Rahu Shukra Yuti 2025:राहू-शुक्र युती धोकादायक; अनैतिक आणि फसवणुकीच्या घटनांचा संभव; वाचा ठोस उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:32 IST2025-01-30T13:31:40+5:302025-01-30T13:32:11+5:30

Rahu Shukra Yuti 2025: शुक्र ग्रह चांगला असूनही राहूच्या संगतीत आल्यामुळे सध्या वातावरण गढूळ होऊ शकते, त्यामुळे सावध राहा आणि दिलेले उपाय करा. 

Rahu Shukra Yuti 2025:Rahu-Venus alliance is dangerous; Unethical and fraudulent incidents are possible; Read concrete solutions! | Rahu Shukra Yuti 2025:राहू-शुक्र युती धोकादायक; अनैतिक आणि फसवणुकीच्या घटनांचा संभव; वाचा ठोस उपाय!

Rahu Shukra Yuti 2025:राहू-शुक्र युती धोकादायक; अनैतिक आणि फसवणुकीच्या घटनांचा संभव; वाचा ठोस उपाय!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

२८ जानेवारीला शुक्राचा प्रवेश मीन ह्या जल तत्वाच्या राशीत झाला आहे. तिथे आधीच राहू ठाण मांडून आहे. राहू आधाशी ग्रह आहे. त्याला जे जे दिसेल ते सर्व हवे आहे . शुक्र स्वतः नैसर्गिक शुभ ग्रह असून भौतिक सुखांचा भोक्ता, जीवनातील आनंदाचा स्त्रोत आहे. मीन राशीत उच्च होताना तो जणू परमेश्वराच्या चरणाशी लीन व्हावे हेच सुचवत आहे. आपल्या घरातील वडील मंडळी , गुरुतुल्य व्यक्ती , समस्त गुरुजन आणि आपले सद्गुरू ह्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले तर प्रत्येक कार्याला चांगली गती लाभेल हे वेगळे सांगायला नको. राहू शुक्र युती (Rahu Shukra Yuti 2025) होतेय, त्यामुळे सावधान!

शुक्र हा धन, ऐश्वर्य, आचार विचार, दिसणे, हसणे, शृंगार ,अलंकार, रसिकता, भाव भावना,आकर्षण ,वैवाहिक सुख , भिन्न लिंगी आकर्षण, उंची कपडे पेहराव, अत्तरे , वास्तू , पर्यटन ह्यावर आपले वर्चस्व असणारा शुभ ग्रह आहे . शुक्र म्हणजे रस , जल तत्व . एखादा अभ्यासू मुलगा वाईट संगतीत आला की ९०% चे ५०% होतात, अनेक वाईट सवयी सुद्धा लागतात अगदी त्याच प्रमाणे शुक्र सुद्धा अशुभ ग्रहांच्या संगतीत आपली रसिकता, सौंदर्य नको त्या ठिकाणी प्रवाहित करतो.
 
राहू हा छलकपट करणारा, भलत्याच मार्गावर नेऊन भ्रमित , संभ्रमित करणारा , गैरसमजाचा कोश विणणारा , भास आभासाचा खेळ खेळणारा, मोहात फसवणारा, मायावी असुर आहे. आर्थिक बाबतीत फसवणूक , खोट्या सह्या , कागदपत्रे हा राहूचा हातखंडा आहे.  आपण कधी एखाद्याच्या शब्दात , प्रेमाच्या पाशात ओढले जातो हे आपल्यालाही समजत नाही इतक्या  प्रचंड ताकदीचा ग्रह जेव्हा शुक्रासारख्या कोमल , रसिक आणि प्रणयाचा प्रतिक मानलेल्या शुक्रा, सोबत येईल तेव्हा काय होईल हे सुज्ञास न सांगणे बरे. विचार गोठून जातात , चांगल्या वाईट परिणामांचा विचार करण्याची क्षमता काढून राहू आपले मन संमोहित करतो.

आजकाल सोशल मिडिया मुळे प्रत्येक जण ज्योतिषी झाला आहे ( त्यांच्या ज्ञानाबद्दल न बोललेले बरे इतके अगाध आहे ते ) .असो! त्यामुळे आता शुक्र म्हणजे काय आणि राहू म्हणजे काय हे सगळ्यांना माहित आहे. पण ह्यांची जेव्हा युती होते तेव्हा त्याचे फल हे प्रत्येकाच्या पत्रिकेत वेगळे असणार आहे. जो उठेल तो अनैतिकतेच्या मागे धावणार नाही. काही अध्यात्मात प्रगती सुद्धा करतील, तर काही पर्यटन क्षेत्रात! प्रत्येकाची पत्रिका वेगळी आणि प्राक्तन सुद्धा!

त्यासाठी सर्वात प्रथम स्वतःच्या मूळ पत्रिकेत हे दोन्ही ग्रह  कसे काम करतात , कुठल्या भावात , नक्षत्रात आहेत आणि सध्याची दशा कुठली आहे ह्याचा विचार केला पाहिजे. नुसते शुक्र राहू म्हणजे अनैकता असे लेबल लावून चालणार नाही. अभ्यास योग्य दिशेला पाहिजे . शुक्र अध्यात्म सुद्धा दाखवतो , अष्टम भावात असेल तर संशोधन , राहू हा गूढ विद्येचा कारक असल्यामुळे गूढ क्षेत्रात जिज्ञासा वाढेल आणि अभ्यास सुद्धा होईल. चांगले आणि वाईट परिणाम हे सगळ्यांसाठी वेगवेगळे असणार आहेत . त्यामुळे अविचाराने कुठलाही चुकीचा निष्कर्ष काढणे त्रासदायक ठरेल. 

लग्न कुठले आहे आणि लग्नेशाचा शुक्र मित्र आहे का? राहू असुर आहे त्याच्यासाठी सगळे सारखेच . असो .आपल्याला मिळालेल्या बातम्या ह्या खोट्या , अर्धसत्य असणाऱ्या असू शकतात त्यामुळे लगेच भावनेच्या आहारी जायचे नाही .अनेकांचे विवाह योग सुद्धा ह्या दरम्यान शक्य आहेत, अनेकांचे आंतरजातीय विवाह होतील, पण राहू असल्यामुळे फसवणूक होत नाही ना हेही तपासून पहिले पाहिजे. गैरसमजामुळे ही युती अनेकदा वैवाहिक जीवनात  गोंधळ निर्माण करते . प्रत्येक कुंडलीतील सप्तमेश आणि सप्तम भाव त्यासाठी तपासला पाहिजे. अचानक प्रेमात पडणे आणि अचानक ते नाते संपुष्टात येणे म्हणजेच हे प्रेम नाही तर निव्वळ आकर्षण हे लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती प्रेमाची भुकेली असतेच, पण वासना आणि प्रेम ह्यात फरक आहे. राहू वासनेचा कारक आहे, भोगांचा कारक आहे , निर्व्याज प्रेमाचा नाही त्यामुळे आपण कशात अडकतो आहोत ह्याचा विचार त्रिवार केला पाहिजे . राहू माया आहे. शुक्र राहू युती फसवणूक होणारी , भावनेच्या आहारी जाणे म्हणजे आयुष्य भरकटत जाणे . 

मोहात अडकवणारे अनेक क्षण येतील पण त्यापासून परावृत्त करेल ती आपली उपासना . कुठल्या मार्गाने जायचे ते आपले आपण ठरवायचे . मन विचलित होण्यास वेळ लागत नाही पण तरीही आपणच आपल्या मनाला ब्रेक लावायचा आहे.

श्री सुक्त पठण , कुंजीका स्तोत्र , देवी सप्तशती आणि आपल्या कुलस्वामिनीचे स्मरण , कुंकुमार्चन , जमल्यास आपल्या ग्रामदेवतेचे शुक्रवारी दर्शन आणि नित्य सद्गुरू उपासना केल्यास हा काळ निघून जाण्यास मदतच होईल. 

संपर्क : 8104639230

Web Title: Rahu Shukra Yuti 2025:Rahu-Venus alliance is dangerous; Unethical and fraudulent incidents are possible; Read concrete solutions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.