महाशिवरात्री: ‘या’ पॉवरफूल मंत्रांचा यथाशक्ती जप करा अन् अपार शिवकृपा मिळवा; शुभच घडेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:54 IST2025-02-25T12:53:37+5:302025-02-25T12:54:43+5:30

Mahashivratri 2025 Powerful Mantra Shiva Mahadev: अनेक घरांमध्ये नित्यनेमाने दररोज शिवमंत्र, श्लोक, स्तोत्रे म्हटली जातात.

mahashivratri 2025 chant these powerful and impactful mantra of lord shiva to get best auspicious benefits | महाशिवरात्री: ‘या’ पॉवरफूल मंत्रांचा यथाशक्ती जप करा अन् अपार शिवकृपा मिळवा; शुभच घडेल!

महाशिवरात्री: ‘या’ पॉवरफूल मंत्रांचा यथाशक्ती जप करा अन् अपार शिवकृपा मिळवा; शुभच घडेल!

Mahashivratri 2025 Powerful Mantra Shiva Mahadev: महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. शंकर महायोगी, अतुल पराक्रमी असूनही त्यागी, विरागी असा आहे.  बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. संपूर्ण देशात महाशिवरात्री मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. लाखो भाविक शिव मंदिरात जाऊन विशेष पूजन, जलाभिषेक, रुद्राभिषेक करतात. शंकराचे नामस्मरण, उपासना, मंत्रांचा जप केला जातो. महादेवांचे असे काही मंत्र सांगितले गेले आहेत, जे प्रभावी असून, यथाशक्ती जप केल्यास सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतो, असे म्हटले जाते. 

लाखो घरांमध्ये नित्यनेमाने दररोज शिवमंत्र, श्लोक, स्तोत्रे म्हटली जातात. शिवसंबंधीत रचनांचे पठण, श्रवण केले जाते. मात्र, काही मंत्र, श्लोक, स्तोत्रे यांचे जप, पठण किंवा श्रवण महाशिवरात्रीला करणे शुभ पुण्यदायी मानले जाते. महाशिवरात्रीनिमित्त शिवपूजा विशेष प्रकारे करावी. त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा, असे सांगितले जाते. 

ध्यायेनित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसम् ।
रत्नाकल्पोज्वलांगं परशुमृगवरा भीतीहस्तं प्रसन्नम् ।।
पद्मासीनं समन्तात्सु तममरगणैव्याघ्रकृत्तिं वसानम्।
विश्वाद्यं विश्ववंद्यम् निखिलभयहरं पन्चवक्त्रं त्रिनेत्रम् ।।

असा मंत्र म्हणून व्रतपूजनाचा संकल्प करावा. शिवाची मनोभावे षोडशोपचार पूजा करावी. अभिषेक करावा. पूजाविधी झाल्यानंतर ।। ॐ नमः शिवाय।। या मूलमंत्राचा १०८ वेळा जप करून पूजेची समाप्ती करावी.

ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात।

महादेव शिवशंकराचा गायत्री मंत्र अत्यंत प्रभावी असल्याची मान्यता आहे. शिवपुराणात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. महाशिवरात्रीला महादेवाच्या गायत्री मंत्राचे केलेले पठण शुभलाभदायक मानले जाते. या मंत्रांचा १०८ वेळा जप करावा. मात्र, १०८ वेळा शक्य नसेल, तर यथाशक्ती मंत्राचा जप करावा, असे सांगितले जाते. 

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्‌। 
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्।।

महादेव शिवनाथांचा महामृत्यूंजय मंत्र अतिशय फलदायी असल्याचे सांगितले जाते. यथाशक्ती या मंत्राचा जप करावा. मात्र, या मंत्राचा जप करताना काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे मानले जाते. या मंत्राचा जप करण्यापूर्वी महादेवांसमोर तुपाचा दिवा लावावा. जप पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत ठेवावा. यासह जप करताना मंत्रोच्चारण सुस्पष्ट असावे, असे काही नियम सांगितले जातात. अनेक ऋषी, संत-महंत, कवी, दिग्गज रचनाकारांनी महादेवांवर रचना केल्याचे आढळून येते. शंकराची शिवस्तुति, शिवमहिम्न स्तोत्र, रुद्र, शिवचालिसा, रुद्राष्टकम्, शिवतांडव, लिंगाष्टकम्, शिवमानस पूजा, शिवलीलामृत यांसह अन्य मंत्र, श्लोक, स्तोत्रे यांचे केलेले पठण शुभफलदायी ठरू शकते. पठण शक्य नसेल, तर मनोभावे, एकचित्ताने श्रवण करावे, असे म्हटले जाते. 

 

Web Title: mahashivratri 2025 chant these powerful and impactful mantra of lord shiva to get best auspicious benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.