गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 20:33 IST2025-12-17T20:30:56+5:302025-12-17T20:33:38+5:30
Margashirsha Masik Shivratri 2025: गुरुवारी मासिक शिवरात्रीचे व्रताचरण असून, कोणत्या शिव मंत्राचा जप करणे प्रभावी ठरू शकेल? जाणून घ्या...

गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Margashirsha Masik Shivratri 2025: गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी ‘मासानां मार्गशीर्षोऽहम’ म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो, असे म्हटले आहे. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मृगशीर्ष हे नक्षत्र असते, म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असे नाव प्राप्त झाले. प्रत्येक महिन्यात शिवरात्रि असते. या दिवशी महादेव शिवशंकरांचे विशेष पूजन केले जाते. शिवरात्रीला केलेले शिवपूजन विशेष पुण्य फलदायी मानले गेले आहे.
गुरुवार, १८ डिसेंबर २०२५ रोजी मासिक शिवरात्रि आहे. या दिवशी हजारो भाविक व्रताचरण करतात. शिवरात्रि ही महादेवांना समर्पित असलेले व्रत आहे. अनेकांचे आराध्य असलेल्या महादेवांचे भारतात मोठ्या प्रमाणात पूजन, उपासना केली जाते. प्रत्येक महिन्यात शिवरात्रीचे व्रत असते. शिवरात्रीला महादेव शिवशंकराचे विशेष पूजन केले जाते. शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत. रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष अशी फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते.
मार्गशीर्ष शिवरात्रि व्रतात शिव पूजन करायची सोपी पद्धत
प्रत्येक मराठी महिन्यातील वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते. नित्यशिवरात्र, पक्षशिवरात्र, मासशिवरात्र, योगशिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार असल्याचे सांगितले जाते. या दिवशी मनोभावे शिवपूजन करावे. पंचोपचाराने महादेवांचे पूजन झाल्यानंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. त्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते. या दिवशी रुद्राभिषेक, जलाभिषेक, दुग्धाभिषेक करणे पुण्य फलदायी मानले गेले आहे. शिवरात्रिच्या दिवशी सकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. शक्य असल्यास १०८ बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत.
प्रभावी शिव मंत्रांचा जपा करा, कालातीत लाभ मिळवा
मार्गशीर्ष मासिक शिवरात्री या दिवशी महादेव शिवशंकरांच्या प्रभावी मंत्रांचे जप करणे लाभदायक तसेच पुण्यफलदायी ठरू शकते, असे म्हटले जाते. 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते.
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ हर हर महादेव ॥