चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 17:59 IST2025-07-20T17:58:51+5:302025-07-20T17:59:51+5:30

Ashadhi Kamika Ekadashi July 2025: आषाढी कामिका एकादशीचे वैशिष्ट्य काय? व्रतपूजन कसे करावे? महात्म्य आणि काही मान्यता जाणून घ्या...

kamika ekadashi july 2025 date vrat puja vidhi and ashadh kamika ekadashi 2025 importance in marathi | चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी

चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी

Ashadhi Kamika Ekadashi July 2025 Vrat Puja Vidhi In Marathi: आषाढी एकादशीपासूनचातुर्मासाला सुरुवात होते. देवशयनी एकादशीला श्रीविष्णू योगनिद्रेत जातात. त्यामुळे या चातुर्मासात संपूर्ण ब्रह्मांडाचे पालकत्व महादेव शिवशंकरांकडे असते, असे मानले जाते. चातुर्मास सुरू झाल्यानंतर येणारी पहिली एकादशी म्हणजे कामिका एकादशी. आषाढ महिन्याच्या वद्य पक्षात ही एकादशी येते. आषाढ महिन्यातील दोन्ही एकादशींना अनन्य साधारण असे महत्त्व आहे. कामिका एकादशीचे व्रतपूजन कसे करावे? जाणून घेऊया...

प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. प्रत्येक एकादशी श्रीविष्णूंना समर्पित असते. एकादशीला श्रीविष्णूंच्या पूजनाने, भजनाने आणि उपासनेने जीवनातील विघ्न दूर होतात. सुख, शांतता, समृद्धी येते, असेही सांगितले जाते. सोमवार, २१ जुलै २०२५ रोजी कामिका एकादशी आहे. उत्तर भारतातील पंचांगानुसार, श्रावण मास सुरू झाला आहे. त्या पंचांगानुसार, यंदाची कामिका एकादशी श्रावणी सोमवारी येत आहे. त्यामुळे या एकादशीचे महत्त्व वाढल्याचे सांगितले जात आहे. 

आषाढी कामिका एकादशीचे व्रतपूजन कसे करावे?

आषाढ कृष्ण एकादशीला कामिका एकादशी असे नाव आहे. या एकादशीची पवित्रा एकादशी आणि कृष्णैकादशी अशी दुसरी नावेही आहेत. या एकादशीला श्रीधर या नावाने भगवान विष्णूंची पूजा करून चोवीस तास अखंड तुपाचा दिवा लावणे, हा विशेष विधी असतो. कामिका एकादशी व्रताचरण आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे. षोडषोपचार पूजा शक्य नसेल, तर पंचोपचार पूजा करावी. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा पाळून एकादशी व्रताचरण करावे, असे सांगितले जाते. 

कामिका एकादशीची सांगता कशी कराल?

कामिका एकादशीला जागरण करून भजन, कीर्तनात रात्र जागवावी, असे सांगितले जाते. एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये. व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपल्यानंतर की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी.

॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥

 

Web Title: kamika ekadashi july 2025 date vrat puja vidhi and ashadh kamika ekadashi 2025 importance in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.