धैर्य हा मानवाचा दागिना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 03:01 PM2020-07-27T15:01:21+5:302020-07-27T15:01:29+5:30

ज्या मनुष्याने धैर्य, विवेक आणि विश्वास यांचा समन्वय साधला तर तो कोणालाच घाबरत नाही. तो भयाने व्याकूळ होत नाही. त्याचे मन वृद्ध होत नाही. तो आपल्या विश्वासाच्या बळावर कठीणातल्या कठीण प्रसंगांना तोंड देतो.

Patience is the jewel of man | धैर्य हा मानवाचा दागिना

धैर्य हा मानवाचा दागिना

Next

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)
ज्या मनुष्याने धैर्य, विवेक आणि विश्वास यांचा समन्वय साधला तर तो कोणालाच घाबरत नाही. तो भयाने व्याकूळ होत नाही. त्याचे मन वृद्ध होत नाही. तो आपल्या विश्वासाच्या बळावर कठीणातल्या कठीण प्रसंगांना तोंड देतो. धैर्याने तो आपल्यावर येणाऱ्या संकटांना हसत-खेळत सामोरे जातो. तो मनुष्य यशाची प्रदीर्घ प्रतीक्षा करतो व साधना करत राहातो. कुठल्याही प्रसंगी तो आपले धैर्य सोडत नाही. आपल्या कार्यापासून जराही विचलित होत नाही. कठीणातल्या कठीण प्रसंगी आपले धैर्य टिकवून ठेवतो. कारण त्याच्यातला आत्मविश्वास कायम असतो. ज्याचा आत्मविश्वास बळकट आहे तो आपल्या यशस्वी साम्राज्याची गुढी उभारतो. आत्मविश्वासाने पराजयाचे विजयात रूपांतर करतो. नि:संदेहपणे जगतो. आत्मविश्वासाच्या बळावर मनुष्य महान कार्य करतो. तो कधीच आपला आत्मविश्वास गमावत नाही.

आपला विवेकरूपी तोल कधी ढळू देत नाही. जीवनात मान-अपमान, धर्म-अधर्म, जीवन-मरण, लाभ-हानी या सर्वांना तो ओळखून असतो. त्या मनुष्याला त्याची परिपूर्ण जाणीव असते. त्याच्या जीवनात कुटिल राजकारण नसते. आपल्याकडून कुठलेही वाईट कर्म घडणार नाही याची दक्षता घेतो. त्याच्या प्रत्येक कर्मात सरलता, सुबोधता आढळते. खोटेपणा, कृत्रिमता त्याच्या कार्यात नसते. तो मनुष्य साधनाशील असतो. जीवनमूल्यांचा प्रसार-प्रचार करतो. धर्माची प्रबलता वाढवतो. समाज, राष्ट्र घडविण्यात त्याचा सिंहाचा वाटा असतो. सदाचार, श्रेष्ठाचार त्याच्या अंगी बाळगतो. भ्रष्टाचार शब्द त्याच्या मनाच्या नोंदवहीतसुद्धा सापडत नाही. तो मनुष्य नेहमी संयम-सदाचार याचा परिपाठ लोकांना सांगतो किंवा आपल्या आचरणातून दाखवतो. तो मनुष्य धैर्य-विवेक व आत्मविश्वासाच्या समन्वयातून आकाशात उडण्याचा प्रयत्न करेल किंवा उडेलही. म्हणून म्हणतो माणसाजवळ धैर्य-विवेक व आत्मविश्वास नसेल तर तो मनुष्य तरुण असूनही वृद्ध आहे.

Web Title: Patience is the jewel of man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.