Kalki Jayanti 2025: 'मी पुन्हा येईन' असे आश्वासन श्रीकृष्णाने दिले, ती कल्की जयंती आजच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 07:00 IST2025-07-30T07:00:00+5:302025-07-30T07:00:00+5:30
Kalki Jayanti 2025: ३० जुलै रोजी कल्की जयंती आहे, भगवान विष्णुंचा कलियुगात अवतार होणार याचे भाकीत भगवान श्रीकृष्णांनी करून ठेवले आहे, तिथीसुद्धा दिली आहे, फक्त...

Kalki Jayanti 2025: 'मी पुन्हा येईन' असे आश्वासन श्रीकृष्णाने दिले, ती कल्की जयंती आजच!
आज ३० जुलै रोजी कल्की(Kalji Jayanti 2025) जयंती आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण यांनी एका श्लोकात 'संभवामि युगे युगे' असे म्हटले आहे, म्हणजेच मी पुन्हा येईन असे आश्वासन दिले आहे. सज्जनांच्या रक्षणाकरिता आणि दुष्टांचा नि:पात करण्याकरिता आजवर प्रत्येक युगात देवाने अवतार घेतला आहे. सद्यस्थितीत अर्थात कलियुगात घराघरात कली शिरलेला असून परिस्थिती हाताबाहेर जात आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा भगवान विष्णू आपला दहावा अवतार घेऊन आपले ब्रीद राखतील असा भाविकांचा विश्वास आहे.
राम, कृष्ण, गणेश, विष्णू, देवी, हनुमान अशा देवतांची जन्मतिथी लक्षात ठेवून दरवर्षी हा जन्म सोहळा उत्साहाने पार पाडला जातो. त्यानिमित्त कथा, कीर्तन, प्रवचनाचे आयोजन करून देवांनी कोणत्या परिस्थितीत अवतार घेतला आणि अवतार घेतल्यावर कोणते कार्य केले या घटनांना उजाळा दिला जातो. या जन्म कथांमधून प्रेरणा घेत आपणही आपल्यातले ईश्वर तत्व जागृत करून दुष्टांविरुद्ध दंड थोपटावेत, हा त्या सोहळ्याचा मुख्य हेतू असतो. परंतु अनेक भाविक देवाच्या अवताराची वाट पाहतात आणि त्यांना विश्वास वाटतो की आपल्या रक्षणार्थ भगवंत अवतार घेणार.
कल्किचा अवतार...
ऋग्वेदानुसार कालचक्र ४ युगात चालते. ही युगे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग आहेत. सध्या कलियुग चालू आहे. या कलियुगात श्री हरी विष्णू कल्किचा अवतार घेणार आहेत. पौराणिक कथेनुसार जेव्हा-जेव्हा पृथ्वीवर पापी लोकांचे प्रस्थ आणि अत्याचाराचे प्रमाण वाढले, तेव्हा भगवान श्री हरी विष्णूंनी पृथ्वीवर अवतार घेऊन पृथ्वीला अत्याचारी लोकांच्या दहशतीतून मुक्त केले. प्रत्येक युगात भगवान विष्णूंनी वेगवेगळे अवतार घेऊन लोकांना ज्ञानाचा आणि प्रतिष्ठेचा धडा शिकवला आहे. धार्मिक पुराणांमध्ये सत्ययुगापासून कलियुगापर्यंत भगवान विष्णूचे एकूण २४ अवतार सांगण्यात आले आहेत. यापैकी २३ अवतार झाले आहेत आणि शेवटचा कल्कि अवतार अजून कलियुगात व्हायचा आहे.
कल्की अवतार कधी होणार?
२४ व्या अवताराबद्दल पुराणात उल्लेख आहे की भगवान विष्णूचा हा अवतार कलियुग आणि सत्ययुगाच्या संगमात असेल. म्हणजेच जेव्हा कलियुग संपेल तेव्हा सत्ययुग सुरू होईल. पुराणानुसार भगवान विष्णूचा हा अवतार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला होईल. त्यामुळे दरवर्षी या तिथीला कल्की जयंतीही(Kalji Jayanti 2025) साजरी केली जाते. भगवान कल्किच्या जन्माच्या वेळी गुरु, सूर्य आणि चंद्र पुष्य नक्षत्रात एकत्र असतील आणि भगवंताच्या जन्माबरोबरच सत्ययुग सुरू होईल असे म्हटले जाते.
याचा अर्थ आपणही सत्ययुगाचा भाग होणार आहोत?
याबाबत ब्रह्मकुमारी शिवानी दीदी सांगतात, 'सत्ययुग सुरू होणार आहे हे निश्चित आहे, परंतु ते कधी आणि कोणासाठी? तर जी व्यक्ती सत्ययुगातील लोकांचे वर्णन केल्याप्रमाणे धर्माने, नीतीने, प्रामाणिकपणे आचरण सुरू करेल त्याच्यापासून आणि त्याच्यापुरते सत्ययुग सुरू होईल. त्यामुळे हे विश्व संपेल आणि नवीन विश्व निर्माण होऊन अशा कल्पनांमध्ये रमू नका किंवा अवताराची वाट बघू नका, तर आपल्या घरा, दारातला, समाजातला कली मारण्यासाठी किंवा त्याच्यावर मात करण्यासाठी स्वतः कटिबद्ध व्हा आणि सत्ययुगाची अनुभूती घ्या!