समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 18:16 IST2025-12-06T18:15:29+5:302025-12-06T18:16:42+5:30
Margashirsha Sankashti Chaturthi December 2025: २०२५ ची शेवटची मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी रविवारी आल्याने संकटमुक्त होण्यासाठी गणपतीची ही सेवा करणे शक्य होऊ शकते. जाणून घ्या...

समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
Margashirsha Sankashti Chaturthi December 2025: गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी ‘मासानां मार्गशीर्षोऽहम’ म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो, असे म्हटले आहे. मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. याच मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी रविवार, ०७ डिसेंबर २०२५ रोजी आहे. या संकष्ट चतुर्थीला गणपतीचे एक अतिशय प्रभावी स्तोत्र आवर्जून म्हणा. रविवारी संकष्ट चतुर्थी आल्यामुळे ही सेवा सहज घडू शकते.
गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे आराध्य दैवत! गणपती ही वैश्विक देवता आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थी व्रत कोणीही करू शकतो. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने अडचणी, समस्येतून बाहेर पडण्यासाठी गणपतीचे नामस्मरण, काही विशेष स्तोत्रांचे पठण, मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ, पुण्यफलदायी, लाभदायी ठरू शकते, असे सांगितले जाते.
गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
आताच्या धकाधकीच्या जीवनात अनेक अडचणी, समस्यांचा सामना करावा लागतो. आपल्या समस्या, अडचणी संपतच नाहीत, असेच अनेकदा वाटत राहते. अनेक गोष्टींमुळे कायम पैशांची चणचण भासत राहते. अनेकदा कर्जाचे ओझे वाढत जाते. बाकी कसलीही सोंगे आणता येतात, पण पैशांचे सोंग आणता येत नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे आर्थिक स्वरूपाच्या समस्या, अडचणी आल्या तर सगळे काही अवघड होऊन बसते. या समस्येतून काही अंशी दिलासा मिळावा, अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडावा, यासाठी एक स्तोत्र अतिशय प्रभावी ठरते, असे सांगितले जाते. हे प्रभाव स्तोत्र म्हणजे ‘ऋणमुक्ती स्तोत्र’. हे स्तोत्र एक दिवस म्हणून उपयोगाचे नाही, तर संकष्टीच्या मुहूर्तावर या स्तोत्र पठणाची सुरुवात करावी आणि रोज एक वेळ ठरवून न चुकता अकरा वेळा हे स्तोत्र म्हणावे. अनन्यभावे गणेशाला शरण जावे आणि आर्थिक अडचणी दूर होऊ दे आणि कर्जमुक्ती होऊ दे अशी विनंती करावी.
ऋणमुक्ती स्तोत्र
अस्य श्रीऋणविमोचनमहागणपतिस्तोत्रमन्त्रस्य शुक्राचार्य ऋषि: ऋणविमोचन महागणपतिर्देवता, अनुष्टुप छन्द:, ऋणविमोचनमहागणपतिप्रीत्यर्थे जपे विनियोग:।
ॐ स्मरामि देवदेवेशं वक्रतुण्डं महाबलम । षडक्षरं कृपासिन्धुं नमामि ऋणमुक्तये ।।१।।
महागणपतिं वन्दे महासेतुं महाबलम । एकमेवाद्वितीयं तु नमामि ऋणमुक्तये ।।२।।
एकाक्षरं त्वेकदन्तमेकं ब्रह्म सनातनम । महाविघ्नहरं देवं नमामि ऋणमुक्तये ।।३।।
शुक्लाम्बरं शुक्लवर्णं शुक्लगंधानुलेपनम । सर्वशुक्लमयं देवं नमामि ऋणमुक्तये ।।४।।
रक्ताम्बरं रक्तवर्णं रक्तगंधानुलेपनम । रक्तपुष्पै: पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये ।।५।।
कृष्णाम्बरं कृष्णवर्णं कृष्णगंधानुलेपनम । कृष्णयज्ञोपवीतं च नमामि ऋणमुक्तये ।।६।।
पीताम्बरं पीतवर्णं पीतगंधानुलेपनम । पीतपुष्पै: पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये ।।७।।
सर्वात्मकं सर्ववर्णं सर्वगन्धानुलेपनम । सर्वपुष्पै: पूज्यमानं नमामि ऋणमुक्तये ।।८।।
एतदृणहरं स्तोत्रं त्रिसन्ध्यं य: पठेन्नर: । षण्मासाभ्यन्तरे तस्य ऋणच्छेदो न संशय: ।।९।।
सहस्त्रदशकं कृत्वा ऋणमुक्तो धनी भवेत ।।१०।।
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥