Maha Kumbh Mela 2025 Amrit Shahi Snan Dates: कोट्यवधी भाविक ज्याकडे डोळे लावून बसले होते, त्या प्रयागराज महाकुंभाचा १३ जानेवारी रोजी शंखनाद झाला. २६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभात तब्बल ४० कोटी भाविक सामील होतील असा अंदाज वर्तवला जातो आहे. जगभरातून लक्षावधी भाविकांची पावलं या पर्वणीकडे पडताहेत. १४४ वर्षांनी येणाऱ्या या महाकुंभाला हजेरी लावून आध्यात्मिक अनुभूतीची आस सगळ्यांनाच आहे. मौनी अमावास्येच्या निमित्ताने महाकुंभमेळ्यातील शाही स्नान झाले. तत्पूर्वी महाकुंभ मेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणाऱ्यांची संख्या १५ कोटींच्या पुढे गेले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार, प्रशासनाने भाविकांची आणि पर्यटकांसाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्था केली आहे. अनेकांवर यशस्वी उपचार करण्यात आले. वैद्यकीय मदत पुरवली गेली.
मौनी अमावास्येला महाकुंभमेळ्यात सहभागी होत शाही स्नान अनुभवण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली. यावेळी या ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे यंदाच्या महाकुंभमेळ्याला गालबोट लागल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, गेल्या १७ दिवसांत १५ कोटींहून अधिक लोकांनी महाकुंभात स्नान केले आहे. गेल्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने ३.५ कोटी भाविक, पूज्य साधू, संत-महंतांनी महाकुंभात अमृत स्नान केले होते.
मौनी अमावास्या आणि अमृत शाही स्नानाचे महत्त्व
महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला होणाऱ्या अमृत स्नानाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या अमृत स्नानासाठी लाखो लोक जमले होते. यावेळी अमृतस्नानासाठी त्रिवेणी योग तयार होत असल्याने गर्दी अधिक होती. हिंदू प्रथांनुसार १४४ वर्षांनंतर त्रिवेणी योग आला आहे. महाकुंभासाठी तयार करण्यात आलेल्या सरकारच्या संकेतस्थळानुसार या महाकुंभात एकूण सहा शाही स्नान आहेत. सर्व अमृत स्नानांमध्ये मौनी अमावस्येची तिथी सर्वात शुभ मानली जाते. या दिवशी पवित्र नद्या 'अमृत' बनतात, अशी समजूत आहे. त्यानुसार, अमृत स्नान शाही स्नान म्हणतात हा महाकुंभमेळ्यातील सर्वांत भव्य आणि पवित्र विधी मानला जातो. हे स्नान काही विशिष्ट तिथीला असल्याने देशभरातून आणि जगभरातून लाखो लोक महाकुंभमेळ्यात पोहोचतात.
अजून किती ‘शाही स्नान’ बाकी? शेवटचे अमृत स्नान कधी होणार?
महाकुंभमेळा सुरू झाल्यापासून पौष पौर्णिमा, मकर संक्राती आणि मौनी अमावास्येच्या दिवशी अमृत शाही स्नान झाले. यानंतर आता ०३ फेब्रुवारी २०२५ रोजी वसंत पंचमीला पुढील शाही स्नान होणार आहे. माघ शुद्ध पंचमी तिथीला वसंत पंचमी म्हटले जाते. हा सण साजरा करण्यासाठी कल्पवासी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात. या दिवशी नदीत स्नान, दानपुण्य आणि पूजनाला विशेष महत्त्व असते. यानंतर १२ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ पौर्णिमा या दिवशी शाहीस्नान होणार आहे. माघ पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करून वस्त्रदान आणि गोदान केल्याने अनेक प्रकारच्या कष्टांचे निवारण होते, अशी मान्यता आहे. माघ पौर्णिमा हा कल्पवास पूर्ण होण्याचे पर्व मानला जाते. एका महिन्याच्या तपस्या आणि साधनेची पूर्णता या तिथीला होते, असे म्हणतात. २०२५ च्या महाकुंभमेळ्यातील शेवटचे शाही स्नान माघ वद्य चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्रीला म्हणजेच २६ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. हा महाकुंभमेळ्याच्या अंतिम स्नानाचा दिवस मानला जातो. या दिवशी नदीतील पवित्र पाण्यात आंघोळ करून गंगाजलाने शिवलिंगाचे पूजन व अभिषेक केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते.
दरम्यान, आयआयटी बाबा, रुद्राक्षांच्या माळा विकणारी मोनालिसा, अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला प्रदान करण्यात आलेले महामंडलेश्वर पद, मॉडेल असलेली पण दीक्षा घेतल्याचा दावा करणारी हर्षा रिछारिया यांमुळे महाकुंभमेळा चांगलाच गाजला. याशिवाय विविध आखाड्यातील संत-महंत, नागा साधू तसेच आखाड्यांच्या विविध पद्धती, वेषभूषा यांसारख्या अनेक कारणांमुळे २०२५चा महाकुंभमेळा विशेष संस्मरणीय ठरला.