पार्वतीशी झाला वाद, महादेव मंगेश रुपात आले गोव्यात; १०व्या शतकात मंदिर, आजही लागते मोठी रिघ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 12:06 IST2025-02-10T12:05:54+5:302025-02-10T12:06:06+5:30
Shree Mangesh Dev Goa: पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीत अनेक देवता स्थलांतरित करण्यात आल्या. त्यापैकी महादेवाचेच स्वरुप असलेल्या मंगेश देव. मंगेशी हे गोव्यातील प्रसिद्ध देवस्थान असून, देश-विदेशातून पर्यटक येथे येतात. मंदिराचा इतिहास आणि मान्यता जाणून घ्या...

पार्वतीशी झाला वाद, महादेव मंगेश रुपात आले गोव्यात; १०व्या शतकात मंदिर, आजही लागते मोठी रिघ
Shree Mangesh Dev Goa: गोवा म्हटले की, निसर्गाने भरभरून दिलेले वरदान, स्वच्छ-सुंदर समुद्र किनारे यांसारख्या अनेक गोष्टी प्रथम आठवतात. या सर्वांसह गोव्याला समृद्ध संस्कृतीची मोठी परंपरा आणि वारसा लाभलेला आहे. गोव्यातील मंदिरे त्यांच्या स्थापत्यशास्त्र किंवा वास्तुरचनेसाठी प्रसिद्ध असली, तरी त्याचा इतिहास रंजक आणि रोमांचक आहे. गोव्यातील मंदिरे म्हटले की पहिली जी पहिली नावे येतात, त्यापेकी अग्रक्रमाने आणि आग्रहाने घेतले जाणारे नाव म्हणजे मंगेशी. भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर याही याच मंगेशीच्या. मंगेशकर कुटुंबासह अनेक दिग्गज कलाकार मंडळी, ख्यातनाम व्यक्तींची कुलदेवता मंगेश देव आहे.
अंत्रुज महालातील अत्यंत महत्त्वाचा असलेला व निसर्गसौंदर्याची विशेष देणगी लाभलेला गाव म्हणजेच मंगेशी. या गावाची शान असलेला श्री मंगेश देवाचे मंदिर हे केवळ गोव्यातच नव्हे तर देश विदेशामध्येही तेवढेच प्रसिद्ध आहे. देवाच्या कीर्तीमुळे अनेक देश-विदेशातील व अन्य राज्यांतील भक्तगण देव दर्शन घेण्यासाठी उपस्थिती लावतात. वर्षभर या देवस्थानात मोठ्या संख्येने पर्यटक देवस्थानचे सौंदर्य पाहण्यासाठी येतात. या देवस्थानात आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे श्री मंगेश देवस्थानच्या मागे श्री मंगेशचे भक्त मुळकेश्वर या राखणदार याचे छोटे मंदिर आहे. अनेक लोक आपली मनोकामना, नवस या राखणदराकडे करतात व ते नवस पूर्ण झाल्यावर मुळकेश्वराला कांबळ, कोयता ,विडी याचा विशेष मान देतात. या देवस्थानामध्ये नवरात्री उत्सवाबरोबरच कार्तिकी पौर्णिमा जत्रोत्सव, राम नवमी, गोकुळाष्टमी, श्रावणातील सोमवार व अन्य उत्सव साजरे केले जातात. सध्याची मंदिराची रचना १८व्या शतकात बांधण्यात आली होती.
मांगिरीश म्हणजेच मंगेश हे मूळ रूप महादेवाचे
मंगेशी मंदिराचा उगम शतकांपूर्वीचा आहे आणि हा इतिहास गोव्याच्या इतिहासाशी खोलवर गुंफलेला आहे. मूळ मंदिर १०व्या ते १४व्या शतकापर्यंत गोव्यावर राज्य करणार्या कदंब राजवंशाच्या सुरुवातीच्या काळात स्थापित केले गेले असे मानले जाते. मांगिरीश म्हणजेच मंगेश हे मूळ रूप महादेवाचे आहे. या देवस्थानाबाबत अशी मान्यता आहे की, अनेक वर्षांपूर्वी बाटाबाटीच्या काळात मंदिरे तोडण्यात आली होती, त्यावेळी श्री मंगेश देवाला सुरक्षित स्थळी नेण्यासाठी देवाचे महाजन व भक्तगण कुठ्ठाळी येथून मंगेश देवाला मंगेशी येथे आणण्यात आले. ही गोष्ट साधारण १६ व्या शतकातील आहे, असे म्हटले जाते. पोर्तुगीजांच्या धार्मिक धोरणांमुळे अनेक हिंदू मंदिरे नष्ट झाली किंवा स्थलांतरित झाली. मंगेशी मंदिर फोंडा तालुक्यातील प्रियोळ गावातील मंगेशी येथील सध्याच्या जागेवर स्थलांतरित करण्यात आले. श्री मंगेश देवाचे भक्तगण हे केवळ गोव्यातच नसून केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांमध्येही विखुरलेले आहेत. देवाचे भक्तगण हे अन्य राज्यांमध्ये स्थायिक झालेले असले तरी देवाचा जत्रोत्सव, नवरात्री उत्सव तसेच अन्य उत्सवाला विशेष भेट देऊन देवाचा आशीर्वाद घेतात. आरोग्य, समृद्धी आणि कल्याणासाठी मंगेशदेवांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मंदिराला भेट देतात.
स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मंगेशी मंदिर
मंगेशी मंदिर हे गोव्याच्या पारंपारिक मंदिर स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. यात हिंदू आणि पोर्तुगीज स्थापत्य घटकांचे मिश्रण आहे. मंदिराच्या संकुलात भगवान मंगेश यांना समर्पित मुख्य मंदिरासह, श्री गणेश, देवी पार्वती आणि नंदिकेश्वर यांसारख्या विविध देवतांच्या मंदिरांचा समावेश आहे. अनेक ऐतिहासिक वास्तूंप्रमाणे, मंगेशी मंदिराचे स्थापत्य आणि सांस्कृतिक महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी वर्षानुवर्षे नूतनीकरण आणि जीर्णोद्धार केले गेले आहे. मंगेशी मंदिराला त्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) द्वारे संरक्षित स्मारक म्हणून ओळखले जाते.
महादेवांच्या मंगेश स्वरुपाबाबत स्कंद पुराणात कथा
गोव्यातील मंदिरांचा इतिहास मोठा आहे. गोव्यातील मुख्य शिवलिंग मांगिरीश म्हणून ओळखले जाते, त्याचा पुढे अपभ्रंश होऊन मंगेशी असा झाल्याचे सांगितले जाते. मंगेशीच्या स्थापनेबाबत स्कंदपुराणात एक कथा सांगण्यात आली आहे. महादेव आणि पार्वती यांच्यात कोणत्यातरी कारणावरुन वाद झाल्यानंतर महादेवाने हिमालय सोडला. महादेव हिमालयातून दक्षिण गोव्यात आले, पार्वती देवी त्यांचा शोध घेत गोव्यात दाखल झाल्या. पार्वती गोव्यात आल्याची माहिती मिळताच महादेवाने वाघाचा अवतार धारण केला. वाघाच्या अवतारातील महादेवाने पार्वतीच्या अंगावर धाव घेतली. यावेळी माता पार्वतीने 'मांगिरीश त्राहि' म्हणजे शंकरा माझे रक्षण कर असे म्हणण्याचा प्रयत्न करतात मात्र त्याच्या मुखातून मांगीश असा शब्द उच्चारला गेला. महादेवाने प्रसन्न होऊन माता पार्वतीला वर मागण्यास सांगितले, त्यावेळी नाथ तुम्ही याच भूमीत मांगीश नाव धारण करुन वास्तव्य करावे अशी पार्वती मागणी करते. भगवान शंकर पार्वतीची ही इच्छा पूर्ण करतात. पुढे मांगीश या शब्दाचा अपभ्रंश होऊन तो मंगेश असा झाला, अशी कथा स्कंद पुराणात येते, असे सांगितले जाते.