Navratri 2025: काय आहे देवी चंद्रघंटेचे महत्त्व? नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी का केली जाते पूजा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 07:00 IST2025-09-24T07:00:00+5:302025-09-24T07:00:02+5:30
Navratri 2025: नवरात्रीत देवीच्या रूपाची, गुणाची उपासना करून तिचे गुण अंगिकारण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, त्यासाठी ही मानसपूजा.

Navratri 2025: काय आहे देवी चंद्रघंटेचे महत्त्व? नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी का केली जाते पूजा?
आज नवरात्रीचा(Navratri 2025) तिसरा दिवस. या लेखमालेच्या निमित्ताने देवीची मानसपूजा करणार आहोत. त्यात काल आपण देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली आज देवी चंद्रघंटेची पूजा करूया.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी भगवतीचे `चंद्रघण्टा' या नावाने पूजन होते. देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. देवीच्या या रूपात, तिच्या मस्तकावर घण्टेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे, याच कारणाने तिला चंद्रघण्टा म्हटले जाते.
Navratri 2025: ध्येयपूर्ती कशी करावी हे देवी ब्रह्मचारिणीकडून शिकावे; नवरात्र विशेष मानसपूजा!
अतिशय तेजस्वी रूप धारण केलेली देवी चंद्रघण्टा श्रीसुक्तात वर्णन केल्याप्रमाणे हिरण्यवर्ण अर्थात सुवर्णतेजाची झळाळी ल्यालेली आहे. तिला दहा हात आहेत. या दहा हातांमध्ये खड्ग, बाण आणि अन्य शस्त्रास्त्र हाती घेतली आहेत. देवी सिंहारूढ झाली आहे. दैत्यांचा पराभव करण्यासाठी देवी ज्यावेळेस रणांगणावर उतरली, तेव्हा तिच्या नुसत्या घंण्टेच्या नादाने त्रिलोक हादरले.
नवरात्रीच्या पूजेत तिसऱ्या दिवसाचे अधिक महत्त्व आहे. या दिवशी साधकाचे मन `मणिपूर' चक्रात प्रवेश करते. या स्थितीत गेलेल्या साधकाला देवी चंद्रघण्टेच्या अस्तित्त्वाची जाणीव होते, तसेच दिव्य सुगंध तसेच दिव्य ध्वनी यांचीही अनुभूती येते, असे म्हणतात.
देवी चंद्रघण्टेच्या आशीर्वादाने साधकाचे पापक्षालन होते व ध्येयाआड येणारी संकटे दूर होतात. देवीची आराधना निश्चितच फलदायी आहे. परंतु, देवीचे रूप साधकाला, कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचे बळ देते. तिचे वाहन सिंह, पराक्रमी आणि निर्भय होण्याची शक्ती देते. तिचा घण्टानाद भक्तांना वाईट ध्वनीलहरी तसेच निराशाजनक विचारांपासून दूर ठेवतात.
दुष्टांचे दमन आणि विनाश करण्यात सदैव तत्पर असूनही देवीचे रूप अतिशय सात्विक आहे. जे पाहताच साधकाला प्रचंड दिलासा मिळतो, मन:शांती मिळते. म्हणूनच असे म्हटले जाते, की देवी चंद्रघण्टेची उपासना करणाऱ्या उपासकाला बुद्धी, शौर्य, तेज याबरोबरच विनम्रताही अंगी बाणली जाते. देवीच्या मुखावरचे अलौकिक तेज भक्तालाही लाभते. देवी आपल्या करुणामयी दृष्टीने प्रत्येक उपासकावर प्रेम, वात्सल्य आणि मायेचा वर्षाव करते आणि दुष्टांना दंड देते.
आपल्यालाही काया, वाचा आणि मनाने देवीला सर्वस्व अर्पण करायचे असेल, तर तिच्याठायी निस्सिम श्रद्धा हवी. देवीकडे ऐहिक सुखांची मागणी न करता, तिच्यासारखेच शूरत्त्व, वीरत्त्व मागावे. समाजकंटकांचा नायनाट करण्यासाठी बळ मागावे. आपण ज्या आराध्य दैवताची उपासना करतो, त्याचे थोडे तरी गुण आपणही अंगिकारले पाहिजेत. अन्यथा शक्तीउपासक म्हणवून घ्यायचे आणि संकटकाळी पळ काढायचा, असा दुटप्पीपणा देवीला आवडत नाही. अन्याय करणाऱ्या इतकाच अन्याय सहन करणाराही गुन्हेगार असतो. आपल्या दैवतांनी नेहमीच प्रसंगाशी दोन हात करण्याची शिकवण दिली आहे. म्हणून देवीच्या पूजेइतकाच आपल्या कर्तत्त्वाचाही डंका वाजेल, तेव्हा शत्रू भयवंâपित होऊन दुष्कृत्य करण्यास धजावणार नाही. ही मानसपूजाच देवीलाही अपेक्षित आहे. आपण ती करूया आणि एकमुखाने म्हणुया, जगदंब उदयोऽऽस्तु!