यशाच्या कुलुपाची चावी तुमच्याच खिशात आहे, एकदा तुमचा खिसा तपासून तर पहा; वाचा ही गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 17:29 IST2022-01-17T17:28:41+5:302022-01-17T17:29:15+5:30
आपण अपयश गोंजारत बसतो आणि त्या नादात यशाची चावी आपल्याच खिशात असते हे विसरून जातो.

यशाच्या कुलुपाची चावी तुमच्याच खिशात आहे, एकदा तुमचा खिसा तपासून तर पहा; वाचा ही गोष्ट!
'तुज आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी' हे आपण अनेकदा ऐकतो, पण आजमावून पाहत नाही. यासाठी गरज आहे विचारांना योग्य दिशा देण्याची! अतिविचाराच्या नादात आपण योग्य मार्ग भरकटतो आणि अपयशी ठरतो. तुमच्याही बाबतीत असेच घडत असेल, तर पुढील गोष्ट तुम्हाला नक्कीच मदत करेल.
एक माणूस चावीशिवाय कुलूप उघडण्यात तरबेज होता. त्याने आपल्या कलेचा वापर गैरकामांसाठी कधीच केला नाही. उलट पुरातत्त्व विभागाकडून काही अमूल्य पेटाऱ्यांचे कुलूप उघडण्यासाठी त्याला पाचारण केले जाई. अशी अनेक कुलूपे त्याने आपल्या हयातीत चावीशिवाय उघडली होती. त्याच्या नावावर विश्वविक्रम नोंदवला गेला होता.
त्याचे हे कसब पाहण्यासाठी एकदा त्याला मोठ्या कार्यक्रमाचे आमंत्रण आल़े तिथे भल्या मोठ्या समुदायाच्या उपस्थितीत त्याला स्विमिंग टँकमध्ये उतरून तिथे ठेवलेल्या पिंजऱ्यातील कुलूप उघडायचे होते. त्याने ते आव्हान स्वीकारले.
ठरलेल्या दिवशी तो कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचला. हजारो लोक तिथे उपस्थित होते. आयोजकांनी त्याला स्विमिंग पूल दाखवला आणि त्याच्या आत असलेल्या पिंजऱ्यामध्ये त्याला बंद केला. पिंजरा पाण्यात सोडण्याआधी आयोजकांनी त्याला सांगितले, जर तुम्हाला कुलूप उघडता आले नाही आणि पाण्यात तुम्ही फार काळ तग धरू शकला नाहीत तर बाजूला असलेले सेफ्टी बटन दाबताच तुम्ही सुरक्षितपणे वर येऊ शकता.
या बटणाची आपल्याला गरजच लागणार नाही या अविर्भावात तो कलाकार पाण्यात उतरला. खाली जात असताना हजारो प्रेक्षकांसमोर स्वत:ला सिद्ध करण्याचे दडपण त्याच्या मानगुटीवर होते. तरी त्याने कामावर लक्ष केंद्रित केले आणि तो कुलुप उघडण्याचा आटोकाठ प्रयत्न करू लागला. परंतु काही केल्या कुलूप उघडत नाही पाहून तो हताश झाला. आज अपयशाला सामोरे जावे लागणार या विचाराने त्याने जीव वाचवण्याच्या बेताने सेफ्टी बटन दाबले आणि तो पिंजऱ्यातून मुक्त होऊन वर आला.
त्याने अपयश मान्य केले. तेव्हा आयोजक म्हणाले, ते कुलूप उघडणारे नव्हतेच, परंतु तुमची खरी सुटका पिंजऱ्याच्या बाजूला असलेल्या दारातून होणार होती. ते कुलूप साध्या धक्याने उघडणार होते, तुम्ही ते न करता हार पत्करून सेफ्टी बटन दाबलेत!
कलाकाराला त्यादिवशी मोठी शिकवण मिळाली. आपण अपयश गोंजारत बसतो आणि त्या नादात यशाची चावी आपल्याच खिशात असते हे विसरून जातो. म्हणून यशाचे द्वार उघडायचे असेल तर आधी स्वत:कडे बघा, स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा आणि डोके शांत ठेवून विचार करा म्हणजे कठीणात कठीण कुलूपेही चावीशिवाय आपोआप उघडतील!