जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 11:31 IST2025-08-25T11:30:58+5:302025-08-25T11:31:53+5:30
Jagadguru Rambhadracharya Challenge Premananda Maharaj: जगद्गुरू रामभद्राचार्य अनेकदा त्यांच्या वक्तव्याने चर्चेत असतात, अलीकडेच त्यांनी प्रेमानंद महाराजांवर तोफ डागली आहे, त्यावर लोक नाराजी व्यक्त करत आहेत, कारण...

जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
जगद्गुरू रामभद्राचार्य हे एक प्रख्यात विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, रचनाकार, प्रवचनकार, तत्त्वज्ञ व हिंदू धर्मगुरू आहेत. ते रामानंद संप्रदायाच्या वर्तमान चार जगद्गुरू रामानंदाचार्यांमधील एक आहेत. जगद्गुरू रामभद्राचार्य वयाने दोन महिन्याचे असतांना दृष्टी गमावून बसले व तेव्हापासूनच ते प्रज्ञाचक्षु आहेत. त्यांनी कधीही अभ्यासासाठी किंवा रचना करण्यासाठी ब्रेल लिपी वापरली नाही. तरीसुद्धा ते बहुभाषिक आहेत आणि २२ भाषा बोलतात. त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली आहे, तसेच प्रसार माध्यमांवर त्यांची प्रवचने होत असतात. अनेकदा त्यांच्या वक्तव्याने चर्चेत असतात.
अलीकडेच एनडीटीव्ही इंडिया या वृत्त वाहिनीला मुलाखत देताना त्यांनी एक विधान केले आहे, ज्यामुळे अनेक भाविकांनी त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. जगद्गुरू कोणाला म्हणावे, याबाबत चर्चा सुरु असताना मुलाखतकाराने प्रेमानंद महाराजांबद्दल अभिप्राय विचारला असता ते म्हणाले, 'त्यांना आचार्य म्हणता येणार नाही, की चमत्कारी बाबा म्हणता येणार नाही. ते मला वयाने, ज्ञानाने, अनुभवाने मुलासारखे आहेत. त्यांना लोकप्रियता मिळतेय, सेलिब्रेटी त्यांच्याकडे येताहेत याचा मला आनंद आहे, पण त्यांचे जीवन चमत्कारिक म्हणता येणार नाही. ते डायलिसिसवर जगत आहेत. त्यांना शास्त्राचे ज्ञान किती आहे याबाबत मला शंका आहे. आचार्य, जगद्गुरू कोणाला म्हणावे? ज्यांनी वेद, पुराणं, शास्त्र यांचा अभ्यास केला आहे, संस्कृत ग्रंथांची रचना केली आहे. मी स्वतः संस्कृतात अनेक ग्रंथ लिहिले. प्रेमानंद महाराजांना माझे खुले आव्हान आहे, त्यांनी एक शब्द तरी संस्कृतात बोलून दाखवावा किंवा माझ्या लिहिलेल्या एखाद्या संस्कृत श्लोकाचा अर्थ सांगावा.'
एवढे बोलून रामभद्राचार्यानी तो विषय तिथेच थांबवला, मात्र प्रेमानंद महाराजांना मानणाऱ्या अनुयायांमध्ये रागाची ठिणगी पडली. साध्या, सोप्या भाषेत अध्यात्म सांगणारे प्रेमानंद महाराज सेलिब्रेटींमध्येच नाही, तर सर्वसामान्य लोकांमध्येही प्रिय आहेत. त्यांना वेद, शास्त्र येवो न येवो, ते सामान्य जीवन, अध्यात्म छान समजावून सांगतात, त्यामुळे संस्कृत भाषा हे त्यांच्या विद्वत्तेचे परिमाण ठरवू नये, अशी प्रतिक्रिया लोकांमधून उमटत आहे. यावर प्रेमानंद महाराज काय प्रतिक्रिया देणार की त्यांच्या स्वभावानुसार नम्रपणे माघार घेणार किंवा मौन पाळणार हे येत्या काळात कळेल. पहा व्हिडिओ :-