२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 17:05 IST2025-12-04T17:04:24+5:302025-12-04T17:05:22+5:30
What Is Danda Krama Parayanam: मराठमोळ्या १९ वर्षीय देवव्रत महेश रेखे याने काशी येथे गाजवलेल्या भीमपराक्रमाची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. देवव्रत रेखे याने बिनचूक पठण केलेले दंडक्रम पारायण म्हणजे नेमके काय? जाणून घ्या...

२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
What Is Danda Krama Parayanam: गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर येथील देवव्रत महेश रेखे हे नाव देशभरात गाजत आहे. त्याला कारणही तसेच आहे. कारण अवघ्या १९ वर्षाच्या असलेल्या देवव्रत रेखेने कामही तसेच करून दाखवले आहे. गेल्या २०० वर्षांत शंकराचार्य, मठाचार्य, पीठाधीश यांनाही न जमलेली गोष्ट देवव्रतने १९ व्या वर्षी करून दाखवली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील लोक या भीमपराक्रमाचे कौतुक करत आहेत.
एका बाजूला जेन झी काय करणार, असा प्रश्न समाजासमोर उभा राहिलेला असताना देवव्रतने केलेली गोष्ट अचंबित करणारी आहे. एका बाजूला हिंसेकडे जात असलेले जेन झी, सोशल मीडियात आत्ममग्न असलेले जेन झी, यांचे ते रूप जगभराने पाहिले असून, दुसरीकडे देवव्रत याही जेन झी मुलाने धर्माची पताका केवळ देशात नाही, तर जगात उंचवण्याची नवी सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. देवव्रतने केलेली गोष्ट शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही, कारण ती तितकीच अद्भूत आहे. गेल्या २०० वर्षात कुणाला जमले नाही, असे दंडक्रम पारायण देवव्रतने ५० दिवसांत न चुकता, न अडखळता, शास्त्राधार न सोडता तोंडपाठ म्हटले आहे. काशीत २०० वर्षात पहिल्यांदाच शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनदिनी शाखेत संपूर्ण एकल मुखस्थ दंडक्रम पारायण पूर्ण झाले. दंडक्रम पारायण म्हणजे नेमके काय? ते जाणून घेऊया...
दंडक्रम पारायण म्हणजे नेमके काय?
वेदांमधील मंत्र हे विशिष्ट पद्धतीने स्वरात म्हणावे लागतात. वेदांचे स्वर म्हणजे संगीतातील स्वर नव्हे, तर मंत्र म्हणण्याची एक विशिष्ट रचना आहे. हे मंत्र शास्त्राने दिलेल्या पद्धतीनेच म्हणावे लागतात. प्राचीन काळापासून ऋषींनी आठ प्रकारच्या पाठांची व्यवस्था केली. यामधील दंडक्रम सर्वांत कठीण मानला जातो. उदा. असे समजूया की, एक मंत्रात पाच शब्द आहेत. १, २, ३, ४, ५ असे शब्द चार चरणात म्हटले जातात. पहिल्या चरणात १-२, २-१, १-२ अशा प्रकारे म्हटले जाते. दुसऱ्या चरणात १-२-३, ३-२-१, १-२-३ अशा प्रकारे म्हटले जाते. तिसऱ्या चरणात १-२-३-४, ४-३-२-१, १-२-३-४ अशा प्रकारे म्हटले जाते आणि चौथ्या चरणात १-२-३-४-५, ५-४-३-२-१, १-२-३-४-५ अशा प्रकारे म्हटले जाते. अशाच क्रमात प्रत्येक मंत्र म्हणायचा असतो. देवव्रत रेखेचे वैशिष्ट म्हणजे २ हजार मंत्रातील सुमारे २५ लाख श्लोक केवळ ५० दिवसात याच प्रकारे एकही स्वर, अक्षर, शब्द, मंत्र न चुकता बिनचूक म्हणून दाखवले.
२०० वर्षांपूर्वी वेदमूर्ति देव यांनी १०० दिवसात केले होते पारायण
दंडक्रम पारायण एक प्राचीन आणि विशिष्ट पौराणिक अनुष्ठान आहे. ही एक अत्यंत कठोर वैदिक परीक्षा आहे. हा यजुर्वेद मंत्रांचा एक विशिष्ट क्रम आहे, ज्यामध्ये प्रत्येक मंत्र अचूक स्वर, मात्र, उच्चार आणि शुद्धतेने पठण केला जातो. एका मंत्राचे दंडक्रम पारायण करण्यासाठी सुमारे २० ते २५ मिनिटे लागू शकतात, असे म्हटले जाते. २ हजार मंत्राचे २० ते २५ मिनिटांच्या हिशोबाने दररोज १२ तास पठण केल्यास साधारण ५५ दिवस लागू शकतात. परंतु, हीच गोष्ट देवव्रत रेखेने ५० दिवसातच साध्य केली. २०० वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील वेदमूर्ति नारायण शास्त्री देव यांनी हेच दंडक्रम पारायण १०० दिवसांत पूर्ण केले होते.
गुरूकृपेमुळे दीड वर्षांत दंडक्रम पारायण शिकून झाले
हे दंडक्रम पारायण शिकण्यासाठी किमान ५ वर्षांचा कालावधी लागतो. परंतु, गुरुकृपेमुळे दीड वर्षांत माझे शिकून झाले. दिवसातील १२ ते १८ तास दंडक्रम पारायणाचे शिक्षण सुरू होते. तेव्हाच हे साध्य झाले. मी १७ वर्षांचा होतो, तेव्हापासून दंडक्रम पारायण शिकण्यास सुरुवात केली. आताच्या पिढीला एवढेच सांगेन की, तुम्ही जे काम करत आहात, ते मेहनतीने करा. परंतु, आपले मूळ हे वेदधर्म आहे, हे विसरू नका. ५० दिवस सकाळी ८ ते ११, ११.३० पर्यंत पठण करत असे. परंतु, कधी ४ तास, ५ तास, ६ तास असाही वेळ लागत असे. कारण २०० वर्षापूर्वी दंडक्रम पारायण करून दाखवले होते. त्यामुळे त्याला नेमका किती वेळ लागतो, याची माहिती नव्हती. ६ तास बसलो तरी ग्रंथ समाप्त होत नव्हता. तेव्हा देवाला आणि गुरूंना प्रार्थना करायचो ही संकल्प सुफल संपूर्ण होऊ दे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो की, माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीबद्दल दोन शब्द बोलले. मी प्रेरणा देण्याइतपत मोठा झालेलो नाही. माझे गुरूजी प्रेरणा देतील. फक्त एवढेच सांगेन की, अभ्यास करत राहा आणि गुरुसेवा करत राहा, अशी प्रतिक्रिया देवव्रत महेश रेखेने दिली.
दरम्यान, देवव्रतची ही वेदपरीक्षा घेण्यास गणेश्वर शास्त्रींसह काशीचे नामवंत विदवान आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले वेदशास्त्री उपस्थित होते. १२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर असे ५० दिवस वल्लभराम शालीग्राम सांग्वेद विश्वविद्यालयात देवव्रत महेश रेखे याने हे पारायण पूर्ण केले. शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यंदिनी शाखेचे २ हजार मंत्र मुखोद्गत म्हणायचे असतात. त्यातही उलट-सूलट आणि सलग क्रमाने ते विशिष्ट स्वरात व्याकरण, छंद आणि अचूक उच्चारांसह म्हणावे लागतात. देवव्रत हा मुळचा महाराष्ट्राच्या अहिल्यानगरचा आणि त्याच्या या दंडक्रम पारायणमचे श्रोता म्हणून भूमिका बजावणारे देवेंद्र रामचंद्र गढीकर हे अमरावतीचे होते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.