Papmochani Ekadashi 2025: विष्णुसहस्त्रनाम म्हणायला वेळ नाही? मग ५ मिनिटात घ्या 'हे' हरीनाम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 07:05 IST2025-03-26T07:00:00+5:302025-03-26T07:05:01+5:30
Papmochani Ekadashi 2025:आज पापमोचनी एकादशीच्या मुहूर्तावर दिवसभरात हा छोटासा विष्णु श्लोक म्हणा आणि पापमुक्त व्हा.

Papmochani Ekadashi 2025: विष्णुसहस्त्रनाम म्हणायला वेळ नाही? मग ५ मिनिटात घ्या 'हे' हरीनाम!
आपली संस्कृती सांगते, की प्रत्येक काम ईश्वराला स्मरून करा. भगवद्गीतेतही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तू तुझे प्रत्येक कर्म 'श्रीकृष्णार्पणमस्तु' असे म्हणून मला अर्पण कर, मग त्या कर्माचे काय फळद्यायचे ते मी पाहतो. म्हणजेच आपली कृती अहंकार विरहित असायला हवी असे भगवंताला अपेक्षित आहे. म्हणून कर्ता करविता तोच आहे हे ध्यानात ठेवून त्याचे स्मरण करावे. यासाठीच शास्त्रात भगवान विष्णूंची सोळा नावे दिली आहेत, ती नावे १६ महत्त्वाच्या कामांच्या वेळी स्मरावीत असे शास्त्र सांगते. ती नावे आणि कामे कोणती ते जाणून घेऊ.
आज पापमोचनी एकादशी (Papmochani Ekadashi 2025) आहे. त्यामुळे आज भगवान विष्णूंच्या आवडत्या तिथीपासून भगवन्नाम घेण्यास सुरुवात करू. विष्णू षोडशनाम पुढीलप्रमाणे -
औषध घेताना : विष्णवे नमः। (जगाचं रक्षण करणारे आमचं रक्षण करो)
भोजन करताना : जनार्दाय नमः । (जगाचं पोषण करणारे आमचे पोषण करो)
झोपण्यापूर्वी : पद्मनाभाय नमः । (शेषावर झोपणारे आम्हाला निद्रासुख देवो)
विवाहासमयी : प्रजापतये नमः । (सर्वांचे पालन करणारे आमच्या संसाराचे पालन करो)
युद्धामध्ये : चक्रधाराय नमः । (अर्जुनाच्या पाठीशी उभे राहणारे आमच्या पाठीशी राहो)
प्रवासात असताना : त्रिविक्रमाय नमः । (वामनाचा अवतार असणारे आमचा प्रवास सुखरूप करो)
मरणासन्न असताना : नारायणाय नमः । (ज्याच्याशी एकरूप व्हायचे आहे त्याचे स्मरण होवो)
प्रिय व्यक्तीची भेट होताना : श्रीधराय नमः । (सर्वांना रमवणारा परमात्मा प्रिय व्यक्तीच्या रूपाने भेटो)
वाईट स्वप्नं पडल्यास : गोविंदाय नमः । (जागृत-निद्रा अवस्थेत त्याचे सदैव स्मरण असो)
संकटात असताना : मधुसूदनाय नमः । (गोकुळवासीयांचा उद्धार करणारा आमचाही उद्धार करो)
अरण्यात असताना : नरसिंहाय नमः । (नरसिंहरूपी भगवंत पाठीशी असताना श्वापदांपासून रक्षण होवो)
आग लागलेली असताना : जलशायीने नमः । (पंचतत्वात सामावलेल्या ईश्वराने रक्षण करो)
पाण्यात असताना : वराहरुपाय नम: । (वराह रूपाने बुडत्या पृथ्वीला आधार देणाऱ्याने आमचाही सांभाळ करो)
पर्वतावर असताना : रघुनंदनाय नमः । (वनवासी असूनही दंडकारण्यातील जीवांना अभय देणाऱ्याने आमचे रक्षण करो)
बाहेर जात असताना : वामनाय नमः । (वामन रूपाने अतिथी म्हणून जाणाऱ्याने आमच्या प्रवासाला दिशा देवो)
सर्व प्रकारची कामे करताना : माधवाय नमः । (प्रत्येक कर्माचा साक्षीदार भगवंत असो)
श्रीगणेशाय नमः।
औषधे चिन्तयेद विष्णुं भोजने च जनार्दनं
शयने पद्मनाभं च विवाहे च प्रजापतिम
युद्धे चक्रधरं देवं प्रवासे च त्रिविक्रमं
नारायणं तनुत्यागे श्रीधरं प्रियसंगमे
दु:स्वप्ने स्मर गोविन्दं संकटे मधुसूदनम
कानने नारसिंहं च पावके जलशायिनम
जलमध्ये वराहं च पर्वते रघुनंदनम
गमने वामनं चैव सर्वकार्येषु माधवं
षोडश-एतानि नामानि प्रातरुत्थाय य: पठेत
सर्वपाप विनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते
इति विष्णो षोडशनाम स्तोत्रं सम्पूर्णं
तुम्ही म्हणाल, या सोळा कामांच्या वेळी सोळा नामे कशी लक्षात ठेवावीत त्यावर उत्तर सोपे आहे. १६ श्लोकी स्तोत्र पाठ करून त्याचे नित्य पठण करणे हे जास्त सोपे आहे. या स्तोत्राचा अवलंब करा आणि आपली जबाबदारी पार पाडून उर्वरित कार्य ईश्वरावर सोपवून निश्चिन्त व्हा!