महाकुंभमेळ्याची कधी सांगता होणार? शेवटचे शाही स्नान कधी? जाणून घ्या, शुभ योग अन् मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 11:54 IST2025-02-14T11:51:46+5:302025-02-14T11:54:10+5:30
Maha Kumbh Mela 2025: आतापर्यंत सुमारे ४५ कोटींहून अधिक भाविक महाकुंभमेळ्यात सहभागी झाल्याचे सांगितले जात आहे.

महाकुंभमेळ्याची कधी सांगता होणार? शेवटचे शाही स्नान कधी? जाणून घ्या, शुभ योग अन् मान्यता
Maha Kumbh Mela 2025: कोट्यवधी भाविक ज्याकडे डोळे लावून बसले होते, त्या प्रयागराज महाकुंभाचा १३ जानेवारी रोजी शंखनाद झाला. जगभरातून लक्षावधी भाविकांची पावले या पर्वणीकडे पडताहेत. १४४ वर्षांनी येणाऱ्या या महाकुंभाला हजेरी लावून आध्यात्मिक अनुभूतीची आस सगळ्यांनाच आहे. अनेक सेलिब्रिटी, उद्योजक, दिग्गज मंडळी, कलाकार यांसह देश-विदेशातील भाविकांनी आवर्जून हजेरी लावली. आतापर्यंत जवळपास ४५ कोटींपेक्षा जास्त भाविक, पर्यटक महाकुंभमेळ्यात सहभागी झाल्याचे सांगितले जात आहे. अनेक विश्वविक्रम रचले जात आहेत. महाकुंभमेळा कधीपर्यंत आहे? शेवटचे शाही स्नान कधी आहे? याबाबत जाणून घेऊया...
महाकुंभमेळा सुरू झाल्यापासून पौष पौर्णिमा, मकर संक्राती आणि मौनी अमावास्येच्या दिवशी अमृत शाही स्नान झाले. यानंतर वसंत पंचमी, माघ पौर्णिमा या दिवशी शाहीस्नान झाले. या सर्व सोहळ्यांना अद्भूत प्रतिसाद मिळाला. कोट्यवधी भाविक, पर्यटक सहभागी झाले. याशिवाय साधु-संत, महंत, विविध आखाडे यांनीही या पवित्र, पुण्यफलदायी शाही स्नानात सहभाग घेतला. माघ पौर्णिमेनंतर पुढील शाही स्नान महाशिवरात्रीला होणार आहे. पंचांगानुसार, यावर्षी महाशिवरात्री २६ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरी केली जात आहे. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह या दिवशी झाला होता, म्हणून हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी लाखो भाविक शाही स्नान करण्यासाठी संगम येथे पोहोचतील. या शुभ दिवशी देशभरातील शिव मंदिरांमध्ये विशेष प्रार्थना केली जाणार आहे.
महाकुंभमेळ्याची कधी सांगता होणार? शेवटचे शाही स्नान कधी?
महाशिवरात्रीला शाही स्नान करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे ०५ वाजून ०९ मिनिटांपासू ते ५ वाजून ५९ मिनिटांपर्यंत आहे. तर प्रदोष काळात शिवपूजेचा शुभ काळ सायंकाळी ६ वाजून १९ मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून २६ मिनिटांपर्यंत मानला गेला आहे. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी शाही स्नान झाल्यानंतर महाकुंभमेळ्याची सांगता होणार आहे. माघ कृष्ण चतुर्दशी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ०८ वाजून ५४ मिनिटांनी समाप्त होणार आहे. महाकुंभ केवळ एक धार्मिक सोहळा नाही तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे. दर १२ वर्षांनी होणाऱ्या या महान उत्सवात संत, महात्मा, नागा साधू आणि सामान्य लोक संगमावर येतात. पुण्य कमावतात. महाकुंभमेळ्याची सांगता जवळ आली आहे. महाशिवरात्रीला होणारे शाही स्नान हे सर्वांत खास मानले जात आहे. या दिवशी संगमावर भाविकांची मोठा जनसागर येईल आणि महादेवांचे पूजन केले जाणार आहे.
दरम्यान, आयआयटी बाबा, रुद्राक्षांच्या माळा विकणारी मोनालिसा, अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला प्रदान करण्यात आलेले महामंडलेश्वर पद, मॉडेल असलेली पण दीक्षा घेतल्याचा दावा करणारी हर्षा रिछारिया यांमुळे महाकुंभमेळा चांगलाच गाजला. याशिवाय विविध आखाड्यातील संत-महंत, नागा साधू तसेच आखाड्यांच्या विविध पद्धती, वेषभूषा यांसारख्या अनेक कारणांमुळे २०२५चा महाकुंभमेळा विशेष संस्मरणीय ठरला.