Life lesson: अपेक्षाभंगाचे दु:ख वाईट; ते तुमच्या वाट्याला येऊ नये म्हणून 'हे' पाच नियम आवश्यक!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 01:45 PM2024-03-21T13:45:54+5:302024-03-21T13:46:24+5:30

Life Lesson: इतरांकडून तसेच स्वतःच्या अपेक्षा कमी केल्याने तुम्हाला आयुष्यभर आनंद आणि मानसिक शांती मिळू शकते, ती मिळवण्याचे सोपे नियम!

Life lesson: Disappointment is bad; Five rules are necessary to prevent it from happening to you! | Life lesson: अपेक्षाभंगाचे दु:ख वाईट; ते तुमच्या वाट्याला येऊ नये म्हणून 'हे' पाच नियम आवश्यक!

Life lesson: अपेक्षाभंगाचे दु:ख वाईट; ते तुमच्या वाट्याला येऊ नये म्हणून 'हे' पाच नियम आवश्यक!

अवास्तव अपेक्षा असणे हे आपल्या नातेसंबंधासाठी, करिअरसाठी, आनंदासाठी आणि सर्वसाधारणपणे जीवनासाठी विष आहे असे मानले जाते. एखाद्या व्यक्तीकडून किंवा स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवणे हे दुःखी असण्याचे कारण आहे. योग्यतेच्या तुलनेत कमी मोबदला मिळतोय? जोडीदाराकडून हवे तेवढे प्रेम मिळत नाहीये? लोक आपल्याला विचारत नाहीत? आठवणीने कोणी फोन करत नाही, ही आणि अशी अनेक कारणं आपल्या दुःखाचे मूळ आहे हे लक्षात घेतले पाहिजे. या अपेक्षा अवास्तव किंवा अनाठायी असतात असे नाही, पण त्या पूर्ण झाल्या नाही की आपण अस्वस्थ होतो. म्हणून या अपेक्षांचे ओझे हलके कसे करता येईल यासाठी प्रयत्न करूया. 

‘मा फलेषु कदाचन हे गीतेतील प्रसिद्ध वाक्य आपण सर्वांनी ऐकले आहे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल पण ते तुमच्या अपेक्षेनुसार असेलच असे नाही किंवा मिळेलच असेही नाही. त्यामुळे फळाची अपेक्षा ठेवून काम करू नका. पण हे वाटते तेवढे सोपे नाही. अशा वेळी आपण आपले काम आनंद मिळावा एवढ्याच हेतूने केले तर? नात्यातून अपेक्षा ठेवण्याऐवजी आनंद आणि प्रेम देणं एवढे आपण कर्तव्य समजून करू शकत नाही का? भविष्यात काय मिळेल याची अपेक्षा ठेवण्याऐवजी वर्तमानात, आता आहे तो क्षण आपण जगू शकत नाही का? हे सगळं आपण नक्कीच करू शकतो. फक्त आपला फोकस स्वतःच्या कर्तव्यावरून  हटून समोरच्यांच्या अपेक्षांवर सरकतो आणि सगळं करूनही आपण दुःखीच राहतो. 

कोणतीही अपेक्षा न ठेवता जीवन जगणे हा सर्वात मूलभूत आणि प्रभावी आनंद आहे. आम्हाला माहित आहे, हे पूर्ण करण्यापेक्षा बोलणे सोपे आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला तुमच्या अपेक्षा कमी करण्याचे मार्ग शिकण्यास मदत करण्यासाठी येथे आहोत.

तसे होऊ नये यासाठी पुढील पाच नियम पाळा :

१. स्वावलंबी व्हा

तुम्ही नेहमी लक्षात ठेवायला हवे की तुम्ही इतरांकडून काही अपेक्षा करण्यापूर्वी, तुम्ही शक्य तेवढे स्वावलंबी व्हायला हवे. आत्मपरीक्षण करून स्वतःला विचारावे, 'साध्या कामासाठी मला दुसऱ्यांवर विसंबून राहणे खरेच गरजेचे आहे का? अनेकदा आपण आपली कामे आपल्याला हव्या त्या पद्धतीने पटकन करून मोकळे होऊ शकतो. पण दुसऱ्यांवर विसंबून राहून त्यांच्याकडून आपल्या अपेक्षा पूर्ण व्हायची आपण वाट बघत बसतो आणि त्या नाही झाल्या की दुःखी होतो. 

२. आत्मसंवाद महत्त्वाचा 

आपल्याला स्वतःवर लक्ष केंद्रित करणे सुरू करावे लागेल आणि आपण खरोखर काय साध्य करू शकतो याचीच अपेक्षा ठेवावी लागेल. रोज आरशासमोर उभं राहून स्वत:ला विचारावं, “माझ्याकडून माझी काय अपेक्षा आहे?, माझ्या आयुष्याच्या या वळणावर ती पूर्ण होऊ शकते का? ती अपेक्षा खरंच महत्त्वाची आहे का? काय अडचणी येतील? मी ठरवलेली उद्दिष्टे साध्य करू शकलो नाही तर मी स्वतःला माफ करू शकेन का?  किंवा इतरांकडून अशा अपेक्षा ठेवणे माझ्यासाठी योग्य आहे का?" या प्रश्नांची उत्तरं शोधताना तुमचे मन मोकळे करण्यात आणि सहज पूर्ण होणाऱ्या अपेक्षा ठेवण्यास मदत होईल.

3. स्वतःची इतरांशी तुलना करू नका

प्रत्येकाचे आयुष्य वेगळे आहे. गरजा वेगळ्या आहेत. स्वप्नं वेगळी आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी घेतले जाणारे कष्टही वेगळे आहेत. त्यामुळे दुसऱ्यांचे सुख, यश पाहून हुरळून जाऊ नका. किंवा त्यांच्या तुलनेत स्वतःला कमी लेखू नका. दुसऱ्यांशी चढाओढ करण्यापेक्षा कालच्या पेक्षा आपण आज जास्त प्रगती कशी करू शकू यावर लक्ष द्या. जेणेकरून तुम्ही कायम प्रगती पथावर राहाल आणि अपेक्षा भंगाचे दुःख होणार नाही. 

४. तुम्हाला इतरांकडून अपेक्षा करण्याचा अधिकार नाही

प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आहे तसे दुःखही आहे, आव्हाने आहेत. आपण आत्मकेंद्री राहून विचार करतो की प्रत्येकाने माझ्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, माझी काळजी घ्यावी, मला काय वाटेल याचा विचार करावा. पण प्रत्यक्षात दुसऱ्याचा विचार करायला, काळजी घ्यायला कोणाकडेही एवढा रिकामा वेळ नाही. त्यामुळे स्वतःला फार गोंजरात बसू नका आणि आपल्याला कोणी महत्त्व देत नाही म्हणून नाराज होऊ नका. स्वतःची किंमत स्वतः करा, जग तुमची किंमत करेल. 

५. नम्र राहण्यासाठी पुढील गोष्टींचे पालन करा: 

>>आपण सर्वज्ञ अर्थात आपल्याला सर्व काही कळते हा गैर समज दूर करा. 
>>स्वतःला अति महत्त्व न देता सर्वसामान्य समजा. 
>>आपल्याला सगळं कळतं असं वाटून न घेता दुसऱ्याकडूनही शिकण्यासारखं बरंच काही आहे हे लक्षात ठेवा. 
>>कोणालाही कमी लेखू नका. 
>>माझ्यासम मीच हे समजण्याची चूक करू नका. 
>>स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवू नका, आपले ध्येय गाठा, जे सिद्ध करायचे आहे ते आपोआप साध्य होईल. 

लक्षात ठेवा की यामुळे तुमच्या अपेक्षा लगेच कमी होणार नाहीत. तुम्हाला त्यांचा सातत्याने सराव करावा लागेल, तुमची गोष्टी समजून घेण्याची पद्धत बदलावी लागेल, प्रयत्न करावे लागतील जेणेकरून सवयीने तुम्ही आनंदी जीवन जगण्यासाठी अपेक्षांच्या ओझ्यातून मुक्त व्हाल!

Web Title: Life lesson: Disappointment is bad; Five rules are necessary to prevent it from happening to you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.