२७ मे रोजी आहे नारद जयंती, करून घेऊया ओळख महर्षी नारद यांच्या व्यक्तिमत्त्वाची!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 08:00 AM2021-05-26T08:00:00+5:302021-05-26T08:00:10+5:30

‘नारायण नारायण’ असे जुन्या पौराणिक चित्रपटातून, नाटकातून शब्द कानी पडताच मागून विणेचे झंकार येतात आणि डोळ्यासमोर येते ते एक आदरणीय पण विनोदी, हसमुख, आकर्षक व्यक्तिमत्व महर्षि नारदांचे. उद्या त्यांचा प्रगट दिन आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून घेऊया. 

May 27 is Narad Jayanti, let's get to know the personality of Maharshi Narad! | २७ मे रोजी आहे नारद जयंती, करून घेऊया ओळख महर्षी नारद यांच्या व्यक्तिमत्त्वाची!

२७ मे रोजी आहे नारद जयंती, करून घेऊया ओळख महर्षी नारद यांच्या व्यक्तिमत्त्वाची!

Next

>>रवींद्र वासुदेव गाडगीळ 

ब्रम्हदेवांचा मानसपुत्र, विष्णुंचा प्रियभक्त, त्रैलोक्यात संचार करणारे देवदानवांनंतरचे एकमेव मुनी. ऑल स्पेस परमीट. क्षणात इकडे तर क्षणात तिकडे. देव, दानव, मानव, पशू पक्षी सर्वांशी मैत्री. जगन्मित्र, अजातशत्रु.

व्यक्तिमत्त्व अगदी साधे, धोतर, उपरणे, एका हातात वीणा दुसर्‍या हातात चिपळया, मुखी भगवंताचे अखंड नामस्मरण. मानवासारखेच सर्व विकार व विचार असलेले मानवाचे मानवरूपी प्रतिनिधी. संकटकाळी देवाच्या आधी धावून जाणारे (जसे आपल्या खाजगी चानेलचे प्रतींनिधी शासनाच्याही आधी जाऊन पोहोचतात तसे) कोणतेही स्मरण कोणीही केलेले नसतांना धाऊन जाणारे संकटमोचक अशी त्यांची खरी ओळख आहे. 

डोक्यात भरपूर कल्पना असणारे, कल्पनाशक्तीचे विपुल भांडार. आधुनिक गुगल ऋषी. संगणक देवताच जणू! कधी हार न मानणारे व उदास न होणारे. प्रख्यात वकिलासारखा युक्तिवाद मांडून, प्रसंगी भांडून, कोणत्याही समस्येवर तोडगा काढून, शेवट गोड करणारे असे हे महर्षी नारद!

देवही संभ्रमीत होतील अशा कठीण प्रसंगी धीर न सोडता, आपल्या गोलमाल व गोडगोड बोलण्याने समोरच्यावर छान छाप पाडून, अगदी स्वतःला बुद्धिमान समजणार्‍या भल्या भल्या उन्मत्त राक्षसी वृत्तीच्या उच्चपदस्थांनाही सहज कह्यात घेणारे (उल्लू बनवणारे) नारद. अगा असा मुनी झालाची नाही.

त्यांच्यावर आरोप खूप झाले. कळीचा नारद, (खरे तर ह्यांना बघितलेच की अनेकांची कळी खुलायची, काहीतरी नवे घडणार, किंवा ऐकायला मिळणार!! म्हणून कळीचा नारद), आगलाव्या नारद, लावालाव्या करणारा, काड्या करणारा, भांडण लावून देऊन, दुरून मजा बघणारा. पण इतके आरोप होवूनही हे महाराज भक्तीत गुंग. त्यांनी कधीही हे सर्व आरोप मनावर घेतलेच नाही की रागाने फुगून बसले नाहीत.

बहुजनहित व नीतीची, धर्माची बाजू घेणे, न्यायाने तडजोड करणे, हेच त्यांचे ब्रीद होते. पृथ्वीतलावरच्या यच्चयावत समाज हितासाठी, विकासासाठी, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांसारीक, भौतिक, सांस्कृतिक क्षेत्रात दिवस रात्र संशोधन करून तन मन धनाने कार्यरत असणार्‍या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेत, पालनकर्त्या विष्णूंना त्वरेने जाऊन ते जगातील नववे आश्चर्य म्हणून सांगून त्यांच्या कार्याचा उचित बहुमान घडविण्यासाठी त्यांना “जीवनगौरव” देऊन सत्कार करा सांगणारे आपले नारदच. त्यांच्यामुळेच कित्येक दुर्लक्षित संत, महंत, ऋषि, मुनि, शास्त्रज्ञ, विद्वान, कलावंत, भक्त, जपी, तपी, असे अज्ञाताच्या पडद्याआड असलेले गुणवंत धूलरत्न, जगासमोर आणले गेले. वाल्मिकी, ध्रुव, प्रह्लाद, अनसूया, गौतम ऋषि, भगीरथ, मार्कंडेय, संदीपक, असे अनेक जे प्रसिद्धी टाळत होते, त्यांना त्यांनी त्यांच्या कार्यासहित उजेडात आणले.

अगदी कोणाच्याही दालनात, कोणत्याही वेळेत त्यांना मुक्त प्रवेश होता. मग आता  सांगा, अशी व्यक्ति का नाही आवडणार आबालवृद्धांना? प्रत्येक कीर्तन, भजन, प्रवचनात यांची उपस्थिती गुप्त सुप्त रूपात किंवा कोणत्याही रूपात श्रवणभक्तिसाठी ते असतातच. कारण तेथे भगवंताचे अधिष्ठान असते.जिथे नारायण तिथे महर्षी नारद! त्यांचे व्यक्तिमत्त्व थोडक्यात पाहिले, उद्या त्यांच्या कर्तृत्त्वाबद्दलही जाणून घेऊ. 

क्रमश:

Web Title: May 27 is Narad Jayanti, let's get to know the personality of Maharshi Narad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.