : रुद्राक्षाची राखी बांधावी का?
त्यासोबतच जोडला जातो आणखी एक तर्क :
असे मानले जाते की मनगटावर बांधलेल्या गाठींचा संबंध या पवित्र नात्याच्या ऋणानुबंधाशीसुद्धा असतो. राखीची पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधली जाते.
यंदाचा रक्षाबंधन मुहूर्त
यंदा, शनिवार, ०९ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधन आहे. श्रावण पौर्णिमा शुक्रवार, ०८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०२ वाजून १२ मिनिटांनी सुरू होत असून, शनिवार, ०९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०१ वाजून २४ मिनिटांपर्यंत समाप्त होत आहे. ०९ ऑगस्ट २०२५ रोजी उत्तररात्रौ ०२ वाजून ११ मिनिटांनी पंचक सुरू होत आहे. त्यामुळे पौर्णिमा कालावधीत किंवा पंचक सुरू व्हायच्या आधी रक्षाबंधन करावे, असे सांगितले जात आहे.