चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 11:54 IST2025-10-27T11:49:35+5:302025-10-27T11:54:51+5:30
Kartiki Ekadashi 2025: चातुर्मास समाप्ती झाल्यानंतर तुलसीविवाहारंभ होतो. जाणून घ्या...

चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
Kartiki Ekadashi 2025: मराठी वर्षांत सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांची रेलचेल असणारा चातुर्मास अतिशय महत्त्वाचा मानला जातो. गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळी असे मोठे सण-उत्सव याच काळात साजरे केले जातात. आषाढ महिन्यात चातुर्मास काळाची सुरुवात होते. यंदा २०२५ मध्ये चातुर्मास काळ कधी संपणार? कार्तिकी एकादशीचे महत्त्व अन् मान्यता जाणून घेऊया...
वर्षभरात येणाऱ्या एकादशींपैकी आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशी भाविकांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहे. आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते. तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठल दर्शन घेतात. या दोन एकादशींच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो. यंदा शनिवार, ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रबोधिनी स्मार्त एकादशी असून, रविवार, ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी विष्णुप्रबोधोत्सव आहे. याच दिवशी चातुर्मास्य समाप्ती आहे. कार्तिक महिन्यातील एकादशीपासून तुलसीविवाहारंभ होत असून, ०५ नोव्हेंबर २०२५ रोजी तुलसीविवाह समाप्ती आहे.
कार्तिक शुद्ध एकादशीनंतर विष्णुप्रबोधोत्सव
आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो. दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. कर्क संक्रांत आषाढ मासात येते; म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस 'देवशयनी एकादशी' म्हटले आहे; त्या दिवशी देव झोपी जातात, अशी समजूत रूढ आहे. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन जागृत होतात; म्हणून तिला 'प्रबोधिनी (बोधिनी, देवोत्थानी) एकादशी' असे म्हटले जाते. नवसृष्टीनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालनकर्ता श्रीविष्णु निष्क्रिय असतो; म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. तेव्हा श्रीविष्णु क्षीरसागरात शयन करतो, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते.
तुलसी विवाहानंतर चातुर्मास व्रतांचे उद्यापन
कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौणिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्री कृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते, अशी मान्यता प्रचलित आहे. भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्व आहे. श्रीविष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही संबोधले जाते. तुळशीवाचून केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराणात म्हटले आहे. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले, तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले, त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला, असे मानले जाते. तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील त्या सर्वांचे उद्यापन करतात.