Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 09:25 IST2025-05-09T09:22:55+5:302025-05-09T09:25:25+5:30
Operation Sindoor: भारत पाकिस्तान सीमेवर तणावग्रस्त वातावरण असल्यामुळे आपल्या योद्ध्यांच्या रक्षणासाठी स्वामींकडे मनोभावे करूया पुढील प्रार्थना!

Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
युद्ध कोणाही सामान्य नागरिकाला नकोच असते, मात्र काही विकृत लोकांना शांतता पाहवत नाही, ते कुरापती करतात आणि त्यांची शिक्षा सगळ्यांनाच भोगावी लागते. अलीकडेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीय बळी गेले. कुटुंबांतली एक व्यक्ति जाणं म्हणजे कुटुंबाची वाताहात होण्यासारखं आहे. दहशतवाद्यांनी मुद्दामून पुरूषांना टार्गेट करून स्त्रीयांचे 'सिंदूर' उजाड केले. म्हणून भारताने प्रत्युत्तर म्हणून 'ऑपरेशन सिंदूर'(Operation Sindoor) चा सपाटा लावला. आज दोन्ही देशात तणावग्रस्त वातावरण आहे. सगळे भारतीय आपल्या योद्ध्यांच्या जीवित रक्षणासाठी प्रार्थना करत आहेत. शत्रूवर मात करून ते सुखरूप परत यावेत असे देवाला साकडे घालत आहेत. आपण नेहमी आपल्या सुखासाठी पदर पसरतो, आज आपल्या सैंनिकांसाठी स्वामी समर्थांना साकडे घालूया.
स्वामी सांगतात, 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!' एवढा मोठा दिलासा असताना डगमगण्याची गरज नाही. त्यासाठी ही पुढील प्रार्थना मनोभावे करा. कारण, हे केवळ शब्द नाही तर त्यामागील भाव समजून उमजून म्हटले, तर मन स्थिर, शांत होईल. विचार थांबतील आणि पूर्णपणे समर्पण भाव जागृत होईल आणि परिस्थिति नियंत्रणात येईल.
सद्गुरू नाथा हात जोडितों अंत नको पाहू
उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू ।।
निशीदिनी श्रमसी मम् हितार्थ तू किती तुज शीण देऊ
हृदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहू ॥
उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहू
बोधुनि दाविसी इहपर नश्वर मणी उठला बाऊ ॥
कोण कुठील मी कवण कार्य मम जणी कैसा राहू
करी मज ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू ॥
अजाण हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू
निरसुनी माया दावी अनुभव प्रचीती नको पाहू ॥
स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे. गरिबाला मदत करणे, मोठ्यांचा मान राखणे, सेवा करणे, लहानग्यांना समजून घेणे, रागावर नियंत्रण ठेवणे, सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे, मुख्य म्हणजे माणुसकी जपणे. या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात. 'जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला' हे गुपित कायम लक्षात ठेवा. कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत, आपले कार्य त्यांना समर्पित करून देवकार्य करणे हेच अपेक्षित आहे. जो ही सूत्री सांभाळतो, भगवंत त्याचे रक्षण करतो.
त्यामुळे संकटकाळात उदास न होता, मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून आर्त साद घाला, स्वामी निश्चित मदत करतील!