Gajanan Maharaj And Shankar Maharaj: मानवी जीवनात अन्न,वस्त्र,निवारा या मूलभूत गरजा मानल्या जातात पण त्या शिवाय एक अत्यंत महत्त्वाची गरज असते ती सद्गुरू चरणांपाशी आश्रयाची. ती आधी प्राप्त झाली कि काहीही मिळवायचे राहत नाहीच तसेच या शिवाय जीवनात काहीही खरे समाधान मिळत नाही हेही तितकेच खरे, असे मानले जाते. परलोक साधून देणार्याला सद्गुरु म्हणतात. जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो, त्यालाच सद्गुरुकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो. साधारणपणे लोक अनेकांचा ‘गुरू’ म्हणून उल्लेख करतात. आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देणारा, योग्य वेळी योग्य पथ दाखवणारा गुरू.
गुरू या शब्दातच सामर्थ्य आहे. जीवनाला गती देणारे बळ आहे. जीवनाला आकार, आधार देणारा गुरू भारतीय संस्कृतीत ईश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे. व्यक्तीच्या जन्मानंतर त्याचा पहिला गुरू असतो आई, मग आयुष्याला मार्ग दाखवणारा आपला मार्गदर्शक गुरू. खरं तर जी व्यक्ती आपल्याला नवी वाट दर्शवते, जीवनाला गंध देणारं नव ज्ञान देते, आपली चूक नकळत सुधारते, ती व्यक्ती जीवनात आपल्या गुरूच्या स्थानी जाते. गुरु आणि सद्गुरू यांबाबत जितके लिहिले जाईल, तितके कमीच आहे. आदर्श गुरु-शिष्यांच्या अनेक जोड्या आपल्याला सांगता येतील. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्ष दत्तगुरुंचे अवतार. स्वामी गुरुंचेही सद्गुरू. अनेक शिष्यांपैकी गजानन महाराज आणि शंकर महाराज यांनाही स्वामींचा परिसस्पर्श झाला आणि त्यांनीही दैवी कार्य करून त्यांचेही पुढे उत्तमोत्तम शिष्य झाले.
तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो
संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजीचा. गजानन महाराज त्रिकालज्ञ होते. भूत, भविष्य आणि वर्तमान याविषयी ते अगोदरच जाणून असायचे. गजानन महाराजांनी अनेक रंजले - गांजलेल्यांना मार्गदर्शन केले व सन्मार्ग दाखविला. लोकमान्य टिळक यांनी गजानन महाराजांची भेट घेतली होती. गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच होते. ते विदेही स्थितित वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. गजानन महाराज शेगावला येण्यापूर्वी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात होते व तिथे त्यांनी आपले बालपण घालविले, असा उल्लेख तुकाराम रामचंद्र नागलकर यांनी लिहिलेल्या एका पोथीत आढळून येतो. ‘गण गण गणात बोते’ हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड जप करीत. अक्कलकोट स्वामीनी गजानन महाराजांना सांगितले की, तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो. तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दे. नामस्मरण हे एक चिलखत आहे. नियतीने कितीही वार केले तरी आत कुठेही जखम होत नाही. शेगावला जाण्यापूर्वी नाशिकला जा, तिथे श्रीरामाचे दर्शन घे आणि मग पुढे जा. स्वामींचा आदेश घेऊन महाराजानी श्रीराम मंदिरी जाऊन दर्शन घेतले. तिथे उबंरठव्यावरती डोके ठेवले तर मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या. हे पाहून मंदिरातील पुजारी घाबरला त्याला वाटले की ही भुताटकी आहे काय? पण प्रत्यक्ष श्रीराम मंदिरात भुतावळींना श्रीरामांच्या आज्ञेशिवाय प्रवेश नाही. मग असे भलते काय होत आहे, असे मनात म्हणत त्याने श्रीराम प्रभूंसमोर हात जोडले. तेवढ्यात श्रीराम चरणी वाहिलेली फुले गजानन महाराजांच्या मस्तकावर येऊन पडली. ते पाहून पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आला आणि ते दृश्य पाहून मनोमन विचार केला ही कोणी साधारण व्यक्ती नाही आणि त्याने महाराजांच्या चरणी लोटांगण घातले. आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ गजानन महाराजांनी शेगांवमध्ये व्यतीत केला. अवतारकार्यात महाराजांची हजारो भाविकांचा उद्धार केल्याचे सांगितले जाते.
माझे गुरू श्री स्वामी समर्थ यांना नित्य स्मरा ही माझी आज्ञा आहे
श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष. त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. समाधीची अधिकृत नोंद आहे. पण बालपण, माता-पिता, शिक्षण, गुरू, साधना, शिष्य-संप्रदाय इत्यादींचा तपशील हवा तसा मिळत नाही. अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांना शंकर महाराज गुरू मानत. ते भक्तांना स्वामीसेवा जप करावयास लावत. शंकर महाराज हे स्वामींना ‘मालक’ असे संबोधत असत, असेही सांगितले जाते. लहानपणी शंकर महाराज फार खोडकर आणि खट्याळ होते. एक दिवस एका हरिणाच्या पिल्लाचा पाठलाग करत ते एका अरण्यात पोहोचले. त्या घोर अरण्यात त्यांना एक शंकराचे जीर्ण देऊळ दिसले. तिथेच स्वामी महाराज आणि शंकर महाराजांची प्रथम भेट झाली, असे सांगितले जाते. योगीराज श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना समोर बसवून सद्गुरुचा महिमा सांगत असत. ते जेव्हा म्हणून अक्कलकोटला येत. तेव्हा आपल्या आईला मुलाने भेटावे अशा प्रेमाने साश्रुमनाने श्री स्वामींच्या समाधीचे दर्शन घेत. तासनतास वटवृक्षाच्या छायेत रहात. संपूर्ण रात्रभर जागरण करीत व रात्रौ गुरूशिष्यांच्या भेटी होत. श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचे एकमेव गुरू आहेत. त्यांच्या स्थानावर आम्ही येऊन सुखावतो. अक्कलकोटला जमलेल्या आपल्या भक्तांना शंकर महाराज सांगत माझे गुरू श्री स्वामी समर्थ यांना नित्य स्मरा ही माझी आज्ञा आहे. सदगुरू शंकर महाराज म्हणत असत की, मी आणी माझा गुरु वेगळा नाही. श्री स्वामी समर्थ हा माझ्या गुरुचा जप आहे. त्यांचे नाम घेतले की मला ते पोहोचते.
।। गण गण गणात बोते ।।
।। जय शंकर ।।
।। श्री स्वामी समर्थ ।।
।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।