२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 17:26 IST2025-12-06T17:26:03+5:302025-12-06T17:26:45+5:30
Margashirsha Sankashti Chaturthi December 2025: २०२६ नववर्ष सुरू होत आहे. गणेशाची कायम कृपा लाभण्यासाठी संकष्ट चतुर्थीला संकल्प करून एक उपासना अवश्य करू करावी, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
Margashirsha Sankashti Chaturthi December 2025: गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे आराध्य दैवत! गणपती ही वैश्विक देवता आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थी व्रत कोणीही करू शकतो. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. रविवार, ०७ डिसेंबर २०२५ रोजी मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे.
जीवन जगताना अनेक अडथळे, समस्या, संकटे येत असतात. हाती घेतलेली कामे मनासारखी होतातच असे नाही. हातात काम घेतले की, अडचणी येतात, असाच अनुभव अनेकदा येतो. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते, कठोर परिश्रम घेतले जातात, सतत मेहनत केली जाते, परंतु, अपेक्षित परिणाम प्राप्त होतातच असे नाही. अशा वेळेस मन खिन्न होते. आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरांनुसार अनेक उपाय सांगितले जातात. शेकडो स्तोत्र, हजारो मंत्र आणि लाखो श्लोक उपलब्ध आहेत. प्रत्येक जण आपापल्या परिने आपल्या आराध्य देवतेची उपासना, आराधना, पूजन, नामस्मरण करत असतो. विघ्नहर्ता गणपती मंगल करेलच, असा भाव मनात ठेवून एक उपासना मार्गशीर्ष महिन्याच्या संकष्ट चतुर्थीपासून सुरू करू शकता.
शुभ मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थीला संकल्प घ्या अन् उपासना सुरू करा
गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी ‘मासानां मार्गशीर्षोऽहम’ म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो, असे म्हटले आहे. मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. याच शुभ मार्गशीर्ष महिन्यापासून गणपतीची एक उपासना संकल्प करून सुरू केल्यास २०२६ या नवीन वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यात त्याची अनुभूति अनुभवायला मिळू शकते, असे सांगितले जाते. कारण याच्या कर्त्यानेच तशी ग्वाही यामध्ये दिलेली आढळते. गणपतीची निगडीत अनेक प्रकारची स्तोत्रे, मंत्र प्रभावी मानली गेली आहेत. यातील एक महत्त्वाचे आणि संकट दूर करणारे स्तोत्र म्हणजे संकटनाशन गणेश स्तोत्र.
अत्यंत प्रभावी संकटनाशन गणेश स्तोत्र
देवर्षी नारद यांनी रचलेले संस्कृत स्तोत्र कवी श्रीधर यांनी मराठीत अनुवादित केले. त्यामुळे ज्यांना संस्कृत येत नाही, त्यांनाही हे स्तोत्र पठण करणे सोपे झाले. त्यात गणरायची बारा नावे आहेत व शेवटी स्तोत्राची फलश्रुती दिली आहे. त्यात असे म्हटले आहे की, हे प्रासादिक स्तोत्र त्रिकाळ अर्थात सकाळ, दुपार, सायंकाळ म्हटले तर त्याचे फळ निश्चित मिळते. आणि फळ काय तर? उपासना सुरू केल्यापासून सहा महिन्यात विद्यार्थ्याला विद्या, गरजवंताला धन आणि मोक्षार्थ्याला गती मिळते. हे स्तोत्र मनोभावे म्हटले असता सहा मासात या स्तोत्राची अनुभूति येऊ लागेल आणि वर्षभरात निश्चित फळ मिळेल, असा दावा या स्तोत्राचे रचेते महर्षी नारद करतात. त्यामुळे संकष्ट चतुर्थीचे औचित्य साधून भाविकांनी हे सोपे सुलभ आणि फलदायी स्तोत्र पठण सुरू करावे.
संस्कृत संकटनाशन गणेश स्तोत्र
प्रणम्यं शिरसा देव गौरीपुत्रं विनायकम ।
भक्तावासं: स्मरैनित्यंमायु:कामार्थसिद्धये ॥१॥
प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकम ।
तृतीयं कृष्णं पिङा्क्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥
लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकम् ॥३॥
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्य य: पठेन्नर: ।
न च विघ्नभयं तस्य सर्वासिद्धिकरं प्रभो ॥५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ॥६॥
जपेद्वगणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ॥७॥
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वां य: समर्पयेत ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥
॥ इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं गणेशस्तोत्रं सम्पूर्णम् ॥
संकटनाशन गणेश स्तोत्र मराठी
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका ।
भक्तीनें स्मरतो नित्य आयुःकामार्थ साधती ॥ १ ॥
प्रथम नांव वक्रतुंड दुसरें एकदंत ते ।
तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते ॥ २ ॥
पांचवे श्रीलंबोदर सहावें विकट नांव ते ।
सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते ॥ ३ ॥
नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक ।
अकरावे गणपती बारावे श्री गजानन ॥ ४ ॥
देवनांवे अशी बारा तीन संध्या म्हणे नर ।
विघ्नभीती नसे त्याला प्रभो ! तू सर्व सिद्धि दे ॥ ५ ॥
विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन ।
पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गति ॥ ६ ॥
जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ ।
एक वर्ष पुर्ण होतां मिळे सिद्धी न संशय ॥ ७ ॥
नारदांनी रचिलेले झाले संपू्र्ण स्तोत्र हें ।
श्रीधराने मराठींत पठण्या अनुवादिले ॥ ८ ॥
॥ संकटनाशनं श्रीगणपती स्तोत्र संपूर्ण ॥
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥