Mahakumbh 2025: नागा साधूंनी विवस्त्र स्थितीत स्नान केले तर चालते, पण संसारी लोकांनी नाही; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 11:53 IST2025-01-30T11:52:56+5:302025-01-30T11:53:31+5:30
Mahakumbh 2025: नागा साधू कायम विवस्त्र असतात, त्यांना स्नानाची बंधने नसतात, पण संसारी लोकांना ती पाळावीच लागतात, मग ते शाही स्नान असो नाहीतर रोजची अंघोळ!

Mahakumbh 2025: नागा साधूंनी विवस्त्र स्थितीत स्नान केले तर चालते, पण संसारी लोकांनी नाही; कारण...
महाकुंभ मेळ्यात शाही स्नानाचा पहिला मान नागा साधूंना असतो, त्यांनी स्नान केल्यावर इतर भाविकांना स्नान करण्याची संधी मिळते. उलट तसे करणे भाग्याचे लक्षण मानले जाते. नागा साधू कायम दिगंबर स्थितीत अर्थात विवस्त्र राहतात. त्यामुळे स्नान करताना त्यांना वेगळी बंधने नसतात. याउलट संसारी व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, त्यांना शास्त्राची बंधने पाळावी लागतात आणि त्यानुसार अंगावर एक तरी वस्त्र अंघोळ करताना ठेवावेच लागते. मग ते कुंभमेळ्यातील स्नान असो नाहीतर रोजची अंघोळ! पण असे का? ते जाणून घेऊ.
आजही आपण आई आजीने सांगितलेल्या अनेक गोष्टींचे पालन करतो. काही गोष्टी तर्क सुसंगत असतात तर काही गोष्टी केवळ त्यांची श्रद्धा म्हणून आपणही करतो. मात्र नीट विचार केला तर त्या प्रत्येक कृतीमागे काही ना काही कारण दडलेले असे. पूर्ण विवस्त्र स्थितीत अंघोळ करू नये या शास्त्र संकेतांमागेही कारण दडले आहे, त्या आधी पौराणिक संदर्भ जाणून घेऊ.
ज्योतिष अभ्यासक देवदत्त जोशी लिहितात, 'श्रीमद भागवत पुराणात दहाव्या स्कंधात, बाविसाव्या अध्यायात कथा आहे, की कृष्णासारखा पती आपल्याला मिळावा म्हणून गोपिकांनी कात्यायनी देवीचे व्रत केले. हे व्रत करताना गोपिका यमुना नदीत व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र होऊन स्नान करत असताना श्रीकृष्ण म्हणतात-
यूयं विवस्त्रा यदपो धृतव्रता, व्यगाहतैतत तदु देवहेलनम
बद्धवांजली मुर्धन्यपनुत्तयेsहस: कृत्त्वा नमोsधो वसनं प्रगृह्यताम !!
अर्थ : मुलींनो, तुम्ही व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र होऊन या पाण्यामध्ये स्नान केलेत, त्यामुळे जलदेवता वरुण आणि यमुना नदी यांची अवहेलना झाली आहे. म्हणून या दोघांचे निवारण करण्यासाठी तुम्ही आपले हात मस्तकावर जोडून त्यांना नमस्कार करा आणि नंतर आपापली वस्त्रे घ्या.
तात्पर्य हे की विवस्त्र अंघोळ केल्याने जलदेवता व वरुण देवतेची अवहेलना होते. अनादर, अपमान होतो म्हणून विवस्त्र स्नान करू नये.
यामागील तर्क काय असू शकतो?
तर पूर्वी घरात एकत्र कुटुंब पद्धत होती. न्हाणीघर स्वतंत्र असले तरी चुकभुलीने दाराची कडी नीट लागली नाही आणि पटकन कोणी प्रवेश केला तर निदान लज्जा रक्षणापुरते अंगावर कपडे असले तर त्या स्थितीत दोघांना अवघडणार नाही. म्हणून पंचा नेसून अंघोळ करण्याची पूर्वी प्रथा होती. कापड ओले करणे असे त्या पद्धतीला म्हणत असत.
सद्यस्थितीत विभक्त कुटुंब असल्याने तशी भीती राहिलेली नाही. तरीसुद्धा कोणता प्रसंग कधी येईल सांगता येत नाही. यासाठी पूर्वकाळजी म्हणून निदान कमरेचे अंतर्वस्त्र घालून अंघोळ करावी आणि अंघोळ झाल्यावर पंचा, टॉवेल गुंडाळून ओले कपडे बदलावेत असे ज्येष्ठ मंडळी सांगतात.