नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 15:16 IST2025-09-23T15:10:07+5:302025-09-23T15:16:07+5:30
Shardiya Navratri 2025: वातीभोवती आलेली काजळी काढणे सोपे काम नाही, अनेकदा दिवा विझण्याची भीती असते. अशावेळी एक सोपा उपाय उपयुक्त ठरू शकतो, असे सांगितले जाते.

नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
Shardiya Navratri 2025: घटस्थापना होऊन नवरात्राची सुरुवात झाली आहे. यंदा २२ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नवरात्रोत्सव असणार आहे. नवरात्रीनिमित्त घरोघरी देवीची उपासना केली जाते. नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. आपापल्या परिने यथाशक्ती देवीची सेवा केली जाते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे नऊ दिवस देवीपुढे लावला जाणारा अखंड दिवा. हा दिवा नऊ दिवस घरात तेवत राहिला पाहिजे. नवरात्रीत लावली जाणारी अखंड ज्योत अतिशय शुभ लाभदायक मानली जाते. परंतु, काही तासांनी या दिव्याला काजळी धरते. ही काजळी काढणे सोपे काम नाही, अनेकांना ते जमतेच असे नाही. काजळी आली की, मनात काळजीही येते. कारण काजळी काढताना दिवा जाण्याची शक्यता बळावते. काजळी काढायला कौशल्य लागते. परंतु, सोपा उपाय केल्यास वात नीट राहील, दिवाही विझणार नाही, असे सांगितले जाते.
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
नवरात्रात पूजेच्या वेळी साधारणतः दोन प्रकारचे दिवे लावले जातात. एक कर्मदीप, जो केवळ पूजेच्या वेळी लावला जातो आणि दुसरा अखंड दिवा, जो कोणत्याही सणाच्या किंवा शुभ कार्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रज्वलित केला जातो. ज्या घरांमध्ये नवरात्रीच्या कलशाची स्थापना झाली आहे, तेथे हा दिवा लावला जातो. अखंड दिवा सदैव तेवत राहिल्याने सुख, शांती, समृद्धी येते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, असे मानले जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत अखंड दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून सुरु आहे. अखंड ज्योती म्हणजे असा प्रकाश जो विझत नाही. अखंड ज्योती अखंड तेवत ठेवावी. नवरात्रीत अखंड ज्योतीला खूप महत्त्व आहे. ज्योतीमध्ये दिव्याचा खालचा भाग डावीकडून उजवीकडे लावावा. या प्रकारचा दिवा आर्थिक समृद्धीचा कारक आहे. असे मानले जाते की या प्रकारच्या दिव्यामुळे भाग्य मिळते.
वातीभोवती आलेली काजळी कशी काढावी?
- अखंड दिवा लावल्यानंतर बऱ्याचदा असे होते की काही तासांमध्येच दिव्याभोवती काजळी तयार होते. अनेकांचा असा अनुभव असतो की, दिव्याभोवतीची काजळी काढायला गेले की दिवा विझतो.
- आता नवरात्रीचा अखंड दिवा अशा पद्धतीने विझण्याची भीती मनात राहते. काही ठिकाणी काही सेकंदही दिवा जाणे चालत नाही. म्हणूनच वातीभोवती काजळी आली असेल तर ती काढून घेण्यासाठी ही एक खास ट्रिक वापरावी, असे म्हटले जाते.
- वातीभोवती आलेली काजळी काढण्यासाठी बारीक चिमटा खूप उपयुक्त ठरू शकतो. एका हाताने त्याने अलगद वातीचा एक छोटासा भाग पकडून वर खेचा.
- वात वर ओढताना वातीच्या मधोमध पकडू नका. अगदी बाजूचा छोटासा भाग पकडा. यामुळे अलगद वात वर ओढली जाईल. त्यानंतर वातीच्या आजुबाजुला जी काजळी असेल ती अलगद काढून टाका. दिवा अजिबात विझणार नाही.
- अखंड दिवा ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा थोडा मोठ्या आकाराचा दिवा घ्यावा. यामुळे दिव्यात तेल, तूप जास्त प्रमाणात राहू शकेल.
- अखंड दिवा ज्योत लावताना तूप किंवा तेलाचा वापर करावा. दिव्यातील तेल, तूप संपत आले की पुन्हा त्यात तेल - तूप घालावे.
- अखंड दिव्याची वात काहीजण कापूस वापरुन तयार करतात तर कधी रक्षा सूत्राचा देखील वापर केला जातो. जर आपण कापसाचा वापर करत असाल तर वात नेहमीपेक्षा थोडी जाड आणि लांब म्हणजेच नऊ दिवस पुरेल इतकी तयार करुन घ्या.
- जर रक्षा सूत्राचा वापर करणार असाल तर ते वातीप्रमाणे व्यवस्थित वळून घ्यावे. रक्षा सूत्र वळताना त्यातील छोटे धागे बाहेर येतात यामुळे ज्योत अखंड तेवत राहते.
- अखंड दिवा लावण्यासाठी त्यात तेल - तूप घालण्यापूर्वी दिव्याच्या तळाशी थोडेसे तांदळाचे दाणे घालावेत.
- अखंड दिवा लावल्यानंतर तो ज्या ठिकाणी कमी वारा असेल अशा ठिकाणी ठेवावा, जेणेकरुन त्याची ज्योत विझण्याची भीती राहत नाही.
- अखंड दिवा लावल्यानंतर वातीच्या टोकावर येणारी काजळी छोट्याशा चिमट्याच्या मदतीने काढायला विसरु नका. ठराविक तासांनी ज्योतीवरील काजळी काढून घ्यावी. यामुळे दिवा अखंड तेवत राहण्यास मदत होते.
- काजळी काढताना दिव्याची वात किंचित वर करावी यामुळे ज्योत थोडी मोठी होऊन काजळी स्वच्छ करताना ती पटकन विझत नाही, याउलट वात लहान असेल तर ती पटकन विझते यामुळे काजळी काढतांना विशेष लक्ष देणे गरजेचे असते.