Kamika Ekadashi 2022: कामिका एकादशीला कृष्णैकादशी का म्हणतात? या व्रताचा विशेष व्रत विधी जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 14:11 IST2022-07-21T14:09:52+5:302022-07-21T14:11:35+5:30
Kamika Ekadashi 2022: व्रतांचा उद्देश केवळ ईश्वरी उपासना नाही, तर मनुष्य दोषातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग असतो.

Kamika Ekadashi 2022: कामिका एकादशीला कृष्णैकादशी का म्हणतात? या व्रताचा विशेष व्रत विधी जाणून घ्या!
आषाढ कृष्ण एकादशीला कामिका एकादशी असे नाव आहे. येत्या रविवारी २४ जुलै रोजी ही एकादशी आहे. या एकादशीची पवित्रा एकादशी आणि कृष्णैकादशी अशी दुसरी नावेही आहेत. या एकादशीला नेहमच्या एकादशीसारखाच उपास आणि पूजा करायची असते. शिवाय श्रीधर या नावाने भगवान विष्णूंची पूजा करून चोवीस तास अखंड तेवता असा तुपाचा दिवा लावणे, हा विशेष विधी असतो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पंचामृत पूजा करावी. पूजेत तुळस असणे आवश्यक असते. तसेच आपल्याला शक्य होईल त्या गोष्टीचे दान द्यावे.
या एकादशीची एक कथा आहे -
पूर्वी एका शूर क्षत्रियवीराच्या हातून अपघाताने ब्रह्महत्या घडली. त्यावेळी त्याने त्या ब्राह्मणाचे तेरावे आणि पुन्हा चौदाव्या दिवशीचे अंत्यसंस्कार विधी करायचे असे ठरवले. परंतु ब्रह्महत्या घडली म्हणून सर्व ब्राह्मणांनी त्याच्याकडे जायचे नाकारले. मात्र त्यांनी या पापाचा नाश व्हावा म्हणून त्याला ही कामिका एकादशी करायचा सल्ला दिला. त्याने मनोभावे हे व्रत केले. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला दर्शन दिले. त्याची पापातून मुक्तता केली. व त्याला स्वर्गप्राप्ती झाली.
आपल्या हातूनही कळत नकळत एखाद्याचा अपमान झाला असेल, एखादी व्यक्ती आपल्या बोलण्याने दुखावली वा दुरावली गेली असेल तर या व्रताच्या निमित्ताने त्या व्यक्तीला भेटून तिची माफी मागावी. तिला एखादी वस्तू भेट म्हणून द्यावी. मकर संक्रातीला आपण जसे तिळगूळ देऊन गोड बोला म्हणतो, तसे या एकादशीच्या निमित्ताने दुरावलेली माणसे जोडता आली तर उत्तमच आहे ना!
अशा रितीने व्रत वैकल्यांमध्ये कालानुरुप आवश्यक बदल करून आपण या परंपरांमध्ये सातत्य ठेवू शकतो. जेणेकरून व्रतांचा मूळ उद्देश, तो म्हणजे मानवी मनाचा, देहाचा विकास, साध्य होईल. कामिका एकादशीच्या व्रतातून आपणही हा बोध घ्यायला काहीच हरकत नाही. या व्रताला विष्णूपुजेची जोड दिली, उपास करून उपासना केली, तर मनाबरोबर देहाची शुद्धी होईल आणि एकादशीचे व्रत सुफळ संपूर्ण होईल.