८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 13:42 IST2025-10-20T13:39:36+5:302025-10-20T13:42:07+5:30
Laxmi Pujan 2025: यंदाच्या लक्ष्मी पूजनाला अत्यंत अद्भूत शुभ योग जुळून आले असून, लक्ष्मी पूजन झाल्यावर लक्ष्मी देवीची आरती आवर्जून म्हणावी, असे सांगितले जाते.

८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
Laxmi Pujan 2025: दिवाळीचा अत्यंत शुभ काळ सुरू आहे. यातील प्रत्येक दिवसाचे महात्म्य, महत्त्व वेगळे आहे. सांस्कृतिक, धार्मिक यांसह नैसर्गिक आणि शास्त्रीय दृष्ट्याही भारतीय सणांचे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे. दिवाळीतील दिवसांपैकी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन. शरद पौर्णिमेची रात्र जशी मोठी असते, तशी अश्विन अमावास्या ही सर्वांत मोठी रात्र असते, अशी मान्यता प्रचलित असल्याचे सांगितले जाते. अनेकार्थाने लक्ष्मी पूजनाचा दिवस महत्त्वाचा मानला गेला आहे.
मंगळवार, २१ ऑक्टोबर २०२५ रोजी अश्विन अमावास्येला लक्ष्मी पूजन आहे. सायंकाळी ०५ वाजून ५४ मिनिटांनी अमावास्या समाप्त होत आहे. लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त सायंकाळी ०६ वाजून १० मिनिटे ते रात्रौ ०८ वाजून ४० मिनिटे असा आहे. या निमित्ताने अष्टदल कमलावर लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा करतात. लक्ष्मी हे सौंदर्याचे, प्रेमाचे व वैभवाचे प्रतीक आहे. संयमपूर्वक धन संपादन केले, तर मनुष्याचे कल्याण होते. यासाठी धनलक्ष्मीची या दिवशी पूजा करायची असते. अश्विन अमावास्येला लक्ष्मी या दिवशी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, मांगल्य, प्रकाश आढळेल, तेथे ती निवास करते अशी समजूत असल्यामुळे या रात्री दिव्याची रोषणाई करतात. घरातील कचरा घाण म्हणजे अलक्ष्मी दूर करणारी केरसुणी हिला लक्ष्मी मानून तिची पूजा करण्याची चाल काही ठिकाणी आहे.
विशेषतः प्रदोषकाली लक्ष्मीची पूजा करावी
ऋग्वेदाच्या परिशिष्ट म्हणून समजल्या जाणाऱ्या श्रीसूक्ताची देवता ‘श्री’ म्हणजेच ‘लक्ष्मी’ होय. कारण श्रीसूक्तानेच लक्ष्मीची उपासना केली जाते. श्री किंवा लक्ष्मी ही संपत्तीची अधिष्ठात्री देवता. ही स्वयंप्रकाशी, हिरण्मयी, अश्व-रथ-गजादी संपत्तीची स्वामिनी, पद्मनिवासिनी आणि पद्ममाला धारण करणारी म्हणून प्रसिद्ध आहे. ही लक्ष्मी दारिद्र्याचा नाश करते. सर्व भूतांवर सत्ता चालविणारी लक्ष्मी मनाच्या इच्छा पूर्ण करते. वाणीच्या सत्याची प्राप्ती करून देते. ज्या ज्या वेळी विष्णू अवतार घेतो त्या त्या वेळी लक्ष्मीसुद्धा विष्णुची सहचरी होण्यासाठी अवतार घेते. वामनावतारात तिने पद्मेचा अवतार घेतला. परशुरामाच्या अवतारात तिने धरणीचे रूप घेतले. रामावतारात ती सीता बनली आणि कृष्णावतारात ती रुक्मिणीच्या स्वरूपात अवतरली. इहलोकी संपत्तीची आणि सौंदर्याची स्वामिनी असलेली लक्ष्मी दु:शील आणि अस्वच्छ व्यक्तींचा त्याग करते. जेथे हरिपूजा आणि हरिकिर्तन होत नाही, त्या स्थानाचा ती त्याग करते. कमळ, गज, सुवर्ण आणि बिल्वफळ ही लक्ष्मीच्या नित्य सांनिध्यात असतात. या लक्ष्मीची पूजा स्त्रियांनी चैत्र, भाद्रपद व पौष मासांत विशेषतः करावी. दीपावलीतील अमावस्येस लक्ष्मीपूजेचा विशेष विधी पुराणांत उल्लेखिलेला दिसतो. या दिवशी विशेषतः प्रदोषकाली लक्ष्मीची पूजा करावी, असे सांगितले जाते.
गृहातील गृहिणी म्हणून गृहलक्ष्मी बनली
वैकुंठातील या लक्ष्मीस महालक्ष्मी अशी संज्ञा होती. या महालक्ष्मीने योगद्वारा नाना रूपे धारण केली. कृष्णाबरोबर वैकुंठात तिने रमेचे रूप धारण केले. स्वर्गात ती इंद्रैश्वर्यरूपी स्वर्गलक्ष्मी बनली. पाताळात व मर्त्यलोकात राजांच्या ठिकाणी राजलक्ष्मी म्हणून ती वास करू लागली आणि गृहातील गृहिणी म्हणून गृहलक्ष्मी बनली. तैत्तिरीय उपनिषदात वस्त्र, गोधन, अन्न आणि पेय यांचा श्री म्हणजे लक्ष्मी असा निर्देश केला आहे. लक्ष्मीला “श्री” म्हणजे “समृद्धी” “आनंद”, “वैभव” असे म्हणले जाते; लक्ष्मीला माधवी, रमा, कमला, श्री अशी अनेक नावे आहेत. श्रीलक्ष्मी म्हणजे धनधान्य समृद्धीची देवता.
८०० वर्षांनी लक्ष्मी पूजनाला अद्भूत योग
दिवाळी मध्ये आश्विन अमावास्येला प्रदोषकाळी लक्ष्मीपूजन करतात. या दिवशी लोक लक्ष्मीनारायण, कुबेर, गणेशाची तसेच धनलक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्र वा श्रीचक्र, शंख याची स्थापना करून पूजा करतात. लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना करतात. भारतात कलश हे समृद्धीचे लक्ष्मीचे प्रतीक समजले जाते. 'लक्ष्मीचे आठ अवताराला 'श्रीअष्टलक्ष्मी' असे म्हणतात.महालक्ष्मीचे आठ रूप आहेत म्हणून नाव प्रसिद्ध आहे. आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, सन्तानलक्ष्मी, वीरलक्ष्मी(धैर्यलक्ष्मी), विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी. यंदाच्या २०२५ च्या दिवाळीतील लक्ष्मी पूजनाला वैभव लक्ष्मी, महालक्ष्मी, हंस महापुरुष राजयोग यासह अनेक शुभ योग जुळून येत असल्याचे म्हटले जात आहे.
लक्ष्मीची देवीची आरती
जयदेवी जयदेवी श्रीलक्ष्मीमाते । प्रसन्न होऊनि आतां वर दे आम्हांते।। धृ. ।।
श्रीविष्णुकांते तव विश्वावरि सत्ता । स्थिरचर दौलत देसी लक्ष्मीव्रत करितां ।। १ ।।
जननी तुजऐसी या नाही त्रिभुवनीं । सुरवर वंदिती मस्तक ठेवुनि तव चरणी ।। २ ।।
कृपाप्रसादें तुझिया लाभे सुखशांति । चिंताक्लेशहि जाती नुरते आपत्ती ।। ३ ।।
वैभव ऐश्वर्याचें आणि अपार द्रव्याचें । देसी दान दयाळे सदैव सौख्याचे ।। ४ ।।
यास्तव मिलिंदमाधव आरती ओवाळी । प्रेमें भक्तिभावें लोटांगण घाली ।। ५ ।।
जयदेवी जयदेवी श्रीलक्ष्मीमाते ।।