मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: उपास सोडताना ‘या’ चुका होत नाही ना? अन्यथा उपासना वाया; पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 15:41 IST2025-12-06T15:37:59+5:302025-12-06T15:41:47+5:30
Margashirsha Sankashti Chaturthi December 2025: संकष्ट चतुर्थीला उपास करणाऱ्यांची संख्या मोठी असते. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयावेळी नेमके काय करावे? जाणून घ्या...

मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: उपास सोडताना ‘या’ चुका होत नाही ना? अन्यथा उपासना वाया; पाहा
Margashirsha Sankashti Chaturthi December 2025: रविवार, ०७ डिसेंबर २०२५ रोजी संकष्ट चतुर्थी आहे. मार्गशीर्ष महिन्यातील ही संकष्टी विशेष मानली जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विशेष पूजन, नामस्मरण, उपासना, आराधना करण्याची प्राचीन परंपरा आजपर्यंत अखंडितपणे सुरू असल्याचे पाहायला मिळते. हजारो भाविक संकष्ट चतुर्थीला उपास करतात. उपासना उपयुक्त व्हावी. त्याची शुभ फळे मिळावीत, बाप्पापर्यंत ती पोहोचावी, अशी मनापासूनची इच्छा असते. परंतु, काही वेळेस केवळ एका चुकीमुळे उपासना वाया जाऊ शकते, असे म्हटले जाते.
२०२५ शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ राजयोग, बाप्पा ११ राशींना मागा ते देईल; हवे ते घडेल, शुभ होईल!
संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने गणपती बाप्पाला आवडत्या गोष्टी, पदार्थ अर्पण केले जातात. अगदी काही नाही तरी गूळ आणि खोबऱ्याला नैवेद्य दाखवला जातो. ज्यांना शक्य असते, ते सकाळी अभिषेक, विशेष पूजन, संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण करतात. या दिवशी हजारो भाविक आवर्जून गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतात. बाप्पाची मर्जी संपादन करण्यासाठी सर्व गोष्टी भक्ती भावाने करत असतो. या गोष्टींबरोबरच आणखी तीन चार गोष्टींची काळजी घेतली तर आपल्या व्रताला नक्कीच पूर्णत्व येऊ शकेल, असे म्हटले जाते.
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
उपास सोडताना ‘या’ चुका होत नाही ना?
- सकाळी पूजन, नामस्मरण करताना स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. हाच नियम सायंकाळी उपास सोडतानाही पाळावा, असे सांगितले जाते.
- संकष्ट चतुर्थी व्रत हे चंद्र दर्शन घेऊन मगच पूर्ण होते. चंद्र दर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे शास्त्र सांगते. हे चंद्र दर्शन घेताना चंद्राला नैवेद्य दाखवून पाण्याने अर्घ्य द्यावे. असे करत असताना हे पाणी आपल्याच पायावर पडणार नाही, याची काळजी अवश्य घ्यावी.
- संकष्ट चतुर्थीला दिवसभर उपास केल्यावर गणपती पूजन करावे. अथर्वशीर्ष किंवा गणेश स्तोत्र ११ वेळा किंवा २१ वेळा आणि अगदीच शक्य नसेल तर निदान एक वेळा एका जागी स्थिर बसून म्हणावे. त्यामुळे मन शांत राहते. मन शांत झाले की नवनवीन गोष्टी आत्मसात होण्यास मदत होते.
- संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अर्पण करतो. कारण या दोन्ही गोष्टी बाप्पाला प्रिय असतात. परंतु या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतील तर पर्याय म्हणून तुळशी दल बाप्पाला वाहू नये. एकवेळ हात जोडून मनोभावे नमस्कार करावा पण तुळशी कदापि वाहू नये, असे सांगितले जाते.
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥