PM Modi Give Putin Very Special Gift Bhagwat Gita: यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ असे भगवद्गीतेत (Bhagavad Gita) भगवंतांनी म्हटले आहे. ०१ डिसेंबर २०२५ रोजी गीता जयंती साजरी करण्यात आली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळे प्रोटोकॉल बाजूला ठेवले आणि पालम विमानतळावर जाऊन स्वतः पुतिन यांचे सहर्ष स्वागत केले.
भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये भगवद्गीतेला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी महाभारताच्या रणभूमीवर श्रीकृष्णाने अजुर्नाला जीवनविषयक संदेश दिला. तीच ही गीता होय. हजारो वर्षे लोटूनही आजही गीतेची महात्म्य यत्किंचितही कमी झालेले नाही, यावरूनच गीतेची थोरवी आणि महती लक्षात येते. गीता हा वैश्विक ग्रंथ आहे. केवळ भारतीय भाषांमध्येच नाही, तर जगभरातील अनेक भाषांमध्ये गीतेचे भाषांतर झाले आहे. हाच कालातीत ग्रंथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना भेट दिला आहे.
गीतेची शिकवण जगभरातील लाखो लोकांना प्रेरणादायी
पालम विमानतळावर गळाभेट घेऊन सहर्ष स्वागत केल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि पुतिन थेट पंतप्रधान निवासस्थानी गेले. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली. तसेच पुतिन यांना गीतेची (Bhagwat Geeta) प्रत भेट दिली, याबाबतही पोस्ट केली. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना रशियन भाषेतील गीतेची प्रत भेट दिली. गीतेतील शिकवण जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देते, असे पंतप्रधान मोदी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना गीता भेट दिल्याचे अनेकांनी स्वागत केले असून, अगदी अचूक निर्णय असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदांचे मान मिळाला आहे. गीतारूपी अमृत भगवंतांनी अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले असून, जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रत्येक विचार गीतेत आहे. भगवंतांनी अजुर्नाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन प्रयास केला आहे. गीता ही सर्व शास्त्रमयी आहे. गीतेत सर्व शास्त्रांचा समन्वय पहायला मिळतो. भगवद्गीतेत १८ अध्याय, ७०० श्लोक असून, भगवद्गीतेने मनुष्यमात्राला यशस्वी, सुखी, शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखविला. गीता म्हणजे भारताच्या गौरवाची शान आहे. गीता जगाकडे व जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत अध्यात्मपर दृष्टी देणारा ग्रंथ आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींपासून ते अगदी लोकमान्य टिळक यांच्यापर्यंत अनेकांनी गीतेवर भाष्य केले आहे. आजच्या काळातही गीतेवर अभ्यास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गीतेतून सातत्याने नवीन काहीतरी मिळत असल्यामुळे याची कालातीतता स्पष्ट होते.
Web Summary : PM Modi gifted a Russian Bhagavad Gita to Putin during his India visit. The Gita's teachings inspire millions globally. Modi personally welcomed Putin, emphasizing the timeless wisdom of the scripture.
Web Summary : पीएम मोदी ने भारत दौरे पर पुतिन को रूसी भगवद गीता भेंट की। गीता की शिक्षाएं विश्व स्तर पर लाखों लोगों को प्रेरित करती हैं। मोदी ने व्यक्तिगत रूप से पुतिन का स्वागत किया, शास्त्र के कालातीत ज्ञान पर जोर दिया।